




दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सौ. प्राजक्ताताईंचा रात्री आठच्या सुमारास फोन आला. फोनवर त्यांचा आवाज एकदम घाबराघुबरा झालेला. फोन उचलल्यावर त्यांचे पहिले वाक्य असे
"पंत, माझी पार वाट लागलेय. काही सुचत नाही आहे. काही तरी मार्गदर्शन करा."
यावरून काय अर्थबोध होणार? आम्ही म्हटले, " काय झालाय ते नीट सांगा. म्हणजे काय करायचे ते ठरविता येईल."
" अहो, आज मी एका समारंभाला गेले होते. संध्याकाळी परत आल्यावर पाटल्या बांगड्या काढून ठेवल्या होत्या असं मला अंधुकसं आठवताय. त्यानंतर घरी पाहुणे आले होते. कानातले काढायचे राहिले. पाहुणे गेल्यावर कानातले काढले आणि लॉकरमध्ये दागिने ठेवण्याच्या वेळेस मला पाटल्या बांगड्यांची आठवण झाली. पण आता त्या कुठे गेलेत काही समजत नाहीये. सर्व घर शोधलं. पण पाटल्या व बांगड्या मिळत नाही आहेत. खूप टेन्शन आलाय. आईनी मला दिलेल्या पाटल्या बांगड्या आहेत त्या. त्या गेल्या तर मी संपेन. " वगैरे वगैरे.....
"आईनी दिलेल्या आहेत ना? मग नवरा काही ओरडणार नाही." आम्ही आपले वातावरणातील तणाव कमी करण्यासाठी म्हटले.
"असं कसं म्हणता? तुमच्या बायकोचे तिने माहेरहून आणलेले दागिने हरवले तर तुम्ही गप्प बसाल का?"
अवघड प्रश्न आहे. खोलात न गेलेलं बरं.
आम्ही म्हटलं की काळजी करू नका. आपण प्रश्नकुंडली मांडू. तुम्ही शांतपणे माझ्या बांगड्या मला परत मिळतील का? असा प्रश्न मनात धरा आणि आम्हाला एक नंबर द्या.
वहिनींनी क्षणाचाही विलंब न करता नंबर दिला ३११. आम्ही जरा धास्तावलो. विचार आला की या बाईने प्रश्न नीट मनात धरलाय की नाही? पण एकदा नंबर दिला की त्यानुसार प्रश्नकुंडली मांडावी. कारण हे दैवी मार्गदर्शन आहे. म्ह्टलं चंद्र सांगेलच मनात प्रश्न नीट धरलाय की नाही ते. तसेच त्यांनी प्रश्न २४९ पेक्षा मोठा दिलेला.
आली का पंचाईत? (इतरांची हो..... आमची नाही.) त्यामुळे कृष्णमूर्ती पद्धतीने प्रश्नकुंडली तयार करता येणार नाहीच. पण आम्ही कुठल्याही एका पद्धतीवर कधीच अवलंबून नसतो. प्राजक्ता वहिनींनी ३११ नंबर दिला होता. म्हटले, "चला प्रश्न नवमांश पद्धतीने हा प्रश्न पाहूया."
३११ नंबर ऐकल्यावर आम्हाला वाटले की वहिनींना त्यांच्या बांगड्या मिळणारच. कारण या नंबरमध्ये ३ आणि ११ आहेत. तिसरे स्थान हे बाहू, खांदे, हात, हातातील कौशल्य, हातातील दागिने, हस्ताक्षर म्हणजे जे जे हाताशी निगडीत आहे त्याचे स्थान आहे. आणि ११ वे स्थान हे लाभस्थान म्हणजे इच्छापूर्तीचे. बांगड्यांचा संबंध हाताशी येतो आणि प्रश्न त्या संबंधीच आहे त्या प्रश्नाची इच्छापूर्ती होणार म्हणजेच वहिनींना हरवलेल्या बांगड्या मिळणार.
पण म्हटले की, हे शॉर्टकट नकोत. रीतसर कुंडली मांडल्याशिवाय तोंड उघडायचे नाही. म्हणून गप्प बसलो.
वर दिनांक २६/११/२००८ रोजी रात्री ०८ वाजून २१ मिनिटांची मुंबई अक्षांशाची कुंडली दिली आहे. त्यावर टिचकी मारल्यावर ती नेहमीप्रमाणे मोठी दिसेल.
वरील कुंडलीत चंद्र पंचमात असून तो धनेश आहे. पंचम हे मौजमजा, विलास, पार्ट्या, छानछौकी दाखवते तसेच दागिने, पैसे, धन, रोकड हे धनस्थानावरून पाहिले जातात. वरील रुलिंग कुंडलीत चंद्र धनेश आहे म्हणजे वहिनींनी प्रश्न बरोबर विचारला आहे.
३११ नंबरच्या कुंडलीचा नवमांश तृतीयेश मंगळ येतो. वरील कुंडलीत मंगळ स्वत: षष्ठात असून तो षष्ठेश व लाभेश आहे. मंगळ शनीच्या नक्षत्रात असून शनी स्वत: तृतीयात आहे. तसेच शनी अष्टमेश व नवमेश आहे. अष्टमाचा संबंध मनस्ताप दर्शवतो. तसेच मंगळाची दृष्टी ९,१२,१ स्थानांवर आहे. म्हणजेच वरील कुंडलीतील नवमांश तृतीयेश मंगळाचे कार्येशत्व असे लिहावे लागेल.
मंगळ ६/ ६, ११ नक्षत्रस्वामी शनी ३/ ८, ९ ( मंगळाची दृष्टी ९, १२, १)
वरील जंत्रीवरून असे लक्षात येईल की प्रश्न नवमांश कुंडलीतील तृतीयेश मंगळ हा प्रश्नलग्नकुंडलीत लाभस्थानाचा कार्येश आहे. तसेच तो तृतीय स्थानाचा (बांगड्या) अष्टमस्थानाचा ( मनस्ताप) याचाही कार्येश आहे. त्यामुळे वहिनींना मनस्ताप होऊन का होईना हरवलेल्या बांगड्या परत मिळतीलच.
तसेच या कुंडलीतील नवमांश लाभेश गुरू आहे. गुरू स्वत: सप्तमात असून सप्तमेश आणि दशमेश आहे. गुरू रवीच्या नक्षत्रात असून रवी षष्ठात व तृतीयेश आहे. गुरूची दृष्टी ११, १, ३ या स्थानांवर आहे. गुरूचे कार्येशत्व असे आहे.
गुरू ७/ ७, १० नक्षत्रस्वामी रवी ६/ ३ (गुरूची दृष्टी ११, १, ३)
वरील जंत्रीवरून हे लक्षात येईल की, नवमांश लाभेश हा प्रश्नलग्नकुंडलीत तृतीय स्थानाचा कार्येश आहे. वहिनींना बांगड्या मिळणारच मिळणार. तसेच गुरूची नववी दृष्टी तृतीयस्थानावर आहे म्हणजे बांगड्या सुरक्षित आहेत.
दागिन्यांचा विचार करतांना नवमांश धनेश काही लोक विचारात घेतात. आम्ही दागिने कुठल्या भागावर धारण केले आहेत तो भाग कुंडलीत कुठल्या स्थानाने निर्देशीत होतो त्यानुसार कार्येशत्व विचारात घेतो. इथे सांगायची गोष्ट ही की, जरी नवमांश धनेशावरून विचार केला तरी तो गुरू आहे आणि लाभस्थानाचा कार्येश आहे. म्हणजे तो सुद्धा बांगड्या मिळणार हेच सांगतो आहे.
आता प्रश्न असा निर्माण होतो की कधी मिळतील? तर नवमांश धनेशाच्या राशीतून किंवा नवमांश धनेशाच्या नक्षत्रातील ग्रहांच्या राशीतून चंद्राचे भ्रमण होते तेव्हा हरवलेले पैसे, दागिने सापडण्याची शक्यता सर्वात जास्त असते.
वरील कुंडलीत नवमांश धनेश गुरू आहे. प्रश्नवेळेस चंद्र तुळेत आहे. नंतर तो वृश्चिकेत जाईल. त्यानंतर तो गुरूच्या धनु राशीत जाईल. त्यावेळेस हरवलेल्या बांगड्या सापडतील. हा काळ ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर असा आहे.
त्यानुसार वहिनींना, " तुमच्या बांगड्या सुरक्षित असून ४/५ दिवसांनी म्हणजे ३० नोव्हेंबर किंवा १ डिसेंबरला मिळतील. काळजी करू नका पण यापुढे काळजी घ्या." असे सांगितले.
३० नोव्हेंबरला सकाळी त्यांचा मुलगा बेडरूममधल्या वॉलयुनीट मधील साऊंडसिस्टीमशी काहीतरी उपद्व्याप करत होता. तिथल्या एका स्पीकरशी काहीतरी खाडखुड करत असतांना, तिथे त्याला बांगड्या सापडल्या. त्याने वहिनींना बोलवून तो ऐवज त्यांच्या स्वाधीन केला.
३० नोव्हेंबरला चंद्र धनेत केतूच्या मूळ नक्षत्रात होता. मूळ नक्षत्रात अनेक गोष्टी मूळपदावर येतात या शास्त्रीय विधानाची प्रचिती आली. लगेच वहिनींचा फोन आला. पण आम्ही दुखवट्यामुळे लेखन करीत नव्हतो आणि नुकतीच अमावास्या संपल्यामुळे कामाचा व्याप यात या घटनेबद्दल पार विसरून गेलो.
रविवारी वहिनींना मिठाईच्या बॉक्ससकट घरी पाहिलं, तेव्हा एकदम किस्सा आठवला.
आम्ही वहिनींना म्हटले, " आज घरी गेल्यावर सर्व दागिने नीट काढून ठेवा. नाहीतर पुन्हा नंबर द्यायला लागेल."
आपला,
( नतद्रष्ट) धोंडोपंत