|| श्री स्वामी समर्थ ||
लोकहो,
ज्योतिषशास्त्राला संपूर्ण नवी तात्त्विक बैठक देणार्या आणि फलादेशात आत्यंतिक अचूकता साधण्याची किमया करून दाखवणार्या गुरूवर्य कृष्णमूर्तींना दंडवत घालून या लेखाला सुरूवात करतो.
ही कुंडली आहे आमच्या बालपणापासूनच्या मैत्रिणीची. वयाच्या चौथ्या वर्षापासून म्हणजे शिशुवर्गापासून ते दहावीपर्यंत म्हणजे वयाच्या १५ व्या वर्षापर्यंत आम्ही एका शाळेत होतो. त्यानंतर सर्व जण विविध ठिकाणी शिक्षणासाठी गेले. अनेकांशी किंबहुना बहुतेकांशी पुढे संपर्क राहिला नाही.
शाळा सोडल्यापासून गेल्या अठ्ठावीस वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. कोण कुठे गेले याचा पत्ता लागला नाही. नाही म्हणायला गेल्या डिसेंबरात आमच्या वर्गातील मित्रमैत्रिणींनी एकत्र येऊन एक पुनर्मिलन सोहळा घडवला. त्यामुळे किमान वर्गातले तरी पुन्हा संपर्कात आले.
ही मैत्रीण आमच्या वर्गात नव्हती पण शाळेत होती. शाळा सोडल्यानंतर सत्तावीस वर्षे हिची आणि आमची भेट झाली नाही. गेल्या वर्षां ती आम्हाला अचानक रानडे रोड वर स्वामी समर्थ मेडिकल स्टोअर्समध्ये दिसली. खरे तर आम्ही पहिल्यांदा तिला ओळखलेच नाही. सत्तावीस वर्षात केवढा बदल झाला असेल? मुली होत्या त्या बाया झाल्या.
तसे अनोळखी व्यक्तींशी आपण होऊन बोलायला जावे, हा आमचा स्वभाव नाही. मेडिकल स्टोअर्समध्ये ती आमच्या बाजूला उभी होती. तिनेच बोलायला सुरूवात केली. शाळेचा विषय निघाला. ओळख पटली. तिचं रुपडं एवढं बदललं होतं की क्षणभर हीच का ती? असा संभ्रम पडला. औपचारिक बोलणे झाले. तिला आमच्या ज्योतिषशास्त्रातील प्रगतीबद्दल कल्पना नव्हती.
तिने केलेल्या चौकशीची उत्तरे देऊन आम्ही सहज तिला तिच्या नवर्याबद्दल आणि मुलाबाळांबद्दल विचारले. ती एकदम गंभीर झाली. म्हणाली,
" माझी मोठी ट्रॅजिडी आहे."
झक मारली आणि हा प्रश्न तिला विचारला असे आम्हाला वाटले. खरे तर तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं हे आमच्या ध्यानात आलं होतं. पण बोलताबोलता अनावधानाने हा प्रश्न विचारून बसलो.
त्यानंतर आम्ही बाजूलाच असलेल्या सुजाता हॉटेलात जाऊन बसलो. तिने तिची दर्दभरी दास्ताँ आम्हाला ऐकवली. तिचा एकदा विवाह होऊन लगेचच घटस्फोट झाला होता आणि पुढे २० वर्षे ती एकटीच राहिली होती.
ऐन उमेदीच्या वयातले जीवघेणे एकाकीपण काय असते याची कल्पना करणेही कठीण. आम्हाला तिची कथा ऐकून खूप वाईट वाटले.
"दैवगतीचे फेरे कोणा चुकले वेड्या?"........ ही आमच्याच गझलेतली ओळ आठवली.
तिला म्हटले, " एक काम कर. तुझे जन्मतपशील दे. तुझी कुंडली बनवतो आणि पाहूया पुढे विवाहयोग आहे का?"
तिला धक्का बसला. ती किंचाळली, " आत्ता या वयात विवाह??????"
"आत्ता या वयात म्हणजे? तुझं कितीसं वय झालाय?"
"अरे बाबा, चाळीशी उलटली आपली. पन्नाशी येईल आता."
" मग काय झालं? मी तर अजूनही लग्नाला तयार आहे. बायकोने परवानगी दिली तर." आम्ही उगीच फालतू विनोद करून वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला.
पुन्हा विवाह करण्याची तिची मानसिकता तेव्हा नसावी असे आम्हाला वाटले. यापुढे असचं एकाकी जगावं लागेल, हा विचार कदाचित तिने स्वीकारला असावा. त्यामुळे तिने तिचे जन्मतपशील दिले नाहीत. आपण कशाला कुणाच्या मागे लागून पत्रिका बघा? ज्यांचा या शास्त्रावर विश्वास आहे त्यांच्यासाठीच शास्त्राचा वापर करावा, या विचाराने आम्हीही तो विषय सोडून दिला.
त्यानंतर काही दिवसांनी तिचा फोन आला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. विवाहाबद्दल ती ही काही बोलली नाही आणि आम्हीही काही विचारले नाही. दरम्यान आम्ही गुगलटॉकवर एकमेकांना ऍड केले होते. त्यामुळे रोज संपर्क होत होता. बोलण्यात मोकळेपणा येत होता. शाळेतील तिच्या संपर्कातले इतर मित्रमैत्रिणीही तिच्यामुळे पुन्हा आमच्या संपर्कात आले होते. एक दिवस ती ऑनलाईन आली असतांना म्हणाली,
" तुझ्याशी काही बोलायचाय."
म्हटलं, " बोल "
" इथे नको. फोन करते."
तिचा फोन आला. म्हणाली, " तू मागे म्हणाला होतास की तू माझी पत्रिका बनवणार आहेस, तर त्यासाठी तुला काय काय डिटेल्स लागतील?"
समोर रुलिंग प्लॅनेट्स होतेच. रुलिंग प्लॅनेट्समधील शुक्र मंगळाची उपस्थिती पाहून गुरूवर्य कृष्णमूर्तींना दंडवत घालत मनात म्हटलं, " वा गुरूजी. तुमचे पांग कसे फेडू मी? कसल्या रुलिंग प्लॅनेट्सवर हिने हा प्रश्न विचारलाय? आम्ही तिला आम्हाला पत्रिका बनविण्यासाठी आवश्यक असलेले तपशील सांगितले. त्यावर ती म्हणाली,
" मलाही विवाह करण्याची खूप इच्छा आहे रे! गेली अनेक वर्षे प्रयत्नही केलाय. पण कुठेच विवाह जमला नाही. आता वय झालाय बेचाळीस. इच्छा असली तरी आता उमेद नाही राहिलेली. तू पत्रिकेचा विषय काढलास पण तुला तेव्हा मी काही बोलले नाही. आता आपली पुन्हा पूर्वीसारखी मैत्री झालेय म्हणून म्हटलं तुला आज सांगावं. जरा प्ली़ज बघ माझी पत्रिका आणि जे असेल ते खरं खरं सांग. आजपर्यंत अनेक ज्योतिषांना मी पत्रिका दाखवली. बहुतेकांनी पुढील वर्षी होईल, पुढील वर्षी होईल, अशी आशा दाखवली पण अजून काहीही झालेलं नाही. आपल्या शाळेतल्या **** शी ही माझं बोलणं झालं. तिने तुला तिच्या घरासंबंधी पत्रिका दाखवली होती. ती मला म्हणाली की, तू जे असेल ते सांगतोस. तर माझ्या नशिबात जे असेल ते स्पष्ट सांग. उगाच खोटी आशा लावू नकोस."
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म
आम्हाला आमच्याच गझलेतला एक नितांत सुंदर मक्ता आठवला.
स्वप्न असे दे, मला 'अगस्ती', जे साकारे, कधीतरी
नको भाबडी, आशा लावू, चंद्र-चांदण्या, तार्यांची
आम्ही तिला दोन दिवसांनी भेटायची वेळ दिली. तेव्हा जे असेल ते सांगू असे म्हणून निरोप दिला.
तिची कुंडली आणि महादशांचा तक्ता वर दिला आहे. अभ्यासकांनी महादशा आणि स्पष्टग्रह नीट पहावेत. काही नवीन अभ्यासक अर्धवट कार्येशत्व काढून फसतात याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे.
या कुंडलीत वैवाहिक सौख्य का बिघडले? याचा विचार सर्वप्रथम करावा लागेल. या मुलीचा प्रथम विवाह मंगळ महादशेत आणि रविच्या अंतर्दशेत म्हणजे ऑगस्ट १९८५ रोजी झाला. त्यावेळेस तिचे वय अवघे वीस वर्षाचे होते. नुकतीच बी. कॉम झाली आणि विवाह झाला. कॉलेजातच प्रेम जमले. उगाच उशीर नको म्हणून पालकांनी लगेच विवाह करून दिला. त्याकाळी बी कॉम म्हणजे हायली क्वालिफाईड नसले तरी उच्चशिक्षित वर्गात मोडत असे. आज बी.कॉमला कुत्रा विचारत नाही. असो.
मंगळ चतुर्थात असून व्ययेश आणि सप्तमेश आहे. मंगळाची चौथी दृष्टी सप्तमावर तसेच आठवी दृष्टी लाभस्थानावर आहे. तो शुक्राच्या सबमध्ये आणि शुक्र केतूच्या नक्षत्रात केतू सप्तमात म्हणजे मंगळ विवाहास पोषक आहे. मंगळ महादशेत विवाह झाला. मंगळ शुक्राच्या माध्यमातून सहा व बारा या स्थानांचा अत्यंत बलवान कार्येश आहे. या कुंडलीचा नवमांश सप्तमेशही शुक्रच आहे त्यामुळे विवाहाचे बारा वाजणार हे सांगायला नको. त्यानुसार ही मुलगी विवाहानंतर सात महिन्यांनी म्हणजे मार्च १९८६ रोजी कायमची माहेरी परतली आणि घटस्फोटाची केस कोर्टात दाखल करण्यात आली.
पुढे राहू महादशेतील राहू अंतर्दशेत कायदेशीर घटस्फोट झाला. राहू तृतीय आणि नवमस्थानाचा बलवान कार्येश आहे त्यामुळे कायदेशीर विभक्तता राहूने दिली. ऑगस्ट १९८७ मध्ये. त्यानंतर तिच्या दुसर्या विवाहासाठी बरेच प्रयत्न झाले. बरेच म्हणजे आकाशपाताळ एक करून प्रयत्न केले गेले. पण राहुच्या अठरा वर्षाच्या महादशेत तिचा विवाह होऊ शकला नाही.
जरा राहुचे कार्येशत्व नीट डोळ्यात तेल घालून तपासा. राहू शुक्राच्या राशीत आहे. आणि शुक्र केतूच्या नक्षत्रात केतु सप्तमात. या कार्येशत्वावरून अनेकांनी तिचा विवाह या महादशेत होईल अशी भाकीते केली असतील. पण आमच्या पद्धतीनुसार राहुचे कार्येशत्व पाहिले तर कळेल की हिचा विवाह राहु महादशेत होऊच शकत नाही.
(अशा कुंडल्या आम्ही आमच्या ऑनलाईन वर्गात घेणार आहोत. इथे वरवर पाहता राहु महादशेत विवाह व्हायला हवा होता असे दिसते. पण तो झालेला नाहीये हे वास्तव आहे. याचे कारण काय? ते आम्ही विकसित केलेल्या धोंडोपंत पद्धतीनुसार ऑनलाईन वर्गात शिकवू. अशा कुंडल्यांचा मोठा संग्रह आमच्याजवळ आहे ज्यात प्रचलित पद्धतींनुसार अनेक ज्योतिर्विदांनी केलेल्या भाकीतांच्या विरूद्ध फळे जातकाला मिळाली आहेत. त्यामुळेच आम्ही संशोधनाला उद्युक्त झालो आणि नवीन संशोधन करून काही सिद्धांत मांडले. याबद्दल उल्लेख पूर्वी एका लेखात केला आहे. असो. सध्या एवढेच. )
ती आम्हाला भेटली मे २००८ रोजी त्यावेळेस तिला गुरू महादशेत शनीची अंतर्दशा सुरू होती. आम्ही कुंडली पाहून ठेवली होती. ती आल्यावर तिला पाणी दिले. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू केल्या पण तिला त्यात काही स्वारस्य नव्हते असे तिच्या बोलण्यातून जाणवले. कारण ती आली तेव्हा डॉक्टरकडे जाऊन आली होती. तिला हायपरटेन्शनचा त्रास आहे. बीपी वाढल्यामुळे चेक करायला डॉक्टरकडे गेली होती. त्याबद्दल आम्ही तिला विचारले पण,
" माझ्या पत्रिकेबद्दल सांग." असे म्हणत ती सरळ मूळ विषयावर आली.
आम्ही तिला म्हटले की, " तुझा द्वितीय विवाह होणार आहे."
" उगीच मला बरं वाटावं म्हणून काहीतरी सांगू नकोस."
" जे आहे ते सांगतोय. कुणाला बरं वाटावं या उद्देशाने मी कधी भविष्यकथन करत नाही. द्वितीय विवाह होणार नसता तर तसे बोललो असतो. होणार आहे म्हटले म्हणजे होणार आहे. समजले? जे बोलतोय ते ऐकायचं. डोक्यात जायचं नाही."
" आजपर्यंत किती वर्षांपासून मी हेच ऐकतेय की पुढील वर्षी योग आहे. अनेकांनी सांगितलं. पण ते पुढचं वर्ष अजून उगवलेलं नाही."
" इतरांनी जे सांगितलं ती त्यांची विद्या त्यांच्याकडेच ठेव. ते मला ऐकवू नकोस. इतरांनी काय सांगितलं ते ऐकण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. मी तुला सांगतो की तुझा पुनर्विवाह ५ डिसेंबर २००८ नंतर होईल. त्यातूनही सांगायचे तर २०/०५/२००९ ते ०४/१०/२००९ या काळात. पाच ऑक्टोबर २००९ रोजी तुझा विवाह झाला नसेल तर मला भेट. मी तुझ्याशी विवाह करेन. ठीक आहे?"
ती खळखळून हसली. म्हणाली, " हा विचार तू तेव्हाच करायला हवा होतास."
आम्ही म्हटले, " better late than never"
ती म्हणाली, " बरं, विवाह कसा होईल? ऍरेन्ज्ड की प्रेमविवाह? म्हणजे त्या दृष्टीने प्रयत्न करायला"
म्हटलं, " सरळ आहे. प्रेमविवाहच."
"पण तसं कोणी नाहीये."
"मी आहे ना? काळजी कशाला करतेस?"
तिने हसून हात जोडले. तसे आमचे तिच्याशी गुगलवर रोज बोलणं होत असतं. अधूनमधून ती आम्हाला आमच्या भाकीताची आठवण करून देई. अजून काहीच "प्रोग्रेस" नाहीये असे म्हणत असे. आम्ही दरवेळेस तिला "पाच ऑक्टोबर २००९ ला बोलू" असे सांगत असू.
कुंडलीला बुधाची अंतर्दशा दिनांक ०५ डिसेंबर २००८ रोजी सुरू झाली. या काळात हिचे प्रेम जुळून येईल याबद्दल आम्ही निश्चिंत होतो. दिवस सरत होते. एप्रिलमध्ये तिने फोन केला. जाम खूश होती. म्हणाली,
" तुझं भाकीत खरं होणार आहे असं दिसताय."
तिच्या मैत्रिणीच्या मावस दीराने तिला प्रपोज केल्याचे कळले. गेले दोन महिने त्यांची "मैत्री" खूप वाढली असे म्हणाली. तसे तिच्या गुगलच्या स्टेटेसमेसेजवरुन हे कळत होतेच. त्या गृहस्थाची प्रथम पत्नी तीन वर्षांपूर्वी एका दुर्धर रोगाने निवर्तली आहे. त्याला एक मुलगी आहे अशी माहिती तिने दिली.
पत्रिका जुळतात ना ते पहा असे म्हणाली. आम्ही त्याचे जन्मतपशील घेऊन पत्रिकामेलन केले. पत्रिका बर्यापैकी जुळत आहेत. त्यांच्यात किरकोळ भांडणे होत राहतील पण घटस्फोटापर्यंत काही जाणार नाही हे तिला सांगितले.
विवाह ठरला. नोंदणीकृत विवाहाला नोटीस द्यावी लागते. पितृपक्ष येत होता म्हणून तो संपल्यावर नवरात्रात करावा असे त्यांचे ठरले.
पण सध्या गुरू वक्री आहे. मग नवरात्रात तरी विवाह करावा की नाही? हा प्रश्न घेऊन ती दोघं जण आली.
आम्ही तिच्या नवर्याला म्हटले की, " हिचा विवाह ०४ ऑक्टोबर पर्यंत झाला नसता तर पाच ऑक्टोबरला मी तिच्याशी विवाह करणार होतो. तेव्हाही गुरू वक्रीच असणार होता."
आमच्या या वाक्यावर तो पोट दुखेपर्यंत हसला. म्हणाला, " पंत, तुमचं बोलण फार खुमासदार आहे हो. मजा येते तुमच्याशी बोलायला. तुम्ही जी मदत केलीत त्याबद्दल शतशः धन्यवाद"
म्हटलं, " अहो धन्यवाद आम्ही द्यायचे तुम्हाला. एका मोठ्या संकटातून तुम्ही आम्हाला वाचवलेत."
त्यांचा विवाह गुरूवार दिनांक २४ सप्टेंबर २००९ रोजी पार पडला. त्यावेळी चंद्र शनीच्या अनुराधा नक्षत्रात असून गुरूवार होता. महादशास्वामी आपला अधिकार सोडत नाही हे खरे.
आम्हाला देव आनंद साहेबांचे गाणे आठवले
चारो तरफ इशारे चले, किसीके तो हो जाओ
खोया खोया चांद.......
आपला,
(आनंदित) धोंडोपंत