Friday, September 12, 2008

घर घेऊ का घर?

आयुष्यात स्वत:चे हक्काचे मालकीचे घर असणे ही प्रत्येकाची महत्वाकांक्षा असते. काहींचा अपवाद सोडून देऊ. त्यासाठी माणूस वाट्टेल ते करायला तयार असतो. कर्ज काढल्याशिवाय घर घेता येईल अशी बहुतेकांची परिस्थिती नसते. त्यामुळे कर्जाचा बोजा डोक्यावर घेऊन नवीन घरात प्रवेश करावा लागतो. हे अपरिहार्य आहे.

जर उत्पन्नाचे साधन चांगले असेल तरच कर्ज मिळते. अन्यथा एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी अशी मजल दरमजल करीत माणूस स्वत:चे घर व्हावे म्हणून धडपडत असतो. अनेकांना घर मिळते पण ती वास्तू लाभत नाही. नवीन घरात गेल्यावर भांडणे, वादविवाद असे मनस्ताप देणारे प्रसंग घडतात. झक मारली आणि घर घेतलं असे म्हणण्याची पाळी काही जणांवर येते.

जन्मकुंडलीनुसार मार्गदर्शन घेऊन जर घराचा प्रश्न सोडवला तर त्यामुळे अनेक समस्या टाळता येतात. घर घ्यावे की नाही, कधी घ्यावे, कोणत्या भागात घ्यावे, गृहप्रवेश कधी करावा अशा अनेक प्रश्नांची चोख उत्तरे ज्योतिषशास्त्र देऊ शकते. त्यासंबंधी थोडे विवेचन.

घर घेण्यासाठी मुळात कुंडलीत घराचा योग असणे आवश्यक आहे. तो जर नसेल तर कितीही आटापिटा केला तरी योग्य घर मिळत नाही आणि मिळाले तरी त्यापासून सुख-शांती लाभत नाही.

घर कोण घेऊ शकतं किंवा कोणाच्या मालकीचे स्वत:चे घर होऊ शकते याचे उत्तर असे की.

नवमांश कुंडलीतील चतुर्थेश हा जर जन्मकुंडलीत २, ४, ११, १२ यापैकी एका तरी स्थानाचा कार्येश असेल तर स्वत:चे घर होते. नुसते एवढे असून चालत नाही. तर नवमांश चतुर्थेशाचा किंवा लग्न कुंडलीतील चतुर्थेशाचा किंवा चतुर्थस्थानाचा शनी किंवा मंगळ यांच्याशी संबंध असणे आवश्यक आहे. शनी व मंगळ हे स्थावर मालमत्तेचे कारक ग्रह आहेत. त्यांचा चतुर्थस्थानाशी किंवा चतुर्थेशाशी संबंध असल्याशिवाय त्या व्यक्तिची स्वत:ची वास्तू होत नाही.

घर कधी घेता येते?

ज्यावेळेस जन्मकुंडलीत २, ४, ११, १२ या स्थानांच्या कार्येश ग्रहांच्या अंतर्दशा आणि विदशा सुरू असतात, तेव्हाच घर घेता येते. त्याचप्रमाणे हा दशास्वामी सुद्धा शनी आणि मंगळाशी संबंधीत असावा लागतो.

जर का शेतजमीन घ्यायची असेल किंवा फार्म हाऊस घ्यायचे असेल तर अंतर्दशा स्वामी शनी आणि मंगळ या दोघांशी संबंधीत असायला हवा.

नुसताच जर फ्लॅट घ्यायचा असेल, स्वत: जमीनीची मालकी न घेता केवळ केलेल्या बांधकामाची मालकी हवी असेल, तर दशास्वामीचा फक्त मंगळाशी संबंध असणे पुरेसे आहे. शनीशी नसला तरी चालेल.

काही लोकांची एकाहून जास्त घरे होतात. बहुतेक वेळा अशा व्यक्तिंचा नवमांश चतुर्थेश बुध असतो किंवा बुधाच्या नक्षत्रात असतो.

ज्यांच्या जन्मकुंडलीत चतुर्थस्थानात राहु असेल, त्या लोकांनी शक्यतो स्वत:च्या नावावर घर घेऊ नये. घेतले तर ते Joint नावाने घ्यावे. एकट्याच्या नावे घेऊ नये. तसेच त्या लोकांनी कुणाचे जुने घर घेऊ नये. अशा वास्तूला शाप असतो. नवीन घर घेऊन त्यांना समाधान, शांती मिळत नाही.

याचे कारण जर चतुर्थात राहु असेल किंवा नवमांश चतुर्थेश राहुच्या नक्षत्रात असेल किंवा राहुच्या युतीत असेल तर अशा लोकांना बाधित वास्तू मिळते. अशा घरात अवश्यमेव सतत भांडणे, आजारपण, संकटांची मालिका, नुकसान अशा गोष्टी वारंवार घडतात. चतुर्थात शुक्र आणि राहु यांची युती असेल तर त्या वास्तूला स्त्रीचा शाप असतो.

घरासाठी गुंतवणूक करतांना ज्या ग्रहाच्या विदशेत ४ आणि १२ ही स्थाने कार्यरत आहेत अशा विदशेत घराचे बुकिंग करावे. चतुर्थ हे घराचे स्थान आहे आणि १२ हे त्यासाठी होणार्‍या खर्चाचे.

तसेच जो विदशास्वामी ४ आणि ११ ही स्थाने देतो त्या काळात घराचे पझेशन घ्यावे. ती विदशा नवीन घराचा ताबा घेण्यास लाभदायक असते.

घरासाठी कर्ज मिळेल का?

जर महादशास्वामी २ व ६ या स्थानांचा कार्येश असेल तर कर्ज मिळविण्यात अडचणी येत नाहीत. त्या काळात घरासाठी कर्ज घ्यावे म्हणजे ते विनासायास मिळते. तसेच १२ वे स्थान हे कर्जमुक्तीचे स्थान आहे. महादशास्वामीने ते ही दिले पाहिजे तरच घेतलेले कर्ज फिटेल.

जुने घर कधी बदलावे?

ज्यावेळेस तृतीयस्थानाशी संबंधीत अंतर्दशा विदशा सुरू असतील तेव्हा राहते घर बदलावे. तृतीय हे चतुर्थाचे व्ययस्थान आहे त्यामुळे वास्तूत बदल करण्यास ते हातभार लावते.

जुने घर कोणी घ्यावे?

ज्यांचा नवमांश चतुर्थेश शनी आहे किंवा जन्मकुंडलीत चतुर्थस्थानात शनी आहे अशा लोकांनी जुने घर विकत घ्यावे. त्या लोकांना जुन्या वस्तू आणि वास्तू लाभतात. त्या लोकांनी गाडीसुद्धा सेकंड हॅण्ड घ्यावी.

आम्ही एका जातकाला असा सल्ला दिला होता. त्याला म्हटले की आठ लाख खर्च करण्यापेक्षा तू हेच मॉडेल सेकंड हॅंड मिळते का बघ. तुला खूप फायदा आहे.

सुरूवातीला तो म्हणाला की, " तशी माझी परिस्थिती नाही पंत. I can easily afford a new car."

आम्ही त्याला म्हटले की, " तू सेकंड हॅंड गाडी मिळते आहे का ते बघ. तुला उत्तम सेकंड हॅंड गाडी मिळेल आणि ती जास्त लाभेल. "

त्याने अंधेरीच्या पॉप्युलर कार बझारात जाऊन चौकशी केली. तिथे एका गृहस्थाची सहा महिने वापरलेली तीच गाडी विकायला होती. गाडीचे एकूण रनिंग केवळ अडीच हजार किलोमिटर झालेले होते. त्या माणसाला आखाती देशात नोकरी लागली म्हणून ती गाडी विकायची होती. उत्तम अवस्थेतली गाडी. फक्त अडीच हजार किलोमीटर चाललेली. आमच्या जातकाला दीड लाख रुपये स्वस्तात ती गाडी मिळत होती. दुपारी त्याचा पॉप्युलर कार बाझार मधून फोन आला. "पंत, असं असं आहे. काय करू?"

आम्ही त्याला सांगितले की, " तुझी गाडी तिथे उभी आहे, ती घे. उगाच वणवण करत बसू नको. "

त्याला काळा रंग लाभदायक होता. बरोब्बर त्याच रंगाची गाडी समोर उभी. तो सौदा त्याने केला. गाडी उत्तम लाभली. ज्योतिषशास्त्राच्या मार्गदर्शनाने दीड लाख रूपये वाचले.

आम्ही त्याला सांगितले की , " या फायद्याच्या एक टक्का रक्कम आमची फी म्हणून बॅंकेत जमा कर. "

संध्याकाळी पेढ्यांचा बॉक्स आणि पंधराशे एक रूपये दक्षिणा घेऊन तो आला. असो.

शनी जर चतुर्थात असेल किंवा चतुर्थेश शनीच्या नक्षत्रात असेल तर या लोकांना जुन्या गोष्टी फायद्यात मिळतात.

शेवटचा मुद्दा, घर कुणी घेऊ नये?

ज्यांचा महादशास्वामी आणि नवमांश चतुर्थेश तृतीयस्थानाचा एकमेव कार्येश असेल त्यांनी स्वत:च्या नावे घर किंवा वाहन घेण्याच्या भानगडीत पडू नये. ते कधीच लाभत नाही.

तूर्तास एवढेच.

आपला,
(मार्गदर्शक) धोंडोपंत

2 comments:

आदित्य गोंधळेकर said...

खुप छान लिहिलं आहेत पंत.. आता एखाद्याच्या नशिबात स्व-कमाई चे घर नसेल, पण वडलोपार्जित छान घर असेल, तर ते कसे समजते?

Anonymous said...

khupach sundar dhondopant,pharach changla lekh ahe ha...
dhondopant, saptamat jar shani-mangal yuti zali asel tar jatakala tyache kaay fal milate kivvha tyachya swabhavavar kaay parinaam hovu shakato he krupaya sangu shakal ka? mi ya yutibaddal pharach aikun ahe. apan mage lihilela lekh suddha mi vachala matra jatakachya babtit ya yutichi nemaki fale kaay astat he mala janun ghayache ahe. asha ahe apan majhi hi jidnyasa purna karal
aplach abhilashi
yogesh