Monday, October 19, 2009

शकुन- अपशकुन -- भाग ४

|| श्री स्वामी समर्थ ||


लोकहो,


दिवाळी सुरू आहे. रुचकर फराळाची ताटे तुमच्यासमोर आलेली असतील. आमच्याकडूनही हा खमंग वेब-फराळ. 


आमच्या असे लक्षात आले आहे की, बहुसंख्य वाचकांना नंबरावरून एका सेकंदात केलेले भविष्यकथन, अनुभसिद्ध दैवी तोडगे व शकुनांवरून मिळणारे दैवी संकेत हे विषय सर्वात प्रिय आहेत. स्वाभाविक आहे. ज्या गोष्टींची अनुभूती आपण स्वतः घेऊ शकतो त्या गोष्टींबद्दल जिव्हाळा आणि आकर्षण हे सर्वात जास्त असतं.


तेव्हा अनेकांच्या मागणीला मान देऊन शकुनांवर अजून एक लेख लिहीत आहोत. खरं तर त्याला मागणी म्हणण्यापेक्षा हट्ट म्हणणे योग्य आहे. शकुनांबद्दल चांगले तीन लेख लिहिलेत तरी वाचकांचे " अजून लिहा.... अजून लिहा" हे काही संपत नाही. 


थकून गेलो तरी फुलांचा सुरूच हेका
अजून गा रे! अजून गा रे!... अजून काही....एक गोष्ट अशी आहे की, शकुन हा विषय लोकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. त्यावरून जे मार्गदर्शन मिळतं, त्यासाठी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास असण्याची गरज नसते. समोर असलेल्या घटनेचा योग्य अन्वयार्थ लावता आला तर शकुनातून उत्तम मार्गदर्शन मिळू शकतं. त्यामुळे लोकांना या विषयाबद्दल आत्यंतिक ओढ असणे स्वाभाविक आहे. त्यांच्यासाठीच शकुनांवर हा लेख.


ज्यांनी पहिले लेख वाचले नसतील त्यांच्यासाठी शकुनांवरील पूर्वीच्या लेखांचे दुवे
 तर शकुनांबद्दल अजून काही किस्से:-


एकदा मायक्रोवेव्ह घेण्यासाठी आम्ही सौभाग्यवतींसोबत नेहमीच्या दुकानात गेलो होतो. खरं सांगायचं तर, मायक्रोवेव्ह वगैरे गोष्टी आमच्या घरात आणि विचारसरणीत बसणार्‍या नाहीत व शोभतही नाहीत. 


चुलीवरच्या भाताची चव कुकरमध्ये शिजवलेल्या भाताला येते काय? चुलीवरच्या भाताला धरलेली खरपुडी मीठ पेरून खाण्यात जी मजा आहे ती या आधुनिक उपकरणात गरम केलेल्या पदार्थात असत नाही. या आधुनिक गोष्टींची आधी सतराशे-साठ बाळंतपणं करायची आणि मग विद्युतप्रवाहाने गरम झालेलं बेचव अन्न खायचं.


पण झालं असं की सौं. च्या पुष्पा नावाच्या मैत्रिणीने मायक्रोवेव्ह घेतला आणि मग तो आपल्याकडे नाही म्हणजे आपल्या आयुष्याला काही अर्थ नाही असे सौ. ना वाटायला लागले. रोज पुष्पाच्या मायक्रोवेव्ह च्या करामती आम्हाला घरात ऐकायला मिळायच्या. एका मिनिटात कसे पदार्थ गरम होतात... यंव होतं आणि त्यंव होतं.


खरं तर ही पुष्पा अत्यंत आळशी बाई. त्यामुळे तिच्या आळशीपणाला सहाय्यभूत ठरणार्‍या जिन्नसांचा संग्रह ती करत असते. तिला काय फरक पडतोय म्हणा. तिचा नवरा "फायझर" मध्ये पैसा खेचतोय आणि ही उडवतेय.


पण रोज सकाळी उठल्यावर त्या पुष्पा मेननच्या अभंगाने आमची मंगलप्रभात व्हायला नको म्हणून सौं. ना म्हटलं  "घाल अक्कलखाती दहा हजार आणि घे मायक्रोवेव्ह. किती वेळा तो वापरला जातोय ते पाहू."


या गोष्टी सुरुवातीस वापरल्या जातात आणि काही दिवसांनी त्यांची नवलाई संपली की धूळ खात पडतात. आमच्या घरी एक ओव्हनही असाच पडलेला आहे. दोन तीनदा नानकटाई झाली त्यात. अगदी हातात ग्लोव्हज वगैरे घालून. पण आता धूळ खात पडलाय. असो.

तर आम्ही नेहमीच्या दुकानात गेलो. सौभाग्यवतींनी मायक्रोवेव्ह पसंत केला. क्रेडिट कार्ड काढण्यासाठी पाकिटात हात घालणार तोच दुकानातले दिवे गेले. आम्ही एकदम थबकलो. 


सौ. ना म्हटले, " हा अपशकुन आहे. आपण ही खरेदी टाळलेली बरी."


लगेच सौं. चा मूड गेला. " तुमचं दरवेळेस हे असचं असतं. एकाही गोष्टीचा आनंद तुम्ही कधी घेऊन देत नाही." वगैरे वगैरे.......


म्हटलं, " हा मायक्रोवेव्ह नीट चालणार नाही हे दैवी मार्गदर्शन आत्ता मिळाले आहे. हा सारखा बिघडत राहील. माझा माझ्या शास्त्रावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आपण आत्ता हा नग न घेता पुन्हा येऊ आणि एखादा दुसरा मायक्रोवेव्ह घेऊ."


पुढे प्रकरण हातघाईवर आलं. " नकोच मला मायक्रोवेव्ह" इथपर्यंत.


आमचे संभाषण तो दुकानाचा मालक ऐकत होता. या बाईने नवर्‍याचे ऐकले तर हातचे गिर्‍हाईक जाईल ही चिंता त्याला होती. त्याने काही कारण नसतांना आम्हाला सांगायला सुरूवात केली.


म्हणाला, " अहो ही कंपनी फार चांगली आहे. टीव्हीवर ऍडव्हरटाईज पाहिली असेल तुम्ही. आत्तापर्यंत आम्ही शेकडो पीस विकले अजून कोणाची कंप्लेंट नाही. तुम्हाला सर्वात चांगली गोष्ट दिली आहे."


आम्ही सौ. ना म्हटलं, " नाहीतरी दिवे गेलेत. म्हणजे क्रेडिटकार्ड पण ऍक्सेप्ट होणार नाही.  पुन्हा येऊन खरेदी करू."


त्यावर त्या दुकानदाराने अजून तारे तोडले. "अहो तुमच्याकडून पैशाचा काही प्रॉब्लेम नाही. डिलिव्हरी करायला माणूस पाठवेन त्याच्याकडे कॅश द्या किंवा चेक द्या."


एकंदरीत वातावरण बघून आज मायक्रोवेव्ह घरी आला नाही तर आमचं ६/१२ लागायचं असं वाटायला लागलं.


शेवटी त्या मायक्रोवेव्हची खरेदी झाली आणि ते खोकडं घरी आलं. आल्यानंतर त्यांनी त्याचे प्रताप दाखवायला सुरूवात केली. 


काही दिवसात त्यात शॉर्ट सर्कीट होऊन धूर व जळल्याचा वास यायला लागला. कॉईल गेली. मग चालू केला तरी आत दिवा दिसायचा पण अन्न गरम व्हायचं नाही अशी बरीच नाटकं होऊन बिघडत बिघडत तो कसाबसा चालवला आणि वॉरन्टी संपल्यावर काढून टाकला.
----------------------------------------------------------------------------------


आमचे एक स्नेही ठाण्याला राहतात. त्यांच्या सोसायटीचे एक वॉचमन आहेत. हे गृहस्थ अत्यंत सज्जन असून खूपच प्रामाणिक आणि सुसंस्कृत आहेत. त्यांच्या मुलीच्या विवाहाबद्दल त्यांना मार्गदर्शन हवे होते म्हणून आमच्या स्नेह्यांनी त्यांना आमच्याकडे पाठवले होते. त्यांच्या एकंदर आर्थिक स्थितीची कल्पना आमच्या स्नेह्यांनी आम्हाला दिली होती. 


ज्याची आर्थिक स्थिती खरोखर चांगली नाही, अशा लोकांची कामे आम्ही एक पै सुद्धा न घेता करतो. ज्याला मार्गदर्शनाची गरज आहे तो, पैसे नाहीत म्हणून कधीही वंचित रहात नाही. 


हे करतो म्हणून स्वामींचा वरदहस्त आमच्यावर आहे.  कृत्रिम गरीबीचा आव आणणारेही आम्हाला लगेच कळतात. असो.


तर या गृहस्थांच्या मुलीची कुंडली पाहून पुढील सहा महिन्यात तिचा विवाह होईल, उत्तम स्थळ मिळेल,  असे आम्ही त्यांना सांगितले होते. त्यानंतर  महिना-दीड महिन्यांनी आम्ही त्या स्नेह्यांकडे ठाण्याला गेलो होतो आणि संध्याकाळी परत निघालो.  त्याच वेळेस या गृहस्थांची ड्युटी संपली म्हणून ते ही घरी जायला निघाले होते. 


आम्ही सोसायटीच्या बाहेर पडतांना तेही आमच्याबरोबर चालू लागले. चालताचालता इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि  तलावपाळी जवळ आल्यावर त्यांनी त्यांच्या मुलीला एक स्थळ सांगून आल्याचे सांगितले आणि "बघूया काय होताय?" असे म्हणाले.


तेवढ्यात "प्रासंगिक करार"  अशी पाटी लावलेली एक एस.टी. लग्नाचे वर्‍हाड घेऊन तलावपाळीच्या सिग्नलला उभी होती. थर्माकोलवर त्या वधु-वरांची नावे लिहून " शुभ विवाह" असा थर्माकोलचा बोर्ड एसटीच्या पुढ्यात लावला होता. एसटीला फुलांचे हार घातले होते. 


त्या एसटी कडे बोट दाखवून आम्ही त्या गृहस्थांना म्हटले, " माने, मांडव घालायला लागा." माने खुश झाले. "पंत, तुमच्या तोंडात साखर पडो" म्हणाले.


पुढे त्या सांगून आलेल्या स्थळाशीच तिची सोयरीक जमून विवाह झाला. स्थळ उत्तम मिळाले.  ते ही त्यांच्या सांगलीजवळच विट्याचे. मुलगा सुसंस्कृत असून घर दार शेती सर्व उत्तम आहे. पोरगी सुखाने नांदतेय हे पाहून मान्यांची मोठी चिंता मिटली.
------------------------------------------------------------------


 एकदा कोल्हापूरला निघालो होतो. कोल्हापूर म्हणजे "कोंडुसकर ट्रॅव्हल्स" हे आमचे समीकरण ठरलेले आहे. त्या महालक्ष्मी एक्सप्रेस आणि सह्याद्री एक्सप्रेसच्या नादी आम्ही लागत नाही.  मस्त रात्री साडेनऊला व्होल्वो बसमध्ये बसायचं. सकाळी ६ वाजता कोल्हापुरात कावळा नाक्यावर उतरायचं.

तर रात्री सव्वानऊ च्या सुमारास दादर टीटीला कोंडुसकर ट्रॅव्हल्सच्या चित्रा थिएटरच्या बाजूच्या ऑफिसमध्ये सामान ठेवून फुटपाथवर पान खाऊन पिचकार्‍या टाकत उभे होतो.


या व्होल्वो बसमध्ये पान तंबाखूवाल्यांची फार पंचाईत होते. त्या बसच्या काचा उघडत नाहीत त्यामुळे बस चालू झाल्यावर थुंकायला मिळत नाही. म्हणून म्हटले आधी व्यसनं उरकावीत.

तेवढ्यात समोरच्या लुनेट बिल्डिंगमध्ये राहणारे आमचे एक स्नेही तिथे भेटले. त्यांना एका खाजगी कंपनीत पैसे गुंतवायचे होते. तो कंपनीवाला दरमहा सात ते आठ टक्के व्याज देत होता. त्याची पेपरात जाहिरातसुद्धा येत असे. हजारो लोकांनी त्याच्याकडे पैसे गुंतवले होते.


 त्या गृहस्थांनी आम्हाला प्रश्न केला की, " पंत, गुंतवू ना पैसे याच्याकडे?"


आम्ही त्यांना नंबर द्यायला सांगितले. त्यांनी बारा नंबर दिला. आम्ही म्हटले, " बाराच्या भावात जाल. पैसे गुंतवू नका."


त्यावर ते आम्हाला सांगायला लागले की, " अहो आठ टक्के महिना व्याज देतोय तो. एक वर्षभर व्याज मिळाले तरी आपले मुद्दल वसूल. मग काही का होईना त्याचं."


आम्ही त्यांना म्हटले की, " तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय की त्याचे मार्केटिंग करताय?"


ते गप्प बसले. एवढ्यात मुंबई पोलिसांची एक व्हॅन सायरन वाजवीत सुसाट वेगाने समोरच्या फ्लाय ओव्हरवरून जात होती. त्या व्हॅनकडे पाहून आम्ही त्यांना म्हटले, " या इसमाला लवकरच पोलिस पकडतील."


अगदी तसेच झाले. दोन महिन्यात तो इसम गजाआड गेला. कोट्यावधी रुपयांचा गंडा त्यांने हजारो लोकांना घातला होता.


वर्तमानपत्रांनी देखिल हे प्रकरण खूप लावून धरले. त्यामुळे त्याच्यावर फौजदारी कारवाई झाली आणि त्याचा खेळ संपला.


त्या गृहस्थांचे नशीब बलवत्तर म्हणून त्या दिवशी ते आम्हाला भेटले.


आपला,
(भविष्यज्ञ) धोंडोपंत

1 comment:

geeta said...

वा,
नेहमीप्रमाणेच रोचक आणि उद्बोधक लेख !!
गीता