Monday, August 25, 2014

आजचे अशुभ ग्रहयोग.

 ॥ श्री स्वामी समर्थ॥

आदरणीय मित्रमैत्रिणींनो,

आज लई बेकार ग्रहयोग आहेत.  शनि-मंगळ अंशात्मक युती, मंगळ- वक्री हर्षल षडाष्टक, शनि- वक्री हर्षल षडाष्टक, बुध-वक्री हर्षल षडाष्टक त्यात अमावास्या.

गाडी, बाईक वगैरे जरा जपून चालवा. गरज नसेल तिथे जाणे टाळा. पेट्रोलपंप, विद्युतजनित्रे, पेट्रोल-डिझेल-रसायने असे ज्वालाग्रही व स्फोटक पदार्थ वाहून नेणार्‍या टॅंकर्सजवळ गाडी लावू नका. गरज नसतांना लॉंग ड्राईव्ह, अतिसाहस या गोष्टी टाळा. विद्युत उपकरणे जपून हाताळा.

जे वाटलं ते सांगितलं. एखादा म्हणाला, आपल्याला बघायचायं काय होतं ते. तर त्याने खुशाल बघावं. माझ्या बापाचं काय जातायं?

मी तो बोलोनि उतराई।

आपला,
(सावध) धोंडोपंत


ता.क. - कालपासूनचा हा तिसरा भूकंप

 http://timesofindia.indiatimes.com/world/rest-of-world/Magnitude-7-0-earthquake-strikes-southern-Peru-US-geological-survey-says/articleshow/40862728.cms


Friday, August 22, 2014

चालता हे मग, कळो आले....

 ॥ श्री स्वामी समर्थ॥


मित्रांनो,

आज रात्री ०९ वाजून ०३ मिनिटांनी पुष्य नक्षत्र सुरू होत आहे. उद्या रात्री बारापर्यंत चंद्र पुष्य नक्षत्रात असेल. शनिवारचा दिवस आहे. श्रावणातला शेवटचा शनिवार आहे. वार आणि नक्षत्र दोन्ही शनिचं आहे.

काय करायचं हे सांगायला नकोच. आता अनेकजण शनिच्या लायनीला लागले आहेत.

शनि काय करतो? हा प्रश्नच नाही ना भाऊ आपल्याला. जे करतो त्याची प्रचीती समोर आहे. आणि ज्यांच्यावर शनि कोपलाय त्यांची उदाहरणंही समोर आहेत. असे लागलेत एकेकांचे काही सांगायची सोय नाही. लक्षाधीशाचे झाले भीक्षाधीश.

एक साडेसाती आणि होत्याचं नव्हतं. शनिचं म्हणजे... प्रेम चोपडा, हिसाब रोकड़ा.... ते पुढचा जन्म वगैरे काही नाही. इथेच बॅलन्सशिट टॅली.

माझा पैसा, माझी कीर्ती, माझी बुद्धि, माझं कर्तृत्व,..... हे सगळ एका लाटेत जातं. मी मी म्हणणारे गेले. रात्री घरात झोपले आणि सकाळी लोकांनी नेलं खांद्यावरून डायरेक्ट नदीवर. असो. तेव्हा, आपण आपल्या लायनीने जायचं. " सावधान होई वेड्या, सावधान होई"

शनि का ज़िक्र और इबादत यही अपनी ज़िंदगी का मक़्सद है.

॥ ॐ शं शनैश्चराय नम: ॥

तुकाराम महाराज म्हणाले,

" चालता हे मग, कळो आले"

चार पावलं वाटेवर चालल्यावर कळतं, ही वाट कशी आहे ते. नुसतं एसटी स्टॅंडच्या बाकड्यावर बूड टेकून बोंबलण्यात काही अर्थ नाही.

आपला,
(शनिमय) धोंडोपंत


॥ श्री साईनाथाय नम:॥

Friday, July 25, 2014

शनिउपासनेची पर्वणी......

॥ ॐ शं शनैश्चराय नम:॥

लोकहो,

आज शुक्रवारी रात्री २५ वाजून ५६ मिनिटांनी म्हणजेच शनिवारी ०१ वाजून ५६ मिनिटांनी अमावास्या लागत आहे. आषाढाची अमावास्या ही दीप अमावास्या किंवा दिव्यांची अवस असल्यामुळे दीपपूजन वगैरे विधी तर करावेच. पण,

शनिउपासनेसाठी ही एक चांगली पर्वणी आहे. ज्यांना राहु महादशा, शनि महादशा वा साडेसाती सुरू आहे, त्यांनी उद्या मस्त शनिउपासना करावी. 

शनिमंदिरात जाऊन शनिचे दर्शन घ्यावे. तैलाभिषेक करावा. काळे उडीद शनिला वहावेत. रुईच्या पानाची माळ मिळाली तर चांगलचं. नाही मिळाली तर काही अडत नाही. काहीच नाही मिळालं तिथे अक्षतांची नियुक्ती सांगितलेली आहे. हा धर्म इतका सोपा आहे. साधनांसाठी अडून बसायचं नाही.

तर सांगायची गोष्ट ही की, शनिमंत्राचा जमेल तेवढा जप करावा. दिवस सत्कारणी लावावा.

तसेच, ज्यांच्या कुंडलीत गोचरीचा शनि ६ / ८ /१२ स्थानी आहे ( वृषभ, मीन, वृश्चिक लग्न) त्यांनीही शनिउपासना करावी. म्हणजे तुळेतल्या उरलेल्या ८ अंशाच्या शनिभ्रमणाचा मोठा फटका बसणार नाही.

त्यांच्यासाठी मंत्र पुढीलप्रमाणे.

सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्ष: शिवप्रिय:।
मन्दाचार: प्रसन्नात्मा पीडां दहतु मे शनि:॥

रक्त आटवून हे लिहायचं कारण इतकचं की, जगावर सत्ता शनीची आहे. राष्ट्रवादीची किंवा सेनेची किंवा भाजपाची नाही.

शनिची उपासना करा, स्वत:चं भलं करून घ्या.

पटलं तर घ्यायचं नाहीतर सोडून द्यायचं ही आपली कायमस्वरूपी भूमिका इथेही लागू.

आपला,
(लोकहितवादी) धोंडोपंतMonday, July 21, 2014

शनि मार्गी....

॥ श्री स्वामी समर्थ॥

नमस्कार,

आजपासून शनि मार्गी झाला आहे. गेले चार-साडेचार माहिने जमिनीसंबंधीचे, स्थावरासंबंधीचे ज्यांचे व्यवहार अडले आहेत, ते आता मार्गी लागतील. जे नवीन घराच्या शोधात आहेत त्यांनी उद्यापासून जागेचा शोध सुरू करावा. ज्यांचे व्यवहार अर्धवट होऊन काही लोचे झालेत, त्यांनी आता पाठपुरावा करून काम करून घ्यावे. 

कन्या राशीच्या साडेसातीतला हा शेवटचा वक्री शनी होता. २ नोव्हेंबरला त्यांची साडेसाती संपेल आणि कटकटी बर्‍याच प्रमाणात कमी होतील. धनु राशीवाल्यांनी शनिउपासनेस आरंभ करावा. पुढे घाट सुरू होतो आहे. 

कुंभ लग्नाला राहु अष्टमात आला आहे. तर या लोकांनी पुढील दीड वर्ष, नीट झक मारावी. 

ज्या गोष्टींशी आपला संबंध नाही त्यात पडायला जाऊ नये. आपण बरं आपलं काम बरं, असं लायनीत रहावं. 

आपला,
(सावध) धोंडोपंत


॥ श्री साई समर्थ॥

Thursday, June 26, 2014

महादशास्वामी.......

॥ श्री स्वामी समर्थ॥
नमस्कार,

पत्रिकेवरून भविष्यकथन करतांना, महादशा व अंतर्दशा पाहून व त्यानंतर रविच्या रुलिंगप्लॅनेटमधील भ्रमणाच्या कालावधीनुसार कालनिर्णय केला जातो.  कृष्णमूर्तींनी रुलिंग प्लॅनेट्सची जी थिअरी मांडली, तीच आत्यंतिक अचूकतेकडे घेऊन जाते. 

नुसत्या गोचर भ्रमणांवरून अचूक कालखंड सांगता येत नाही. अन्यथा सप्तमथानावर गुरूची दृष्टी दर वर्षाआड पडते तेव्हा विवाह व्हायला हवा. तसा अनुभव येत नाही. 

महादशास्वामी हा ग्रह माणसाचं आयुष्य ठरवत असतो. आयुष्याचा त्याच्या अंमलाखाली येणारा कालखंड, जातकाला काय फळ देईल आणि काय देणार नाही, हे फक्त आणि फक्त महादशास्वामीच ठरवतो.

त्यामुळे, महादशास्वामीकडे दुर्लक्ष करून गोचर भ्रमण झिंदाबाद करणारे, अशा वाईट पद्धतीने आपटतात की सांगायची सोय नाही. 

त्यामुळे नवीन अभ्यासकांना हे सांगावेसे वाटते की, पत्रिका पाहतांना, सर्वात प्रथम जातकाचा महादशास्वामी लिहून घेण्याची सवय स्वत:ला लावून घ्या. तो कुठल्या स्थानाचा किती बलवान कार्येश आहे हे लिहून घ्या आणि मग तोंड उघडा.

मीनेचा शुक्र शुभस्थानी, गुरूच्या शुभयोगात वगैरे विवाह होण्यासाठी सर्व उत्तम गोष्टी पत्रिकेत असतील, पण महादशास्वामी जर २/७/११ चा कार्येश नसून ६/८/१२ चा कार्येश असेल, तर विवाहासाठी कितीही शुभयोग पत्रिकेत असोत, अगदी खोर्‍याने असोत ना,  त्या महादशेत त्याला वैवाहिक सौख्य नाही.

आणि या उलट, समजा वैवाहिक सौख्याच्या बाबतीत काही कुयोग कुंडलीत आहेत, पण महादशास्वामी ६/८/१२ चा कार्येश होत नसेल आणि वैवाहिक सौख्याच्या कारक ग्रह शुक्रसुद्धा या स्थानांशी संबंधीत नसेल, तर काहीही झालं तरी त्या महादशेत त्या व्यक्तीचा घटस्फोट वगैरे काहीही होणार नाही. 

आपला,
(तौलनिक) धोंडोपंत 

॥ श्री साई समर्थ॥