

"हो हो .... त्यामुळेच या संधीबद्दल मोठ्या आशेने मी आलोय. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही यापूर्वी दिलेली कुंडलीसुद्धा सीडीवर घेऊन आलोय". असे सांगत ढापरे यांनी कुंडलीची सीडी समोर ठेवली.
"तुमची कुंडली आमच्या पेन ड्राईव्हवरसुद्धा जतन केलेली आहे. पण "विवक्षित ठिकाणची नोकरी लाभदायक होईल का?" हा प्रश्न जन्मकुंडलीवरून सोडवण्यापेक्षा प्रश्नकुंडलीवरून सोडवावा. त्यामुळे तुम्ही नंबर द्या, आपण प्रश्नकुंडली मांडू."
ढापरे यांनी नंबर काढण्यासाठी पुस्तक हातात घेऊन डोळे मिटले. मंत्राचा जप केला. श्री. ढापरे इंदूरच्या श्री नानामहाराजांचे अनुग्रहित आहेत. त्यामुळे त्यांनी कदाचित श्री नानामहाराजांनी दिलेला गुरूमंत्र म्हटला असावा. दोन तीन मिनिटे झाली तरी ढापरे डोळे मिटून मंत्रच पुटपुटत होते. आम्ही आपले वाट पहातोय की आत्ता डोळे उघडतील आणि नंबर देतील. मग दोन तीन मिनिटांनी त्यांनी डोळे उघडले व नंबर दिला,
"एकशे शहात्तर म्हणजे १७६"
आम्ही संगणकाचे पान उघडून बसलोच होतो. त्यामुळे आमचा नेहमीचा शॉर्टकट न मारता सरळ संगणकावर नंबर टाकून प्रश्नकुंडली केली. दिनांक ३० ऑक्टोबर २००८ रोजी सकाळी ११ वाजून २१ मिनिटांनी दादर, मुंबई अंक्षाशावर बनवलेली, केपी नंबर १७६ ची प्रश्नकुंडली वर दिलेली आहे. तसेच स्पष्ट ग्रह व स्पष्ट भाव व महादशा वर दिलेल्या आहेत. नेहमी प्रमाणे कुंडलीवर टिचकी मारल्यास कुंडली मोठी दिसेल हे सांगणे न लगे.
श्री. ढापरे यांनी नंबर देतांना बराच वेळ घेतला. मनात प्रश्न घोळवून घोळवून तो अभिमंत्रित करून विचारला. ढापरे यांनी प्रश्न खरोखर मनापासून विचारला आहे का ते पाहू. ढापरे यांना मिळणारी परदेशातील नोकरीची संधी लाभदायक आहे का अशा प्रश्न विचारायचा आहे. चंद्र प्रश्नकुंडलीत जातकाच्या मनातील विचार निर्देशित करतो. श्री ढापरे यांनी दिलेल्या १७६ नंबरच्या प्रश्नकुंडलित चंद्र लाभस्थानातच आहे. म्हणजे ढापरे यांचा प्रश्न तो व्यवस्थित निर्देशित करतो आहे. म्हणजेच ढापरे यांनी मनापासून प्रश्न विचारला आहे.
वरिल भावचलित कुंड्लीत षष्ठाचा सबलॉर्ड बुध आहे. बुध कुंडलीत दशमात असून दशमेशही आहे. तसेच तो सप्तमेशही आहे. बुध मंगळाच्या नक्षत्रात असून मंगळ स्वत: लाभात आहे आणि मंगळ व्ययेश आणि पंचमेश आहे. तसेच बुध हा स्वत: वक्री नाही आणि मंगळही वक्री नसल्यामुळे बुध वक्री ग्रहाच्या नक्षत्रातही नाही. जर प्रश्नसंबंधीत भावाचा उपनक्षत्रस्वामी वक्री ग्रहाच्या नक्षत्रात असेल तर जातकाची इच्छापूर्ती होत नाही. इथे बुध मार्गी ग्रहाच्याच नक्षत्रात आहे.
बुध खालील भावांचा कार्येश होतो.
बुध १०/७,१० न.स्वामी मंगळ ११/१२,५
वरिल विवेचनावरून बुध हा दशमाचा कार्येश आहे. तसेच तो लाभस्थानाचा बलवान कार्येश आहे. म्हणजेच जातकाची इच्छापूर्ती दाखवतो आहे. तसेच १२ वे स्थान हे परदेशगमनाचे स्थान आहे. आणि ५ वे स्थान हे नोकरीतील बदलाचे स्थान आहे. बुध मंगळाच्या माध्यमातून ११, १२, ५ या स्थानांचा बलवान कार्येश असल्यामुळे श्री. ढापरे यांना दुबईतील नोकरी अपेक्षित लाभ मिळवून देईल हे नक्की.
आता जरा "किडा" म्हणून ढापर्यांच्या प्रश्नकुंडलीतील लाभस्थानाचा उपनक्षत्रस्वामी काय म्हणतो ते पाहू.
ढापर्यांच्या प्रश्नकुंडलीत लाभस्थानाचा उपनक्षत्रस्वामी शनी आहे. शनी स्वत: नवमात( समुद्रावरून प्रवास) असून तो धनेश आणि तृतीयेश ( राहत्या घरापासून दूर) आहे. तसेच शनी हा शुक्राच्या पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात असून शुक्र स्वत: व्ययात( परदेशगमन) असून शुक्र स्वत: लाभेश( इच्छापूर्ती) व षष्ठेश ( नोकरी) आहे. त्यामुळे शनी परदेशातील नोकरीपासून लाभ मिळणार असेच सांगतो आहे.
आता शेवटचे म्हणजे महादशास्वामी अंतर्दशास्वामी पाहू. प्रश्नकुंडलीला सध्या गुरूची महादशा असून शुक्राची अंतर्दशा सुरू आहे. महादशास्वामी गुरू शुक्राच्या नक्षत्रात आहे. शुक्राचे कार्येशत्व वर पाहिले आहेच. शुक्र स्वत: व्ययात असून तो लाभेश व षष्ठेश असल्यामुळे नोकरीसाठीच्या परदेशगमनाला अत्यंत उत्तम आहे. तसेच पुढील अंतर्दशा स्वामी रवी, चंद्र, मंगळ व राहु हे देखील परदेशवास्तव्याला पोषक आहेत.
त्यामुळे या परदेशगमनाच्या संधीचा त्यांनी फायदा घ्यावा असे त्यांना सांगितले. ते तेथे पोहोचताच आमच्या दुबई, शारजा, अबुधाबी, अजमान, फुजेरा, रास- अल- खायमा येथील जातकांशी आम्ही त्यांचा परिचय करून देऊ." असेही सांगितले.
त्यांनी लगेच, " धोंडोपंत तुम्ही ग्रेट आहात हो..." असे म्हणत आम्हाला हरभर्याच्या झाडावर चढविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
पण आम्ही सांगितले की, " तुम्ही जगात कुठल्याही खंडात जा. जिथे जिथे मनुष्यवस्ती आहे, तिथे तिथे या धोंडोपंताचे जातक आहेत. आणि अमेरिका, इंग्लंड, युरोप आणि गल्फ या ठिकाणी एकूण जातकसंख्येच्या जवळजवळ ७५ टक्के आहेत. अर्थात ही स्वामींची कृपा आहे. "
आता मनातल्या प्रश्नाचे एवढे नि:संदिग्ध उत्तर दिल्यावर एखादा गुपचूप स्वामींच्या फोटोला नमस्कार करून गेला असता. पण ढापर्यांनी सहा महिन्यापूर्वी विचारलेला प्रश्न पुन्हा विचारला, " वैशालीला डॉक्टरांनी नोव्हेंबर शेवटच्या आठवड्यातली डेट दिली आहे. तुम्ही मागच्यावेळेस माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. आता तरी सांगा ना?"
खरे तर गर्भलिंगचिकित्सा, मग ती कोणत्याही मार्गाने असो त्याला आमचा कायम विरोध आहे. मुलगा होईल की मुलगी? असा प्रश्न जातकाने विचारल्यास, " काहीही झाले तरी काय फरक पडतो?" असा आमचा प्रतिप्रश्न असतो. आम्ही मुलगा होईल की मुलगी? या प्रश्नाचे कधीही उत्तर देत नाही. ढापरे यांनी सहा महिन्यापूर्वी हाच प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांना हेच उत्तर दिले होते.
आज त्यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला. "काही दिवसांचाच तर प्रश्न आहे. मग कळेलच." असे आम्ही त्यांना सांगितले.
संगणकावर रुलिंग कुंडली सुरू होती. ती प्रत्येक मिनिटाला अद्ययावत होत असते. प्रश्नवेळेस धनुलग्न सुरू होते. शनी ****** आहे म्हणजे******
तुम्हाला कळलं का, ढापर्यांना काय होईल? की नाही कळलं अजून?
आपला,
(सूचक) धोंडोपंत




