Sunday, April 26, 2009

पैशामागे पळते दुनिया.....

लोकहो,

नुकतीच लिहिलेली ही एक गझल तुमच्यासाठी.


पैशामागे, पळते दुनिया, धावाधाव किती?
लाखो रुपये, कमावले पण, अजुनी हाव किती?

पैशातच जोखतात येथे, सारे इतरांना
भणंग मी मग, येइल माझा, येथे भाव किती?

दारी याचक, येता त्याला, छदाम ना मिळतो
जुगार दारू, यावर त्यांचा, रंगे डाव किती?

सद्गुण आणिक, सात्त्विकतेची, किंमत शून्य इथे
उदात्त मंगल, पवित्रतेला, उरला वाव किती?

असे वाटते, यांना की सुख, मिळते पैशाने
अनाचार व्यभिचारानेही होते नाव किती?

पैशासाठी, खून दरोडे, विक्रय देहाचा
समजत नाही, सोसायाचे, अजून घाव किती?

"नकोस राहू, इथे 'अगस्ती', निघून चल जाऊ"
" कोकणातला, आहे अपुला, सुंदर गाव किती?"


आपला,
(अस्वस्थ) धोंडोपंत

रचनाकाल - शनिवार, दिनांक २५ एप्रिल २००९

वैशाख शुद्ध प्रतिपदा, शके १९३१

रात्री १२ वाजून १५ मिनिटे

मुंबई

Friday, April 24, 2009

दशा दशा ही दशमाची


लोकहो,

"जगी सर्वसूखी असा कोण आहे?"

या समर्थांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात अनेक लोकांनी हयाती घालवल्या, पण तसा कुणी सापडला नाही. आम्हीही अशा सुखी माणसाच्या शोधात पूर्वी भटकलो. पण तसा कुणी दिसेना.
पूर्वी आम्हाला वाटायचं की जगात सर्वसुखी आम्हीच !!
पण लग्न झाल्यावर तो गैरसमज दूर झाला. सुख पाहता जवांपाडे। दु:ख पर्वताएवढे॥ हे जे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे त्याची प्रचिती लग्न झाल्यावर येते असे आमचे मत आहे. असो.

पण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आणि व्यासंग केल्यावर जगातली अनेक रहस्ये उलगडली. जीवनाचे अनेक अनुदित कंगोरे ज्योतिषशास्त्राने उघडकीस आणले. या दिव्य शास्त्राने दिलेल्या अनुभूतीतून आम्ही नवीन व्याख्या निर्माण केल्या.

सुखी माणसाची आमची व्याख्या अशी की,
" ज्या माणसाच्या आयुष्यातील सर्व दशा या २ / १० / ११ स्थानांशी निगडित असतील तो माणूस सर्वसुखी. ज्यांचा विवाह झालेला नाही, किंवा होऊन नसल्यासारखा आहे त्यांनी सहावे स्थानही यात घ्यावे. "

आमच्या विधानाने पारंपारिक ज्योतिषाचा पगडा मनावर असलेले वाचक चकित होतील. पण आम्ही जे काही लिहितो ते फार विचारपूर्वक लिहितो हे त्यांना माहित असल्यामुळे धक्का बसला तरी ते त्यातून सावरतील.

आम्ही वर जे विधान केले आहे त्याचे कारण असे की, बदलत्या समाजानुसार आपल्या यशाच्या कल्पना बदललेल्या आहेत. पारंपारिक ज्योतिषात कुंडलीतील ५ आणि ९ ही स्थाने अत्यंत शुभ मानली गेली आहेत. त्यांना कोणस्थाने असे म्हणतात.

आम्हाला हे सांगू द्या की, माणसाच्या करिअरची आणि पर्यायाने त्याच्या आयुष्याची वाट लावणारी ५ आणि ९ ही दोन स्थाने आहेत.

"भाग्येशाची दशा आहे हो आणि भाग्येश पंचमात आहे! एका कोणस्थानाचा स्वामी दुसर्‍या कोणस्थानात! आता तुमचे भाग्य उघडणार!" असली पानचट विधाने जे कोणी ज्योतिषी करतात त्यांची कीव करावी तेवढी थोडीच.

भाग्येशाची महादशा किंवा महादशास्वामीचा नक्षत्रस्वामी भाग्यात आणि पंचमेश किंवा अष्टमेश असली ग्रहस्थिती म्हणजे त्याचे हाल कुत्रा खाणार नाही या लायकीची आहे. असो. ते जाऊ दे. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी लिहू.

आजचा मुद्दा हा आहे की आयुष्यभर २/ १० / ११ च्या दशा ज्याला आहेत तो आजच्या स्पर्धात्मक युगात खरा भाग्यवान. त्यातही नुसती २/११ पेक्षा दशमस्थानाच्या दशा आयुष्यात असणे अत्यंत मोलाचे आणि महत्त्वाचे आहे.

दशम हे पत्रिकेतील सर्वात महत्त्वाचे स्थान आहे असे आम्ही मानतो. त्याला कर्मस्थान म्हणतात. चरितार्थासाठी केलेली धडपड दशमावरून पाहिली जाते. आयुष्यातील करिअरच्या दृष्टीने महत्त्वाच्या कालखंडातील महादशास्वामीचा नक्षत्रस्वामी दशमात असेल किंवा दशमेश असेल तर त्या व्यक्तीला भरपूर प्रतिष्ठा, प्रसिद्धी, मानमरातब, सन्मान इत्यादींची प्राप्ती होती, ज्याला आम्ही भाग्य असे म्हणतो.

दशमाची आलेली दशा माणसाला राखेतूनही बाहेर काढते आणि वैभवाच्या शिखरावर नेऊन बसवते. अर्थात त्या महादशास्वामीचा ५/८/९ असल्या वाईट स्थानांशी संबंध असता कामा नये.

दशम स्थान लागल्याशिवाय समाजात प्रतिष्ठा आणि मानसन्मान मिळणे केवळ दुरापास्त आहे.
वर अशाच एका दशमाच्या दशेने जीवन पालटलेल्या व्यक्तीची कुंडली दिली आहे ज्यांचे नाव आहे बाबा रामदेव.

रामदेव बाबा हे योगशिक्षक म्हणून सर्वांना परिचित आहेत. गेल्या काही वर्षात हजारो नव्हे तर लाखो लोकांना योगमार्गाकडे वळवून त्यांना निरोगी जीवन जगण्यासाठी बाबा रामदेवांनी मोलाचे कार्य केले आहे हे आपण जाणताच.

जरा या कुंडलीकडे पहा.

ही कुंभ लग्न आणि मीन राशीची कुंडली आहे. शनिच्या वायुतत्त्वाच्या राशीचे लग्न तपोनिष्ठ व्यक्ती जन्माला घालते.
या कुंडलीत पंचम स्थानात केतू आहे. आणि भाग्येश शुक्र हा लाभस्थानात गेलेला आहे. तसेच उपासनेचा आणि अध्यात्माचा कारक गुरू स्वतः धनु राशीत असून तो ही लाभात आहे.
हे तीन योग बाबा रामदेवांना अध्यात्माकडे वळविण्यासाठी पुरेसे आहेत.

खरी मजा पुढे आहे.
बाबा रामदेवांना जी अफाट प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली ती गेल्या सहा सात वर्षात मिळालेली आहे. तसेच ही प्रसिद्धी त्यांचे दूरदर्शनवर कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मिळालेली आहे. २००२ पूर्वी बाबा रामदेवांना फारसे कुणी ओळखतही नव्हते.
महादशांच्या तक्त्यावर नजर टाकलीत तर कळेल की बाबा रामदेवांना २४ सप्टेंबर २००२ रोजी रविची महादशा सुरू झालेली आहे. त्यांच्या कुंडलीतले रविचे कार्येशत्व असे आहे.

रवि ११/ ७ नक्षत्रस्वामी रवि/ उपनक्षत्रस्वामी मंगळ १०/ ३.१० ( रविची दृष्टी ५)

सप्टेंबर २००२ नंतर रविची महादशा सुरू झाली आणि बाबा रामदेव प्रसिद्धीस आले. महादशास्वामी रवि दशमस्थानाचा बलवान कार्येश आहे. तसेच तो तृतीयस्थानाचाही बलवान कार्येश आहे. तृतीय स्थानावरून इंटरनेट, इमेल, मिडिया, कम्युनिकेशन्स, टिव्ही चॅनल्स या गोष्टी पाहिल्या जातात. दशमेश मंगळ स्वत: दशमात बसला आहे आणि महादशास्वामी त्याच्याच नक्षत्रात असल्यामुळे दुधात केशर!

दशमस्थान प्रभावीपणे लागल्यावर "देणार्‍याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी" अशी अवस्था होते. बाबा रामदेवांच्या हरिद्वारच्या भव्य आश्रमाचे संपूर्ण काम हे त्यांच्या रवी महादशेत झालेले आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी.

त्यानंतर आता म्हणजे सप्टेंबर २००८ पासून बाबा रामदेव यांना चंद्र महादशा सुरु झाली आहे ती २०१८ पर्यंत आहे.
आणि रामदेव बाबांच्या कुंडलीत चंद्र अष्टमस्थानाचा बलवान कार्येश आहे. महादशास्वामी अष्टमाचा बलवान कार्येश असेल तर लोकापवादाला सामोरे जावे लागते. मानहानीचे प्रसंग उद्भवतात.

त्यामुळे ....................... जरा जपून.
कारभारी दमानं
असो.

बरं, एक सांगायचं राहून गेलं.

आम्हालाही सध्या तृतीय आणि दशमाची दशा सुरू आहे.
आपला,
(श्री श्री) बाबा धोंडोपंत

Wednesday, April 22, 2009

मावळतीचे रंग अलौकिक......

लोकहो,

नुकतीच एक नितांत सुंदर कविता सुचली ती येथे आपल्या आस्वादासाठी देत आहोत.

स्वत:च्या कवितेला नितांत सुंदर वगैरे म्हणणे म्हणजे जरा अती होतयं...... पण वस्तुस्थिती ही आहे की आम्हाला स्वत:ला ही कविता फार फार आवडली आहे.

तुम्हालाही आवडते का पहा...


मावळतीचे, रंग अलौकिक, देती आठवणी
ओठांवरती, सहजच येती, ओलेती गाणी

नावा सार्‍या, आल्या परतुन, सूर्य बापुडा बुडे
घनतिमिराचे, राज्य सावळे, पसरे चोहिकडे

चिमण्या आल्या, खोप्यामध्ये, भरून गेले तरू
रातकिड्यांची, किरकिर थोडी, झाली येथ सुरू

पिंपळपानांची ही सळसळ, लावी वेड जीवा
क्षितिजावरती, मार्ग क्रमतसे, व्याकुळ एक थवा

सायंकाळी आठवणींचा बुरूज ढासळतो
मुकी खिन्नता दाटुन येता आतुन मी हलतो

आसमंत हा भरून आला अता प्रिये ये ना
तुझ्या मिठीची शाल पांघरुन ऊब जरा दे ना....


आपला,
(विरहव्याकूळ) धोंडोपंत

रचनाकाल - चैत्र कृष्ण द्वादशी, शके १९३१

मंगळवार दिनांक २१ एप्रिल २००९ रात्री १२ वाजून ३० मिनिटे

मुंबई

Friday, April 17, 2009

सिझेरियन??? छे.. छे.. नॉर्मल डिलिव्हरी....

लोकहो,

दिनांक २८ जानेवारी २००९ रोजी पाहिलेली ही कुंडली.

नववा महिना लागलेल्या एका मुलीने फोनवर विचारलेला हा प्रश्न. अर्थात डिलिव्हरी व्यवस्थित होईल ना????

या मुलीची जन्मकुंडली आम्ही सप्टेंबरमध्ये पाहिली होती जेव्हा तिला चौथा महिना लागला होता. तिच्या एका मैत्रिणीने (ज्या मैत्रिणीला आम्ही ओळखत नाही) तिला आमच्या ब्लॉगाचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधायला सांगितला होता.
असे अनुभव खूप येतात की अनेक लोक ब्लॉगाचे वाचक असतात, ते आमचे नाव सुचवितात पण त्या नाव सुचविणार्‍यांचा आणि आमचा पूर्वपरिचय नसतो. काही गतजन्मीचे ऋणानुबंध निश्चित असावेत, एवढेच म्हणता येईल. असो.

तर या मुलीने संपर्क साधला तेव्हा तिला तिसरा महिना संपून चौथा लागलेला होता. आधी दोन वेळा या मुलीचे मिसकॅरेज झालेले. त्यामुळे तिसर्‍या वेळेस ती गर्भार राहताच प्रचंड ताण तिच्याच नव्हे तर घरच्या सर्व मंडळींवर आला.
"यावेळेस सर्व सुरळीत पार पडले म्हणजे झाले" असे प्रत्येकाला वाटत होते. तेवढ्यात तिसर्‍या वेळेसही तिसर्‍या महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये तिला ब्लिडिंग सुरू झाले. ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करून तिच्यावर उपचार केले गेले. ब्लिडिंग थांबले आणि दोन दिवसांनी तिला घरी पाठविण्यात आले. खूप काळजी घेण्यास तिला सांगण्यात आले.

मध्येच निर्माण झालेल्या या त्रासामुळे आधीच्या तणावात भर पडली. ती रजेवर होती. तिची ऑफिसमधील मैत्रिण तिला भेटायला आली आणि " धोंडोपंत आपटे नावाचे कुणी एक ज्योतिषी आहेत, त्यांना कुंडली दाखव. हा अमुक अमु़क त्यांच्या ब्लॉगाचा पत्ता आणि हा इमेल." असे सांगून गेली.

या मुलीने आमच्याशी इमेलद्वारे संपर्क साधला आणि आमचा फोन नंबर आम्ही दिल्यावर "आता तरी मला मूल होईल का हो?" असा प्रश्न आर्त स्वरात विचारला.
तो पर्यंत आम्ही बनविलेली तिची जन्मकुंडली आमच्या समोर तयार होती. आम्ही पंचमाचा सबलॉर्ड आणि दशा-अंतर्दशास्वामी पाहून तिला सांगितले की,

" या खेपेस काळजी करण्याचे काहीही कारण नाही. निर्धास्त रहा. सर्व व्यवस्थित होईल."

तिच्याशी पाच मिनिटे आम्ही बोलल्यावर तिचा ताण खूप हलका झाला असावा. तिच्या बोलण्यात मोकळेपणा आला. तिला जी हमी पाहिजे होती ती मिळाली होती.
ते झाल्यावर, " मागच्या दोन वेळेस तसे का झाले?" हा अपेक्षित प्रश्न तिने विचारलाच.

आम्ही तिला सांगितले की, " दुसरा चान्स घेण्यापूर्वी तू आमच्याकडे आली असतीस तर आम्ही तुला निश्चित थांबायला सांगितले असते. चतुर्थाची एवढी प्रबळ अंतर्दशा सुरू असतांना गर्भपात होतातच."

"पण माझ्या सासूबाईंनी त्यांच्या ज्योतिषांना विचारले होते ते तर म्हणाले की गुरूची अंतर्दशा सुरू आहे. गुरू हा संततीचा काऱक आहे. म्हणून तुमच्या सुनेला लवकरात लवकर दुसर्‍यांदा प्रयत्न करायला सांगा. म्हणून आम्ही घाईघाईत दुसरा चान्स घेतला."

खरे तर या चर्चेला काही अर्थ नव्हता आणि अंत ही नव्हता. आमचं शास्त्र काय सांगताय ते आमच्यासाठी महत्त्वाचं. कारण तेच वास्तव आहे. तिची आणि आमची तेव्हा ओळखही नव्हती त्यामुळे काही न बोलता त्या चर्चेला पूर्णविराम दिला.

मध्ये काही संपर्क झाला नाही. दिनांक २८ जानेवारीला तिचा फोन आला. तिला नववा महिना लागणार होता. ती म्हणाली,

"डॉक्टरांनी सिझेरियन करायला लागेल हे आधीच सांगितले आहे. दोनदा असे झाल्यावर आता कोणतीही रिस्क घ्यायची त्यांची तयारी नाही. तर पंत, मला सांगा की माझी डिलिव्हरी व्यवस्थित होईल ना? आणि जरा सिझेरियनचा मुहूर्त काढून द्या मार्चच्या पहिल्या आठवड्यातला. त्यावेळेस सिझर करण्याचे ठरले आहे."

"सिझेरियनचा मुहूर्त काढण्याआधी खरोखर तुला सिझेरियन करायला लागेल का? हे पाहिले पाहिजे ना? का नुसतं कोणी सांगितलं द्या मुहूर्त काढून की पंचाग उघडायचं?"

"हो पण तस ऑलरेडी ठरलेलं आहे. सिझेरियन करायला लागणारच आहे."

" हे बघ. आपण एक प्रश्नकुंडली मांडू. तू नंबर दे. त्यात जर का कळले की सिझर करायला लागेल तर मुहूर्त पाच मिनिटात काढता येईल. त्यासाठी "माझी प्रसुती व्यवस्थित होऊन बाळ व मी सुखरूप राहू ना?" असा प्रश्न मनात नीट धर आणि तुझ्याकडील एखाद्या पुस्तकातून आम्हाला १ ते २४९ मधला एक नंबर दे. तुझा प्रश्न त्या कुंडलीत नीट दिसला पाहिजे तरच कुंडलीचे उत्तर देता येईल. त्यासाठी मनात प्रश्न नीट धर आणि पाच मिनिटांनी पुन्हा फोन कर."

पाच मिनिटांनी तिचा फोन आला आणि तिने नंबर दिला ११४. नंबर ऐकल्यावर त्यातला चार अंक पाहून आमच्या मनात विचार आला की , " तिच्याऽऽयला, हा चार अंक कुठे तडफडला या प्रसुतीच्या प्रश्नात ?"

पण कुंडली बघूनच बोलावे. हे नंबरी ज्योतिष केवळ मार्गदर्शक म्हणून वापरावे. कुंडली बनविल्याशिवाय काही बोलू नये या आमच्या तत्वाला अनुसरून ११४ नंबराची प्रश्नकुंडली मांडली जी वर दिली आहे. त्यावर टिचकी मारताच ती मोठी दिसेल.

या कुंडलीत चंद्र स्वतः पंचमात असून तो लाभेश आहे. म्हणजे या मुलीने प्रश्न मनापासून विचारला आहे.
पंचमाचा उपनक्षत्रस्वामी राहू असून राहू स्वतः पंचमात व चंद्राच्या नक्षत्रात म्हणजे पाच आणि अकरा या स्थानाचा बलवान कार्येश आहे. तो शनीच्या राशीत असून शनी व्ययात व पंचमेश आणि षष्ठेश. शनीचा नक्षत्रस्वामी रवी स्वतः पंचमात आणि व्ययेश.

या मुलीची प्रसुती व्यवस्थित होऊन ही बाळंत होणारच. पण सिझेरियन???? आणि त्याचा मुहूर्त????

हिचे सिझेरियन व्हावे असे कुठलेही संकेत या पत्रिकेत नाहीत. आम्ही महादशास्वामी पाहिला. चंद्र राहूच्या नक्षत्रात असल्यामुळे राहुचीच महादशा कुंडलीला आहे, तसेच राहुचीच अंतर्दशा आहे. राहुचे कार्येशत्व वर दिले आहे.

आम्ही तिला म्हटले की,

"बाई तू "प्रसुती व्यवस्थित होऊन तुझी आणि बाळाची सुखरूप सुटका होईल का?" हे विचारण्यासाठी आणि सिझेरियनचा मुहूर्त काढण्यासाठी फोन केला आहेस, पण या प्रश्नकुंडलीवरून तुझे सिझेरियन होईल असे वाटत नाही. तुझी नॉर्मल डिलिव्हरी होईल असे ही कुंडली सांगते आहे.

तसेच तू जो मार्चच्या पहिल्या आठवड्यातला प्रसुतीचा कालावधी सांगते आहेस, तेवढा उशीरही लागणार नाही. कारण राहू महादशेतील राहू अंतर्दशा ०१ मार्च रोजीच संपते आहे.

राहु महादशास्वामी आणि अंतर्दशास्वामी म्हणून आला आहे. तो आपला अधिकार सोडणार नाही. तुझी प्रसुती एक मार्चच्या आधीच म्हणजे त्याच्याच अंतर्दशेत तो घडवून आणेल."

ती उडालीच. म्हणाली, "अहो पंत, सिझेरियन करायचे पूर्वीच ठरलेले आहे."

"ते ठीक आहे. ठरू दे. आत्ता मुहूर्त काढायला नको. जरा थांब."

आमच्या मनात रुलिंग प्लॅनेट्सची जुळवाजुळव सुरू झाली. रुलिंगमध्ये राहू नक्षत्रस्वामी आणि लग्न नक्षत्रस्वामी म्हणून आला आहे. प्रश्नवेळी त्याचीच महादशा व अंतर्दशा म्हणजे १ मार्चच्या आधीचीच तारिख.
महिन्याभरातली घटना म्हणून चंद्रभ्रमण बघितले. पुढचे राशीस्वामी गुरू मंगळ शुक्र रुलिंगमध्ये नाहीत. बुधाच्या कन्येत आर्द्रा आहे. पण द्विस्वभाव लग्न. तसेच रुलिंगमध्ये शनी आहे. त्यामुळे हे सोडायचं. पुढे चंद्र रवी नाहीत. त्यानंतर कन्येत पुन्हा रवि चंद्र मंगळाची नक्षत्रे आहेत. म्हणजे त्या भ्रमणाचा काही उपयोग नाही.

त्यानंतर शुक्र, गुरू, मंगळ यांच्या राशीतले चंद्रभ्रमणही हिची प्रसुती घडवणार नाही. पुढे मकरेचा शनी आहे पण नक्षत्र नाहीत. त्यानंतर कुंभ आणि राहूचे शततारका नक्षत्र. That's it.

आम्ही संगणकावरील पंचांग पाहिले. या सॉफ्टवेअरमुळे सर्व गोष्टी आता फार सुकर झालेत. आम्ही जे सॉफ्टवेअर वापरतो त्यात ५००० वर्षांचे पंचांग आणि एफिमेरिज आहेत.

होय.... पाच हजार वर्षे.... सन ०००० ते सन ५००० पर्यंतचे म्हणजे अजून दोन हजार नऊशे एक्याण्ण्व वर्षांचे पंचांग आणि एफिमेरिज. च्या माऽऽयला त्यांच्या......

काय सोय केलेय हो या लोकांनी? मानले पाहिजे त्या प्रोग्रॅमर्सना. ज्यांनी आमचे सॉफ्टवेअर बनवलेय त्यांचे आम्हाला फारच कौतुक वाटतं.

पूर्वी ती ढवळे पंचांगाची पाच दहा वर्षांची पंचांगे एकत्र केलेली पुस्तके घ्यायला लागत होती. तो सर्व ताप आता वाचला. अभूतपूर्व प्रगती या तंत्रज्ञानामुळे झालेली आहे. असो.

आम्ही तिला म्हटले,

"हे बघ, तुझी प्रसुती व्यवस्थित होईल. अजिबात चिंता करू नको. आधीही तुला हेच सांगितले आहे जेव्हा तू पहिल्यांदा हॉस्पिटलातून घरी आल्यावर आमच्याशी संपर्क साधला होतास त्यावेळी. तेव्हापासून आत्तापर्यंत सर्व व्यवस्थित झालेले आहे. यापुढेही सर्व व्यवस्थित होणार आहे. काळजी सोड. आनंदात रहा.

आमच्या शास्त्रानुसार तुझी डिलिव्हरी नॉर्मल होईल. तुला मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाट पहावी लागणार नाही. त्या आधीच तुझी सुखरूप सुटका आहे. तर आपण असे करू की, सिझेरियनचा मुहूर्त आत्ता काढण्यापेक्षा, तू २ मार्चला आम्हाला फोन कर. मुहूर्त काय पाच मिनिटात काढून देईन. त्याची काळजी करू नकोस. "( २ मार्चला ती फोन करणार नाही, आधीच प्रसुती झालेली असेल असा आमचा तर्क.)

तिने आभार मानले. आणि कदाचित तिने सिझेरियनची मानसिक तयारी सुरू केली असावी.
लोकहो,

ही मुलगी दिनांक २५ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास बाळंत झाली. अगदी नॉर्मल डिलिव्हरी.
संध्याकाळी सात वाजता पोटात दुखायला लागलं. दहा मिनिटात जवळच्याच (म्हणजे दोन बिल्डिंग सोडून असलेल्या) तिच्या नेहमीच्या हॉस्पिटलात तिला दाखल करण्यात आलं. तेथील उपस्थित डॉक्टरांनी तिला तपासली. त्यांच्या "सरांना" निरोप पाठवला. तासाभरात तिची सिझेरियन शिवाय सुटका झाली. एका गोंडस मुलीला तिने नैसर्गिक पद्धतीने जन्म दिला.

प्रसुतीच्या वेळेस चंद्र राहुच्या नक्षत्रात शनीच्या राशीत होता आणि बुधाचे कन्यालग्न सुरू होते आणि वार बुधवार होता. हे तीनही ग्रह प्रश्नकुडलीच्या रुलिंगमध्ये आहेत.

शेवटी रुलिंग प्लॅनेट्स आणि महादशास्वामी हेच घटनेव्रर अधिपत्य गाजवत असतात हेच खरे.

आपला,
(ग्रहांकित) धोंडोपंत
Tuesday, April 14, 2009

एवढे करा ना स्वामी !!!.... हे भाकित माझे चुकवा
लोकहो,

तिचा फोन आला. तिला तिची पत्रिका आम्हाला दाखवायची होती. प्रश्न होता पुनर्विवाहाचा.

दोन वर्षापूर्वी ती अशीच तिची पत्रिका दाखवायला आली होती. घटस्फोटाचा प्रश्न घेऊन.......

ज्या माणसावर भाळून तिने लग्न केले, ज्यांनी तिला अनेक स्वप्ने दाखवली त्याच्या वागण्यात विवाहानंतर प्रचंड फरक पडला होता. एकेकाळी जिवापाड प्रेम करणारा नवरा, प्रेमाचे दोन शब्द बोलायलाही महाग झाला होता.

त्यावेळेस तिला गुरू महादशा आणि त्यात बुधाची अंतर्दशा सुरू होती. आम्ही गुरूचे आणि बुधाचे कार्येशत्व पाहिले.

गुरू भावचलीत कुंडलीत लाभात असून तो षष्ठेश आणि भाग्येश आहे. गुरू मंगळाच्या नक्षत्रात मंगळ भाग्यात असून पंचमेश व दशमेश. गुरूची दृष्टी ४/६/८ या स्थानी पडते आहे. बुध अंतर्दशा सुरू झाली. बुध नवमात आणि व्ययेश व तृतीयेश असून गुरूच्याच नक्षत्रात आहे.

काय बोलायचे तेच कळेना. काही क्षण जीवघेण्या शांततेत गेले. शेवटी तिनेच वाचा फोडली.

तीच म्हणाली, " आम्ही डिव्होर्स केस फाईल केली आहे. हा असा का वागतो ते कळत नाही."

म्हटलं, "निर्णय घेतलाय ना? मग आता कशाला पत्रिका पहायची? आता कोर्टाचा निर्णय येईपर्यंत वाट पहा."

आम्ही फार काही न बोलता वेळ मारून नेली. बोलण्यासारखे काय आहे म्हणा वरील कार्येशत्व पाहिल्यावर?

त्यानंतर तिचा कायदेशीर घटस्फोट झाला. ती माहेरी रहायला गेली. मध्यंतरी दीड-एक वर्ष तिच्याशी काही संपर्क झाला नाही.

यावेळी तिचा फोन आला तेव्हा ती खूप खुशीत होती. तिचे दुसरे लग्न ठरल्याची बातमी तिने दिली. गेली दोन वर्ष सोसलेले एकटेपण किती जीवघेणे होते हे ती सांगत होती. तिला दुसर्‍या विवाहाचे भवितव्य जाणून घ्यायचे होते. अर्थात हा विवाहदेखील प्रेमविवाह आहे.

आम्ही आमच्या पेन ड्राईव्हवरील तिची कुंडली काढली. कुंडलीला सध्या शुक्राची अंतर्दशा आहे.

शुक्र स्वतः सप्तमात आहे लाभेश आणि चतुर्थेश आहे. म्हणजे हे लग्न होणार. (पहिला विवाहदेखील राहु महादशेत व शुक्राच्या अंतर्दशेत झाला होता.)

शुक्र मंगळाच्या नक्षत्रात, मंगळ भाग्यात दशमेश आणि पंचमेश. म्हणजे या अंतर्दशेत तिचे प्रेम जमले आहे, हे बरोबर आहे. आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे म्हणजे पत्रिका जुळतेय का नाही? हा प्रश्नच नाही. आम्ही तिला म्हटले,

" तुझा विवाह जमला हे चांगले झाले. तू वर्णन केल्यानुसार तुझा जोडीदार खूप चांगला असला पाहिजे. भावी जीवनासाठी माझ्या तुम्हा दोघांना हार्दिक शुभेच्छा. "

ती म्हणाली, " पंत, मला सांगा की या विवाहातून मला सुख मिळेल ना?

आम्ही कुंडलीत डोके घातले. या महादशेतील उर्वरीत अंतर्दशा बर्‍या आहेत. तिला म्हटले,

"आता कशाला काळजी करतेस? मस्त जग आता."

"बरं झालं तुम्हाला विचारलं. टेन्शन गेलं. उगाच चिंता लागली होती."

फोन ठेवल्यानंतर आम्ही प्रचंड अस्वस्थ झालो. तिला या विवाहातून खरोखर सुख मिळेल का?
पत्रिका पाहतांना पुढचा महादशास्वामी शनी आम्हाला खुणावून सांगत होता.." मी आहे... मी आहे..."
(शनी द्वितीयभावाचा उपनक्षत्रस्वामी देखील आहे हे लक्षात घ्यावे. दुसर्‍या विवाहासाठी द्वितीयभावाच्या उपनक्षत्रस्वामीचा विचार करतात. )
शनीचे कार्येशत्व असे आहे-
शनी , , ७ नस्वामी गुरू ११, , ९

पण हे तिला कशाला सांगायचे?

तिच्या आयुष्यातला आनंद काढून कशाला घ्यायचा? २०१५ पर्यंत सुखाने नांदेल. आत्तापासून कशाला तिच्या सुखात बिब्बा कालवायचा?

आमच्याकडे आलेल्या जातकाची मानसिकता सुधारेल याची काळजी आणि दक्षता आम्ही नेहमी घेतो. जगण्याचे नवे बळ त्याला कसे देता येईल याकडे आमचे लक्ष असते.

कधी कधी असे वाटते की आपले भाकित चुकावे.

तसे ही पत्रिका पाहिल्यावर वाटले की, आपले या पत्रिकेबद्दल असलेले भाकित साफ चुकावे. तिला अक्षय्य अहेवपण लाभावे.

आम्ही स्वामींपुढे हात जोडले आणि नकळत उस्फूर्तपणे ओळी ओठातून बाहेर आल्या....

एवढे करा ना स्वामी !!!
हे भाकित माझे चुकवा...

द्या अहेवपण पोरीला
भाळावर कुंकू टिकवा...

आपला,
(चिंताक्रांत) धोंडोपंत

Tuesday, April 7, 2009

दिवस तुझे हे फुलायचे.... झोपाळ्यावाचून झुलायचेलोकहो,

आज रात्री दहा वाजता एका जातकांचा प्रश्न पाहिला. ही प्रश्नकुंडली आहे आयुष्याच्या वैराण वाळवंटात प्रवास करणार्‍या दोन जीवांच्या मनात उमललेल्या प्रेमाच्या अंकुराची.

विषय फार खाजगी आणि वैयक्तिक स्वरूपाचा असल्याने त्यांची नावे टाळली आहेत. नेहमीप्रमाणे जातकांची पूर्वसंमती घेऊन प्रश्नकुंडलीतील ग्रहस्थितीचा मागोवा घेत आहोत.

विवाहित व्यक्तींना जेव्हा कळते की त्यांच्या विवाहात सुखाचा फक्त आभास आहे, त्यावेळेस येणारी विषण्णता विलक्षण बोचरी असते. लग्न होऊन त्या बंधनात फसले जाणे, यासारखी जीवनाची दुसरी शोकांतिका असू शकत नाही. तात्यारावांची ओळ इथेही चपखल लागू पडते:-
शुक पंजरी वा हरिण शिरावा पाशी...
ही फसगत झाली तैसी....
आपल्या समाजात नवर्‍याच्या पुरूषी अहंकारामुळे आणि उद्दाम वागणुकीमुळे अनेक स्त्रियांना वैवाहिक सौख्य मिळत नाही. तसेच अनेक पुरूषांनाही अरसिक, अहंकारी पत्नीमुळे संसार असून नसल्यासारखा होतो.
जसजसा समाज प्रगत होतो आहे, तसतशा या स्वरूपाच्या समस्या जास्त जाणवायला लागल्या आहेत कारण माणसाच्या गरजा आणि जाणीवा प्रगल्भ होत आहेत.

वैवाहिक सौख्य बिघडवणारे हे कटू अनुभव विवाहापूर्वी किंवा विवाहानंतर लगेच आले तर त्यातून सुटका करून घेणे सोपे असते. पण मुले झाल्यावर त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी अंगावर असल्यामुळे विभक्तता व्यवहार्य नसते.
अशा वेळेस मन मारून आहे त्या रानटी जोडीदाराबरोबर जीवन कंठणे याशिवाय काही पर्याय रहात नाही. आरती प्रभू ( चिंतामण खानोलकर) यांनी त्यांच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे:-

अंत झाला अस्ताआधी..... जन्म एक व्याधी
वेदनांची गाणी म्हंजे...... पोकळ समाधी

देई कोण एक हळी..... त्याचा जाई बळी
हारापरी हौतात्म्य हे.... त्याच्या गळी साजे

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे.... कुणाचे ओझे...

अशा परिस्थितीत जीवन कंठत असतांना काही जणांच्या आयुष्यात त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेशी व्यक्ती येते. त्या व्यक्तीचा सहवास हवाहवासा वाटू लागतो. पुढे तिची ओळख वाढते, तिचे रुपांतर मैत्रीत होते, मैत्री वाढते आणि त्याचे रुपांतर प्रेमात होते.
पण आपल्या समाजात या प्रेमसंबंधांना मान्यता नाही. आपल्या समाजात एखादी स्त्री जरा कुठे एखाद्या परपुरूषाशी बोलतांना दिसली की तिच्याबद्दल वदंता उठतात. तेच पुरूषांच्या बाबतीतही होते. अशा वेळेस

जागून ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारी ........

अशी अवस्था असूनही त्या भावनांच्या पूर्ततेबद्दल एकूणच समाजाच्या मानसिकतेमुळे प्रश्नचिन्ह उभे राहते. हे स्नेहबंध चिरकाल टिकतील काय? त्यातून काही त्रास संभवतो काय? पुढे जाऊन याची परिणती अजून मानसिक त्रासात होईल काय? असे एक ना अनेक प्रश्न त्या व्यक्तींच्या मनात निर्माण होतात.

असाच प्रश्न घेऊन एक जातक ऑनलाईन आले. त्यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेली अशी घटना सांगितली आणि प्रश्न केला की, " माझे हे प्रेम यशस्वी होईल का? त्यातून उभयतांना सुख आणि आनंद मिळेल का?"

या प्रश्नासाठी त्यांनी १४ नंबर दिला. आम्ही संगणकावर कुंडली बनवायला घेतली.

आमचे मटका ज्योतिष नेहमीप्रमाणे सुरू झाले. या नंबराची बेरीज येते ५. पंचम हे प्रेमाचे, भावनांचे स्थान. म्हणजे या गृहस्थांचे हे प्रेम यशस्वी आणि आनंददायी होईल. पण कुंडली बनविल्याशिवाय आम्ही तोंड उघडत नाही. आमचे हे अंकशास्त्रीय ठोकताळे आमच्याजवळच ठेवतो.

वर कृष्णमूर्तीपद्धतीची १४ क्रमांकाची प्रश्नकुंडली दिली आहे. या प्रश्नात कालनिर्णय करायचा नसल्यामुळे दशांचा काही संबंध नाही त्यामुळे त्या दिलेल्या नाहीत.

या कुंडलीत चंद्र स्वतः पंचमात आहे. पंचम हे वर सांगितल्याप्रमाणे प्रेमाचे स्थान आहे. म्हणजेच चंद्र जातकाच्या मनातील प्रश्न व्यवस्थित दाखवतो आहे. जातकाने आत्यंतिक तळमळीने हा प्रश्न विचारला आहे.

या कुंडलीत पंचमाचा सबलॉर्ड राहु आहे. राहु दशमात असून तो चंद्राच्या म्हणजे मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात आहे. चंद्र स्वतः पंचमात आणि चतुर्थेश आहे. राहु शनीच्या मकर राशीत आहे म्हणजे ज्या भावांचा शनी कार्येश होईल त्या सर्व भावांचा राहुदेखील कार्येश होईल. उपरोक्त कुंडलीत शनी स्वतः पंचमात असून तो दशमेश आणि लाभेश आहे. म्हणजेच पंचमभावाचा सबलॉर्ड हा पाच आणि अकरा या दोन्ही आवश्यक भावांचा कार्येश आहे.

तसेच लाभस्थानाचा सबलॉर्डही राहूच आहे. तो पंचमाचा बलवान कार्येश आहेच.

म्हणजेच या गृहस्थांचे त्या बाईंवर असलेले प्रेम आनंददायी, सुखदायी आणि यशस्वी होईल यात काही शंका नाही.
कुंडलीने उत्तम रिझल्ट दिल्यावर आम्हाला हायसं वाटतं. या गृहस्थांचे प्रेम यशस्वी होणार याची खात्री पटल्यावर आम्ही मनातून निर्धास्त झालो. पत्रिकेने मनासारखे रिझल्ट दाखवले की आमचा विनोदी, थट्टेखोर स्वभाव मूळपदावर येतो. आम्ही त्यांना म्हटले,
"चंद्र बरोब्बर पंचमात आला आहे. दिवसभर प्रेयसीचाच विचार करत असता की काय? जरा कामधंद्यात पण लक्ष घालत चला. पण एकंदरीत मजा आहे हो तुमची. कुणीतरी आहे....... तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसणारे. "
ते म्हणाले, " पंत रागावू नका. पण एक विनंती आहे. तुमचा हा विनोदी स्वभाव मला खूप आवडतो. जातकाच्या मनावरचा सर्व ताण आणि दडपण तुम्ही एका वाक्यात दूर करता. पण या माझ्या प्रश्नाच्या उत्तराबद्दल मी खूप टेन्शनमध्ये आहे. त्यामुळे कुंडली काय सांगतेय ते आधी सांगा आणि मग तुम्हाला करायची असेल तेवढी थट्टा करा."
गडी फारच कासावीस झाला होता. म्हटलं जाऊ दे. याला आधी मोकळा करू. आम्ही त्यांना म्हटले,

" हे पहा, ज्या सुखासाठी तुम्ही दोघे धडपडत होतात ते आता तुम्हाला मिळणार आहे आणि टिकणार आहे. तेव्हा गतकाळाचा विचार करून भविष्यकाळ फुकट घालवू नका. तुमच्या प्रेमिकेलाही आमच्या शुभेच्छा द्या. दोन जीवांच्या जीवनात आनंद निर्माण होणार आहे याचा आम्हालाही आनंद आहे. आता दिवस फुलायचे आहेत. आनंदात रहा."

न कळत आमच्या डोक्यात आमच्या नानासाहेबांचे म्हणजे श्री. यशवंत देव यांचे गीत पिंगा घालू लागले.

दिवस तुझे हे फुलायचे.... झोपाळ्यावाचून झुलायचे

स्वप्नात गुंगत जाणे... वाटेत भेटत गाणे

गाण्यात हृदय झुरायचे...

झोपाळ्यावाचून झुलायचे....

मोजावी नभाची खोली.. घालावी शपथ ओली

श्वासात चांदणे भरायचे....

झोपाळ्यावाचून झुलायचे

थरारे कोवळी तार... सोसेना सुरांचा भार

फुलांनी जखमी करायचे....

झोपाळ्यावाचून झुलायचे...

माझ्या या घराच्यापाशी.... थांब तू गडे जराशी

पापण्या मिटुन भुलायचे....

झोपाळ्यावाचुन झुलायचे.....

आपला,
(झोकेखाऊ) धोंडोपंत

अभ्यासकांसाठी --- या ठिकाणी पंचमाचा सबलॉर्ड द्वितीय किंवा सप्तमाचा कार्येश असण्याची आवश्यकता नाही. केवळ ५ व ११ लागणे पुरेसे आहे.
आम्ही तर असे म्हणू की पंचमाचा सबलॉर्ड द्वितीय, सप्तमाचा कार्येश नसणेच एका अर्थी चांगले.
असे का? ते कळले असेलच.
आपला,
(सूचक) धोंडोपंत

Monday, April 6, 2009

संगणक कधी येईल?

लोकहो,

काल म्हणजे रविवारी सकाळी आठच्या सुमारास आमचा संगणक अचानक बंद पडला. कालपासून ते आत्तापर्यंत आम्ही आपणास जालावर/ गुगलवर दिसलो नव्हतो त्याचे कारण हे आहे. काल सकाळी संगणक सुरू केल्यावर काम करत असतांना अचानक पडद्यावरील मजकून जाऊन पडदा काळा दिसायला लागला. कॅबिनेटच्या लाल आणि हिरव्या दिव्यापैकी हिरवा चालूच राहून लाल दिवा लागणे बंद झाले.


काही घरगुती उपद्व्याप आणि खटपटी केल्या पण पडद्यावर काही दिसेना. म्हणून आमचे संगणकतज्ज्ञ श्री. केतनराव म्हात्रे यांना दूरध्वनीवर कल्पना दिली.

काल रविवार असल्यामुळे उद्या माणूस पाठवतो असे त्यांनी सांगितले. कालचे एकही कन्सलटेशन होऊ शकले नाही.

आज श्री. केतनरावांकडे संगणक सुपूर्त केल्यावर त्यातील पॉवरसप्लाय आणि रॅम दोन्ही गेले असल्याचे कळले. गेल्या महिन्यात पॉवर सप्लाय बदलल्यामुळे तो वॉरंटीत आहे. पण रॅम नवीन घालावी लागली.

वॉरन्टीतला पॉवर सप्लायची रिप्लेसमेंट नक्की कधी होईल ते सांगणे कठीण. केतनरावांकडे त्या वेळेस दुसरा पॉवर सप्लाय नव्हता. त्यांनी, बघू पॉवर सप्लायचे कसे काय करायचे ते..... एवढेच सांगितले.


आज दुपारी सौभाग्यवतींना काही ईपत्रे पाठवायचे होती. नेमका तेव्हा संगणक नाही. शेवटी सौ. ने प्रश्न विचारला की,

"अहो, आज दिवसभरात कॉम्युटर रिपेअर होऊन घरी येईल ना? मला काही अर्जंट मेल पाठवायचे आहेत."

आम्ही पंचाग उघडले आणि म्हटले,

" केतनरावांकडे आत्ता पॉवर सप्लाय नसला तरी आज संगणक दुरूस्त होऊन घरी येईल."

"पण समजा त्यांना आज दुसरा पॉवरसप्लाय नाहीच मिळाला तर?" सौं.चा शंकायुक्त स्वर

"काहीही असो. आज आपला संगणक रिपेअर होऊन घरी येईल. म्हणजे पॉवरसप्लायची काहीतरी सोय होईलच होईल."

" अहो पण अजून तुम्ही प्रश्नवेळेची रुलिंग कुंडलीही मांडली नाहीत तर हे कसं काय सांगताय?" सौं. चा प्रश्न

"कर्क लग्न सुरू असेल. कर्क लग्न सुरू असेल तर प्रश्नाचे उत्तर होकारार्थी येतं. " चिरंजीवांनी अकलेचे दिवे लावले.

"पण कधी येईल? माझे काम अर्जंट आहे." सौ.

आम्ही रुलिंग प्लॅनेट्स घेतले. प्रश्नवेळी म्हणजे आज दिनांक ०६ एप्रिल २००९ रोजी दुपारी १४ वाजून २९ मिनिटांनी रुलिंग प्लॅनेट्स असे होते.

लग्न = कर्क - चंद्र (केतु कर्केत)

नक्षत्र = मघा - केतु

राशी = सिंह - रवि

वार= सोमवार - चंद्र (केतु कर्केत)

लोकहो, या रुलिंग प्लॅनेटमध्ये तीन ग्रह आहेत. त्यापैकी केतू सध्या कर्केत पुष्य या शनीच्या नक्षत्रात आहे. प्रश्नवेळेस शनी वक्री आहे. म्हणून केतु रुलिंगमधून वगळावा लागेल.

म्हणजे उरले फक्त दोन ग्रह. अशा परिस्थितीत लग्ननक्षत्रस्वामी रुलिंगमध्ये घ्यावा. कर्क लग्न १२ वाजून ५४ मिनिटांनी सुरू झाले आहे. प्रश्नवेळेस म्हणजे १४ वाजून २९ मिनिटांनी लग्ननक्षत्र आश्लेषा येते.

त्यामुळे बुध लग्ननक्षत्रस्वामी म्हणून रुलिंग मध्ये येईल.

चला तर पाहूया सौ. संध्या आपटे यांचा संगणक किती वाजता घरी येईल?

प्रश्नवेळेस कर्क लग्न सुरू आहे. पुढे सिंह लग्न सुरू होईल. सिंहेत केतु, शुक्र आणि रवि यांची नक्षत्रे आहेत. त्यापैकी शुक्र आणि केतु रुलिंगमध्ये नाहीत. त्यामुळे त्यांच्या लग्ननक्षत्रावर घटना घडणार नाही.

उरले रविचे उत्तराफाल्गुनी. रवी रुलिंगमध्ये एकदाच आला आहे. त्यामुळे तो राशी व नक्षत्रस्वामी म्हणून घेता येणार नाही. थोडक्यात सांगायचे तर सिंह लग्न सुरू असतांना संगणक येणार नाही.

पुढे कन्या लग्न सुरू होईल. कन्येचा स्वामी बुध रुलिंगमध्ये आहेच. कन्येत रविचे उत्तराफाल्गुनी, चंद्राचे हस्त आणि मंगळाचे चित्रा नक्षत्र आहे. मंगळ वगळावा लागेल.

म्हणजे उत्तराफाल्गुनी किंवा हस्त नक्षत्रावर घटना घडेल. त्यातही रुलिंगमध्ये जलदगतीच ग्रह असल्याने पहिल्या कॉम्बिनेशवरच घटना घडेल.

कन्यालग्न १७ वाजून १८ मिनिटांनी सुरू होणार होते. त्यात पहिले १० अंश उत्तराफाल्गुनीचे आहेत. एक अंश लग्न पुढे जायला साधारण चार मिनिटे लागतात.

म्हणून संध्याकाळी ०५ वाजून १८ मिनिटांनंतर ते ०५ वाजून ५८ मिनिटांपर्यंत संगणक घरात येईल.

त्यातला सब शोधला की अधिक सूक्ष्मात जाता येईल. पण काम घरचेच होते. दक्षिणेचा काही प्रश्न नव्हता.
त्यामुळे ५.२० ते ६.०० च्या दरम्यान संगणक घरी येईल असे सांगितले आणि तेवढे पुरेसे होते.

सायंकाळी ५.३७ ला केतनराव म्हात्रे यांचा माणूस संगणक, आमची जुनी रॅम आणि साडेबाराशे रूपयांचे बिल घेउन घरी आला.

कृष्णमूर्ती पद्धतीच्या भविष्यकथनाच्या प्रचितीच्या उदाहरणात अजून एकाची भर पडली. आम्ही गुरूजींना मनोमन नमस्कार केला.

संगणक चालू झाल्यावर सौ. लगेच इमेल लिहायला बसल्या.

चिरंजीव आम्हाला म्हणाले, "बाबा, दक्षिणा घ्या आईकडून. अशी तशी सोडू नका तिला."

आम्ही म्हटले, " अरे म्हणजे काय? ती रात्री घेणारच आहे."

हे ऐकल्यावर सौभाग्यवती ईमेल लिहिता लिहिता त्याच्यावर आणि आमच्यावर खेकसल्या.

"अथर्वऽऽऽऽऽ तू जा रे अभ्यासाला..... आणि काय हो?ऽऽऽऽ मुलांसमोर काय बोलायचं आणि काय नाही ते कळतं की नाही तुम्हाला?"

आपला,
(चहाटळ) धोंडोपंत


Friday, April 3, 2009

आंतर्जालावरील प्रेम

लोकहो,

आज रामनवमीची
सुट्टी. आंतर्जालावरील एका प्रेमिकाची ही कैफियत.

आज हा बिचारा लॉगिन झाला आणि त्याच्या प्रियतमेला सुट्टी असल्यामुळे ती काही नेटवर दिसली नाही. पहा तो काय म्हणतो.

नुकतीच ही कविता लिहून झाली आणि विचार केला की आमच्या वाचकांच्या आस्वादासाठी लगेच दोन्ही ब्लॉगावर टाकावी.

हा विरह किती मी साहु
गुगल अन् याहु
शोधले सारे...

नवमीची सुट्टी आज
तरीही 'खाज'
अंतरी बहरे....

तू नव्हतिस गे कोठेच
गोमटा 'फेस'
तुझा ना दिसला...

शेवटी करुन लॉगीन
ऑर्कुटावरून
पाहिले तुजला....

हृदयात तुझा गे ध्यास
रात्र अन् दिवस
शोधतो तुजला....

स्क्रॅपावर लिहितो स्क्रॅप
कधी ना ताप
तयाचा झाला....

ही आंतर्जाली प्रीत
बहरले ''गीत''
तुझे अन् माझे...

तू करशी जेव्हा 'पिंग’
वेगळी 'रिंग'
अंतरी वाजे...

ऑर्कुटी परम आनंद
मनाचा छंद
तिथे पुरवावा....

मटणावर मारू ताव
मिसळ अन् पाव
कशाला खावा?....

हे असो! अता भेटूच
उद्याला येच
जालावर पुन्हा...

नवमीचा झाला त्रास
घडे उपवास
नसतांना गुन्हा...

आपला,
(विरहव्याकूळ) धोंडोपंत

Wednesday, April 1, 2009

नटले तुमच्यासाठी.... राजसा विडा रंगला ओठी


लोकहो,

दिनांक २८ जानेवारी रोजी दुपारी बँकेत गेलो होतो. आम्ही साधारण महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बँकांची कामे करतो. त्यावेळेस बँकेत गर्दी कमी असते. बँकेतले कर्मचारीही जरा मोकळे असतात. गप्पा-टप्पा मारता येतात. एखाद्याची कुंडली पाहिलेली असते. त्याबद्दलही बोलता येतं.

त्या दिवशी आम्ही बँकेतले काम उरकले आणि घरी परतणार तोच,
"पंत, एक महत्त्वाचे काम आहे तुमच्याकडे" असे म्हणत तेथील एक मुलगी तिच्या खुर्चीवरून उठली.
आमच्याबरोबर बँकेतच भेटलेले एक गृहस्थ होते. ती मुलगी आमच्याशी बोलायला म्हणून आली खरी, पण त्या गृहस्थांच्या उपस्थितीत तिला बोलता येईना. आम्ही तिची अडचण ओळखली व त्या गृहस्थांना म्हटले, " तुम्ही व्हा पुढे. आम्हाला इथे काही वेळ थांबायला लागेल असे वाटते आहे."

खरं तर एवढं सांगितल्यावर एखाद्याने रस्ता धरला असता. पण आम्ही आयते सापडल्यावर काही लोक अनेक प्रश्न उभ्याउभ्या विचारून घेतात. अनेकदा त्या प्रश्नांना खरे तर काही अर्थ नसतो.
उदाहरणार्थ, " शनी वक्री आहे. काय होईल असं वाटतं तुम्हाला?"

आता त्यात आम्हाला काय वाटायचाय? वर्षातले १४० दिवस शनी वक्री असतो.

काही जण "शेअर्समध्ये पैसे गुंतवायला हा काळ कसा आहे?" हा प्रश्न विचारतात.
खरे तर हा प्रश्न त्याच्या कुंडलीतील पंचमस्थान पाहून सोडवला पाहिजे. रस्त्यात भेटून हा प्रश्न विचारल्यावर काय उत्तर देणार? पण हे त्यांना समजत नाही.

हे गृहस्थही, " होऊ द्या तुमचे, मी थांबतो" असे म्हणून तिथेच घोटाळले. मनात म्हटल, "हा वक्री शनी काही आज पाठ सोडणार नाही."

आम्ही त्या मुलीला, " आम्हाला फोन कर. फोनवर बोलू." असे खुणावले आणि त्या शनीला बरोबर घेऊन बँकेतून बाहेर पडलो.

त्यानंतर तासाभराने तिचा फोन आला. फोनवर तिने तिचा प्रश्न सांगितला. या मुलीची हकिगत अशी.

बँकेत तिची नोकरी कायम झाल्यावर तिच्या घरच्यांनी तिच्या विवाहाचा विषय हातात घेतला. विविध संस्थळांवर आणि वधुवर सूचक मंडळात तिचे नाव दाखल केले. गेली दोन वर्षे तिच्या लग्नाचा खटाटोप सुरू आहे. मागच्या वर्षी म्हणजे जून २००८ मध्ये आम्ही तिची कुंडली पाहिली होती आणि या अंतर्दशेत म्हणजे वर्षभरात तुझा विवाह होईल हे तिला सांगितले होते. आता त्या गोष्टीला सात महिने उलटले. अनेक स्थळे सांगून आली. अनेक ठिकाणी दाखवण्याचे कार्यक्रम झाले पण एकही स्थळ विवाहापर्यंत पोहोचू शकले नाही.

ही तरूणी उच्चशिक्षित आहे, घरंदाज आहे, बँकेत नोकरी करणारी आहे, सुंदर आहे पण तिची उंची साधारण मुलींपेक्षा जास्त आहे. म्हणजे ५ फूट ८ इंच आहे. व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक आहे. ती जूनमध्ये पत्रिका घेऊन आली तेव्हा आम्ही तिला म्हटले होते की "तुझ्यासारख्या मुलीने मॉडेलिंग करायला पाहिजे. ब्युटी कॉन्टेस्ट गाजवल्या पाहिजेत. बँकेत कसली लोकांची पासबुके प्रिंट करतेस?"

काहीवेळा सौंदर्यही लग्नाच्या आड येतं हे खरं. आपल्या समाजात, " सुंदर खाशी, सुबक ठेंगणी स्थूल न कृशही न वय चौदाची" अशा सौंदर्याच्या कल्पना अजूनही आहेत. ५ फूट ८ इंच उंचीची मुलगी म्हणजे सरदारीण वाटते.

अनुरूप स्थळ न मिळाल्यामुळे हे रत्न असचं राहिलं. जानेवारी महिन्यात एक स्थळ सांगून आलं. मुलगा पायलट आहे. सहा फुटांहून उंच. अत्यंत आकर्षक व्यक्तीमत्व, घराणं तोडीस तोड. दाखवण्याचा कार्यक्रम झाला. दोघेही अनुरूप आहेत असे दोन्ही घरच्या मंडळींचे मत झाले. मुख्य म्हणजे हिला तो फारच आवडला. त्याच्याशीच लग्न व्हावे अशी इच्छा हिच्या मनात उत्पन्न झाली. घरच्या मंडळींना तिने तिची पसंती कळवली. घरच्या मंडळींनी मुलाकडच्यांना होकार कळवला होता.

पण त्यांच्याकडून काहीच उत्तर आलेले नव्हते. "आम्ही तुम्हाला कळवतो" एवढेच काय ते उत्तर मिळाले. हा प्रेमविवाह नसल्यामुळे त्याच्याशी परस्पर बोलणे प्रशस्त नाही. तो फ्लाईट्स घेऊन जगभर फिरत असतो हे एक कारण आणि त्याच्या घरच्या मंडळीना बाजूला सारून त्याला गाठणे योग्य नाही हे दुसरे कारण.
काय करावं? तो होकार देईल का? या प्रश्नाने तिला ग्रासले होते आणि आम्हाला बँकेत पाहिल्यावर हा प्रश्न आम्हाला विचारण्याचे तिने ठरवले होते. पण त्या शनीमुळे तिला बोलता आले नाही. म्हणून तिने फोन केला.

आम्ही म्हटले, " तुझ्या जन्मकुंडलीवरून सध्या चालू असलेल्या अंतर्दशेत तुझा विवाह होईल हे आम्ही मागेच सांगितले आहे. आता याच व्यक्तीशी होईल का? हा तुझा प्रश्न आहे. याचे उत्तर जन्मकुंडली देऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला एक प्रश्नकुंडली मांडावी लागेल. तर त्यासाठी काय करायचे ते तुला सांगतो."

तेवढ्यात ती म्हणाली, " ते सर्व मला माहित आहे पंत, तुमचा ब्लॉग मी लॉग इन केल्यावर रोजच वाचते. मनात प्रश्न नीट धरायचा आणि १ ते २४९ मधला नंबर पुस्तकातून द्यायचा. बरोबर ना?"

"होय. प्रश्न नीट मनात धर. तू त्याला भेटलेली आहेस. तेव्हा त्याचा चेहरा नजरेसमोर आण. ते काही कठीण नाही. तुझ्या एकंदर परिस्थितीवरून त्याचा चेहरा कायमच तुझ्या नजरेसमोर असतो, असे वाटते आहे.
" तुझे रूप चित्ती राहो.... मुखी तुझे नाम..."
अशी तुझी अवस्था झालेलीच आहे. तेव्हा त्याचा चेहरा नजरेसमोर आणून या व्यक्तिशी माझा विवाह होईल का? हा प्रश्न मनात नीट धर आणि नंबर दे "

ती हसली आणि तिने पुस्तकातून ७२ नंबर दिला. नंबर ऐकल्यावर मनात म्हटलं झालं बाईच लग्न.
या नंबरात ७ आणि २ हे अंक आहेत. ७ हे विवाहाचे मुख्य स्थान आहे. २ हे विवाहासाठी पूरक स्थान आहे. कुंडलीतील दुसरे स्थान हे कुटुंबस्थान आहे. विवाहामुळे कुटुंबात भर पडते. दोन कुटुंबे एकत्र येतात. आणि ११ वे स्थान हे लाभस्थान. इच्छापूर्तीचे स्थान. त्यामुळे कृष्णमूर्ती पद्धतीत २, ७, ११ ही स्थाने विवाहासाठी विचारात घेतली जातात. या नंबराची बेरीज ९ येते. नवम हे समोरच्या व्यक्तीचे तृतीयस्थान आहे. आम्ही कुंडली बनवायला घेतली.

वर ७२ क्रमांकाची केपी प्रश्नकुंडली दिली आहे. त्यावर टिचकी मारल्यावर ती मोठी दिसेल.

प्रश्नकुंडलीत चंद्र स्वतः सप्तमस्थानात असून त्याची कर्क राशी लग्नात आहे. म्हणजे हा विवाहाचा प्रश्न आहे हे चंद्र व्यवस्थित दाखवतो आहे.

लोकहो, या कुंडलीत विवाह होईल का? हा प्रश्न नाहीये. तर ठराविक व्यक्तिशीच विवाह होईल का? असा प्रश्न आहे. हे नीट लक्षात घ्या.

त्यासाठी सप्तमाचा सबलॉर्ड आणि तो ज्या नक्षत्रात आहे त्याचा स्वामी कोणत्या राशीत आहे ते पहावे लागेल.

सप्तमाचा सबलॉर्ड राहू आहे. राहू मकर या चर राशीत आहे. राहू स्वतः सप्तमात आहे. राहू चंद्राच्या नक्षत्रात असून चंद्र कुंभ या स्थिर राशीत आहे. चंद्र स्वतः सप्तमात आहे आणि तो लग्नेश आहे. राहु शनीच्या मकर राशीत आहे म्हणजे शनी ज्या ज्या भावांचा कार्येश होईल त्या त्या भावांचा राहू देखील कार्येश होईल.
शनि स्वतः द्वितीयात असून सप्तमेश आणि अष्टमेश आहे. शनी रविच्या नक्षत्रात असून रवी सप्तमात असून तो द्वितीयेश आहे.

राहु विवाहास आवश्यक असलेल्या स्थानांपैकी ७ आणि २ या स्थानांचा कार्येश आहे. राहू चर राशीत असून चंद्र स्थिर राशीत आहे. दोघांपैकी एक स्थिर राशीत असणे पुरेसे आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राहू आणि चंद्राचा कुंडलीत कुठेही द्विस्वभाव राशीशी किंवा बुधाशी संबंध नाही.

म्हणजे हा पायलट तिला होकार देणारचं. कुंडलीने मनासारखं उत्तर दिलं होतं. आम्हीही निर्धास्त झालो. हा विवाह होणारच हे कुंडली सांगत होती त्यामुळे चिंतेला पूर्णविराम मिळाला होता.
जरा तिची टिंगल कराविशी वाटली. तिला म्हटलं

"हल्ली तू फारच नटायला लागली आहेस असं लगेच जाणवतं बॅकेत शिरल्यावर"

ती म्हणाली, " काहीतरी काय?"

"हो, का कोण जाणे पण हल्ली बँकेत तुला पाहिल्यावर सुरेखा पुणेकरची

"नटले तुमच्यासाठी..... राजसा, विडा रंगला ओठी"

ही लावणी आठवते. चालायचंचं. आनंदात रहा."

"अहो पंत, पण माझ्या प्रश्नाचं काय? तो होकार देईल का?"

"देईल म्हणजे काय? देईलच. खरं तर नेहमीच्या सवयीप्रमाणे "तो काय त्याचा बाप पण देईल" असे म्हणणार होतो. पण त्याच्या बापाने होकार दिला तर प्रॉब्लेम होईल. त्यामुळे तो देईल म्हणजे देईलच असे म्हणतो."

"मग आता काय करू? पुन्हा त्यांना कॉन्टॅक्ट करायचा का?"

"कशासाठी? तो जातो कुठे? निवांत रहा. जास्त उतावळेपणा नको. सप्तमाचीच दशा अंतर्दशा सुरू आहे. राहु रुलिंगमध्ये आहेच. मग कसली चिंता? बिनधास्त जियो."

त्यानंतर त्या मुलाचा होकार आला. तिने फोन करून ही गोष्ट सांगितली. मार्चच्या पहिल्या आठवड्यात तिचा साखरपुडा झाला आणि लवकरच रजिस्टर पद्धतीने विवाहबद्ध होतील.

आमच्या अमावास्येच्या सुटीच्या दिवशी म्हणजे २६ मार्चला बँकेत गेलो असतांना तिची भेट झाली.

तिला म्हटलं, " आता तर तुला पाहिल्यावर आज अमावास्या आहे असे वाटतच नाही. पौर्णिमाच वाटते. "

तिने हसून कपाळाला हात लावला. बॅंकेतून बाहेर पडलो ते सुरेखा पुणेकरच्या ओळी घेऊनच.

नटले तुमच्यासाठी.... राजसा, विडा रंगला ओठी

विडयात सुपारी कोल्हापूरची, कात सोलापूरचा
पान पुणेरी, चुना लाविला, बाई मी सातार्‍याचा

तसदी तुमच्यासाठी... घेतली तसदी तुमच्यासाठी

राजसा, विडा रंगला ओठी....

नटले तुमच्यासाठी.....

राजसा, विडा रंगला ओठी....दिलवरा, विडा रंगला ओठी.

आपला,
(लावणीवेडा) धोंडोपंत