


दिनांक २४/०९/२००८
सायंकाळी ७.३० वाजता नाशिकहून सौं. च्या बालमैत्रिणीचा फोन आला. त्यांच्या गप्पा सुरू असतांना सौ. ने विचारले की, " तिच्या मैत्रिणीच्या आईला बरे नाही आहे आणि त्यांची कुंडली पाहून त्यांना आजारातून कधी बरे वाटेल हे सांगायचे आहे."
"जन्मतपशील घेऊन ठेवा आणि रात्री ९.३० ला फोन करायला सांगा" असे सांगितले.
आम्ही रात्री ०८ वाजून १० मिनिटांनी कुंडली पाहिली तेव्हाचे रुलिंग प्लॅनेट्स असे होते.
L- मेष - मंगळ , S - पुष्य - शनी ( राहु) , R - कर्क - चंद्र (केतु) , D - बुध - बुध
प्रश्न शनीच्या नक्षत्रावर विचारला गेला होता. शनीच्या नक्षत्रावर एखाद्या व्यक्तिच्या आजारपणाबद्दल प्रश्न विचारला गेला असेल, तर उत्तर बहुधा नकारार्थी येते.
आजारपणातून मुक्तता होईल का? हा प्रश्न जन्मकुंडलीवरून पहात असल्यास या प्रश्नासाठी महादशा स्वामी विचारात घ्यावा. जर हा प्रश्न प्रश्नकुंडलीवरून पहायचा झाल्यास षष्ठ स्थानाचा उपनक्षत्रस्वामीवरून हा प्रश्न पहावा.
सध्या या कुंडलीला बुधाची महादशा सुरू आहे. वरील लग्न कुंडलीत बुध चतुर्थात असून तो लग्नेश व दशमेश आहे. तसेच तो रविच्या नक्षत्रात असून रवी चतुर्थात आहे आणि व्ययेश आहे. व्ययस्थान हे हॉस्पिटलायझेशनचे स्थान आहे.
गेल्यावर्षीपासून या बाईंचे मानसिक संतुलन ढासळले आहे. पूर्वी जरा हिस्टेरिक किंवा विचित्र वागायच्या. पण गेल्या वर्षभरात परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. सायकिऍट्रिस्टचे उपचार चालू आहेत. हल्ली त्या फार कमी वेळ भानावर असतात. घरात हातवारे करीत मोठ्यामोठ्याने असंबद्ध बडबडत राह्तात, मधूनच रडतात, मधूनच भिंतीवर धडका मारतात. त्यांना सांभाळणे ही मोठी डोकेदुखी झाली आहे. अशा परिस्थितीत कुटुंबियांची काय अवस्था होत असेल याची कल्पना केलेली बरी.
कुंडलीत बाराव्या भावावर नजर टाकल्यास मंगळ नेपच्यून आणि केतू हे तीन ग्रह बाराव्या भावाची फळे देणार आहेत. त्यात मंगळ आणि केतू हे अंशात्मक युतीत असल्याने ज्या ज्या स्थानांचा मंगळ कार्येश होईल त्या त्या स्थानांचा केतुसुद्धा कार्येश होतो.
मंगळ व्ययात असून मंगळाची वृश्चिक रास तृतीयात असल्याने केतुसुद्धा तृतीय स्थानाचा कार्येश होतो. केतुचा जेव्हा तृतीयाशी संबंध येतो तेव्हा ते लोक काही तरी गंडाने, मानसिक आजाराने पछाडलेले असतात. जेव्हा जेव्हा केतु ज्या स्थानात असतो त्या स्थानाशी संबंधीत दशा/अंतर्दशा येतात तेव्हा तेव्हा हे मानसिक आजार/ विकृती/ भयगंड उचल खातात.
सध्याच्या बुध महादशेत बुध रवीच्या माध्यमातून व्ययस्थानाची फळे देतो आहे त्यामुळे गेल्या वर्षभरात या आजाराने उचल खाल्ली आहे.
तसेच व्ययातला केतु हा जसा अध्यात्ममार्ग दाखवतो. तसेच तो केतु जर नेपच्यूनयुक्त व्ययात असेल तर हे लोक कोणत्यातरी भोंदू बाबाच्या नादाला लागून आयुष्यात फसतात. या कुंडलीत हा ही योग आहे.
या बाईंचा नाशिकचा एक भोंदू माणूस गुरू आहे. आणि त्यांच्या त्या तथाकथित "गुरू माऊली" च्या कृपेनेच हे अवघे विश्व चालले आहे, त्यांच्या गुरू माऊली काहीही करू शकतात, त्यांना अशक्य काहीच नाही वगैरे वगैरे... विकृत संकल्पना त्यांच्या मनात आहेत. त्यांची लहान मुलगी सुद्धा (जिने प्रश्न विचारला आहे तिची लहान बहीण) या गुरूमाऊलींच्या आशीर्वादासाठी तळमळत असते. तीही बहुधा तिच्या आईच्याच मार्गाने जात आहे अशी खंत प्रश्नकर्तीने व्यक्त केली आहे.
आता या बाई या मानसिक आजारातून बर्या होतील की नाही हे पाहू.
जर का दशास्वामी पंचम आणि लाभस्थान या दोन्ही स्थानांचा बलवान कार्येश असेल तर त्या ग्रहांच्या दशा अंतर्दशेत रोगमुक्ती होते.
या कुंडलीला सध्या बुधाची महादशा सुरू असून त्या महादशेअंतर्गत बुधाचीच अंतर्दशा सुरू आहे. बुध वर सांगितल्याप्रमाणे चतुर्थात असून तो लग्नेश आणि दशमेश आहे. तो रविच्या माध्यमातून चार आणि बारा या स्थानांचा बलवान कार्येश झाला आहे.
बुध कुंडलीत पंचमस्थानाचा आणि लाभस्थानाचा दूरान्वयेही कार्येश होत नाही. त्यामुळे रोगमुक्ती होऊन त्यांना पूर्णपणे बरे वाटणार नाही, असेच सांगावे लागले.
तसेच महादशास्वामी बुध हा रवीच्या माध्यमातून व्ययस्थानाची जोरदार फळे देईल. त्यामुळे या बाईंना हॉस्पिटलमध्ये (वेड्यांच्या) दाखल करावे लागेल, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.
या परिस्थितीतून त्या बाईंना बाहेर काढण्यासाठी त्यांचे ढोंगी गुरू (सॉरी त्यांची गुरूमाऊली) काहीही करू शकणार नाहीत. ग्रह आपापली कामे चोखपणे करीत असतात, हे वास्तव आहे.
आपला,
(वास्तववादी) धोंडोपंत





