फेब्रुवारी २००८ मध्ये आमचे नारायणगाव, जिल्हा- पुणे येथील जातक श्री. थोरात हे त्यांच्या एका मित्रांना आमच्याकडे घेऊन आले होते. ते आल्यावर औपचारिक ओळख वगैरे झाली आणि त्यांच्या मित्रांनी त्यांच्या मुलीची पत्रिका आमच्यासमोर ठेवली.
पत्रिका हातात घेतल्यावर मिनिटभरात घटस्फोटाचा प्रश्न आहे हे आमच्या लक्षात आले. ते काही बोलायच्या आधी आम्हीच त्यांना विचारले की,
" काय, नांदत नाही का पोरगी सासरी?"
ते चमकले. म्हणाले, "होय तसचं आहे. कोर्टात केस टाकली होती, तो निकाल आला. आता दुसरी सोयरीक कधी ते विचारायला आलोय."
पत्रिका पाहिल्यावर जो प्रश्न विचारला जाऊ नये असे आम्हाला वाटत होते, तोच प्रश्न त्यांनी टाकला होता. अशा वेळेस फार पंचाईत होते.
प्रश्नवेळेस कुंडलीला शनीची महादशा सुरू आहे. (२७/०२/१९९१ ते २७/०२/२०१०) आणि गुरूची अंतर्दशा (१६/०८/२००७ ते २७/०२/२०१०)
शनी स्वतः लाभात असून तो चतुर्थेश आणि पंचमेश आहे. शनी केतूच्या नक्षत्रात केतू षष्ठात बुधाच्या नक्षत्रात. बुध लग्नात असून नवमेश आणि व्ययेश. केतु गुरूच्या राशीत गुरू नवमात तृतीयेश आणि षष्ठेश. गुरू राहुच्या नक्षत्रात आणि राहु व्ययात.
राहु चंद्राच्या नक्षत्रात चंद्र नवमात आणि दशमेश. राहु बुधाच्याच राशीत बुध लग्नात नवमेश आणि व्ययेश. बुध गुरूच्या नक्षत्रात गुरू नवमात तृतीयेश आणि षष्ठेश. म्हणजे महादशास्वामी शनीचे कार्येशत्व असे आहे:-
शनी ११/ ४, ५ केतू - ६/- बुध - १ / ९, १२ (शनिची दृष्टी १, ५, ८)
केतु राशीस्वामी गुरू - ९/ ३, ६ राहु १२/- चंद्र ९/ १० ( गुरूची दृष्टी १, ३, ५)
राहु राशीस्वामी बुध १/ ९, १२ गुरू ९/ ३, ६ (बुधाची दृष्टी ७)
हे कार्येशत्व पाहिल्यावर शनि महादशा संपेपर्यंत वैवाहिक सौख्याचा बोजवारा उडालेला असेल हे लक्षात आले. प्रश्नवेळी शनी महादशेतली शेवटची गुरूची अंतर्दशा सुरू होती. गुरू नवम आणि तृतीय स्थानाचा कार्येश असल्यामुळे त्याच्या अंतर्दशेत घटस्फोटाच्या केसचा निकाल लागला.
आम्ही सहज पुढचा महादशास्वामी बुध पाहिला आणि बुधसुद्धा त्याच्या महादशेत वैवाहिक सौख्य या मुलीला लाभू देणार नाही हे लक्षात आले.
आमची कुंडली पाहून झाल्यावर हे सर्व त्यांना कसे सांगावे हा विचार आम्ही करत असतांना ते गृहस्थ म्हणाले,
" आमच्या ओळखीतले एक स्थळ तिला सांगून आले आहे. मुलाची पत्रिका आत्ता आमच्याकडे नाहीये. पण मुलगा खूप चांगला आहे. स्वतःचा धंदा, शेती आहे. घरची परिस्थिती चांगली आहे. कुटुंब चांगल्या परिचयातले आहे. तिथे सोयरीक करावी असं मला आणि आमच्या मंडळींना वाटतयं. तर पोरगी सुखात नांदेल ना तिथं?"
या कुंडलीचा नवमांश द्वितीयेश गुरू आहे. गुरूने काय दिवे लावलेत आणि यापुढे लावेल हे त्याच्या कार्येशत्वावरून सहज लक्षात येईल. वैवाहिक सौख्याचा कारक ग्रह शुक्र स्वत: व्ययात, लग्नेश आणि अष्टमेश. त्यामुळे या मुलीला द्वितीय विवाहातूनही सुख मिळणार नाही हे आलेच.
आम्ही त्यांना म्हटले, " मुलीच्या विवाहाची घाई करू नका. किमान ही अंतर्दशा होईपर्यंत तरी वाट पहा. फेब्रुवारी २०१० नंतर पहा."
विजेचा धक्का बसावा तसे ते चपापले. म्हणाले, " अहो काहीतरी काय सांगताय. अजून दोन वर्ष पोरीला बिना लग्नाची घरात ठेवायची? तोवर तिचे वय ३२ वर्षे झालेले असेल."
" ते बरोबर आहे हो. पण आत्ताच घटस्फोट झालाय ना? त्याचा मानसिक ताण असतो. तो तर दूर होऊ दे."
हे सर्व सांगतांना आम्हालाच मानसिक ताण आला होता. पण ती मुलगी किमान गुरू अंतर्दशेत तरी बोहल्यावर चढू नये यासाठी आमची केविलवाणी धडपड चालली होती. पण त्यांना ती मंजूर नव्हती. त्यांना लवकरात लवकर तिचा विवाह उरकायचा होता. ते आमच्यावर काहीसे रागावलेही होते.
" तुम्ही काहीतरी भलतचं सांगता रावं. या साबाजीच्या नादाला लागून तुमच्याकडे आलो. लग्न केव्हा होईल हे विचारायला आलो तर तुम्ही म्हणता दोन वर्ष पोरीला तशीच ठेवा. आमच्या समाजात नाही चालत अशी बिनलग्नाची पोरगी घरात ठेवून. आम्ही इतर ज्योतिषांकडे पण जाऊन आलोय तुमच्याकडे येण्यापूर्वी. सर्वांनी सांगितलाय की सहा आठ महिन्यात तिचे लग्न होईल. व्यवस्थित संसार करेल. याची खात्री करून घ्यायला आलो तुमच्याकडे तर तुमचं काहीतरी उलटचं."
ते गृहस्थ काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांना आमच्याकडून भविष्य जाणून घ्यायचे नव्हते तर त्यांना त्यांच्या मुलीच्या वैवाहिक सौख्याची हमी हवी होती, जी आम्ही दिली नाही. कारण आम्ही शास्त्राशी प्रतारणा करून वाट्टेल ते कधीच सांगत नाही त्यामुळे त्यांना आमचा राग आला होता. अशा वेळेस त्यांना त्यांच्या नशिबावर सोडून द्यावं आणि आपण आपल्या कामाला लागावं हे उत्तम.
आम्ही त्यांना हात जोडून एवढेच म्हटले की,
" तुम्ही ज्या ज्योतिषांकडे जाऊन आला आहात त्यांचे भाकीत बरोबर येवो आणि आमचे चुको अशी स्वामींकडे प्रार्थना. ठीक आहे? या आता. शुभेच्छा."
ते जायला निघाले. थोरात काहीसे बावचळल्यासारखे झाले. त्यांचे मित्र चपला घालत असतांना थोरातांना आम्ही खुणेनेच "फोनवर बोलू" असे सांगितले.
तासाभरात थोरातांचा फोन आला. म्हणाले, "पंत, माफ करा. ते जरा गरम झाले. आम्हालाही कल्पना नव्हती ते असे काही करतील."
आम्ही म्हटले, " जाऊ दे हो. चालायचचं. एक करा जमलं तर. फेब्रुवारी २०१० पर्यंत मुलीचा विवाह होऊ देऊ नका. जर झाला तर तो टिकणार नाहीये हे नक्की. त्यांचा राग गेल्यावर त्यांना समजावण्याचा प्रयत्न करा. ऐकलं तर ठीक आहे नाहीतर त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या."
मार्च २००८ अखेरीस अहमदनगरला त्या मुलीचा द्वितीय विवाह त्या "चांगल्या" मुलाबरोबर झाला.
थोरातांनी ही बातमी दिली. त्यांच्या मित्रांनी स्वत: आम्हाला काहीही कळवले नाही.
गेल्या रविवारी सकाळी अचानक ते गृहस्थ आमच्या घरी आले. बेल वाजवून दारात उभे. म्हणाले,
"ओळखलंत का? मी *** . थोरातांबरोबर आलो होतो मुलीच्या लग्नाचं विचारायला दीड वर्षापूर्वी. "
म्हटलं, " या या. आणि थोरात कुठे आहेत?"
"ते गावाला गेलेत."
आम्ही त्यांना हॉलमध्ये बसवले. म्हटलं,
"आता तुम्ही काय काम काढलतं?"
"एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला बरेच दिवस. अहो, तुम्ही म्हणाला होतात की ती कुठली दशा संपेपर्यंत मुलीचा विवाह करू नका. त्यावेळेस तुमचा खूप राग आला होता मला. महिन्याभरात तिचं लग्न त्या मुलाशी लावून दिलं. पण पोरगी दोन महिन्यात घरी परत आली हो माझी. तो ही संसार मोडला तिचा."
असे म्हणून ओक्साबोक्शी रडायला लागले.
त्या साठीच्या गृहस्थांना या पद्धतीने रडतांना पाहून आम्हीही सुन्न झालो. दादांची गझल आठवली.
भोगले जे दु:ख त्याला, सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगले की, मज हसावे लागले
आपला,
(दु:खविलासी) धोंडोपंत