|| श्री स्वामी समर्थ||
लोकहो,
एका सेकंदात भविष्यकथन या लेखमालेतील हा पाचवा लेख. नंबरावरून कसे भाकीत करता येतं याची ही आम्ही सोडवलेली अजून काही उदाहरणे.
ज्योतिषाने प्रश्नकुंडली मांडूनच जातकाच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे हे पुन्हा आवर्जून सांगतोय. नंबर हा मार्गदर्शक असतो. त्याचा योग्य परिस्थितीत, योग्य पद्धतीने आणि योग्य तेवढा वापर करावा. योग्य तर्कपद्धत वापरून नंबराचा वापर केल्यास भाकीते कशी अचूक येतात याची ही अजून काही उदाहरणे.
****************************************************
या वर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्ही आमच्या विलेपार्ले येथील एका स्नेह्यांच्या घरी गणपतीबाप्पांच्या दर्शनाला गेलो होतो. तिथे आलेल्या त्यांच्या एका नातेवाईकांच्या मुलाने आम्हाला प्रश्न विचारला की,
" पंत, माझ्या आयुष्यात एकदातरी परदेशात वास्तव्य करण्याचा योग येईल काय?"
आम्ही म्हटले, " तुझे वय किती?" तो म्हणाला "सव्वीस"
"मग आयुष्यात योग येईल काय? वगैरे इतक्या पुढच्या टोकाला कुठे जातोस?"
तेव्हा त्याने सांगितले की, त्याला अमेरिकेतील प्रोजेक्टवर काम करण्यास मिळावे म्हणून त्याने गेल्या दीड वर्षात प्रचंड प्रयत्न केले होते. पण तीन वेळा हातात आलेली संधी हुकली आणि दुसर्या लोकांना कंपनीने परदेशात पाठवले. जे गेले त्यातील काहींची जायची इच्छा नसतांनाही त्यांना जावे लागले आणि हा बिचारा असाच राहिला.
त्याने हा विषय काढला तेव्हा नुकतीच आरती संपली होती. घरात खूप पाहुणे होते. त्यामुळे आम्ही पुरूषमंडळी बाहेरच्या गॅलरीत बसलो होतो आणि महिला आतमध्ये पाने घेत होत्या. सतरंज्या घालणे, ताटे, वाट्या, भांडी मांडणे , रांगोळी काढणे वगैरे पंगतीची तयारी आतमध्ये सुरू झाली होती.
आम्ही त्याला नंबर द्यायला सांगितले. त्याने १२९ नंबर दिला.
या नंबरात १२ आणि ९ हे दोन अंक आहेत. तसेच या नंबराची एक अंकी बेरीजही ३ येते. ही तीनही स्थाने परदेशगमनाची स्थाने आहेत.
त्यामुळे "तू नक्की परदेशात जाशील अजिबात काळजी करू नकोस" असे त्याला सांगितले.
तेवढ्यात त्या स्नेह्यांच्या सौभाग्यवतींच्या माहेरचे जे नातेवाईक दर्शनासाठी आले होते त्यातील एक बाई मोदकांचा खोका घेऊन आम्ही बसलो होतो त्या गॅलरीत आल्या आणि " हा घ्या प्रसाद" असे म्हणत त्या बाईंनी त्या मुलाच्या हातावर मोदक ठेवला.
आम्ही तो शकुन घेऊन त्याला म्हटले, " हा पहा शकुन. गणपतीबाप्पांनी आशीर्वाद दिलेत. तू अमेरिकेत जाणार म्हणजे जाणारच."
हे बोलत असतांनाच कर्णकर्कश आवाज करत नुकतेच उड्डाण केलेले एक विमान गेले. विलेपार्ले सांताक्रूझ विभागात विमानतळ जवळच असल्या कारणाने, विमान आपल्या डोक्यावरून गेल्यासारखं वाटतं.
आम्ही त्याला म्हटले, " हा घे दुसरा शकुन."
त्याचे वडीलही त्याच्याबाजूला बसले होते. ते म्हणाले, " अहो पंत, तो खूप प्रयत्न करतोय पण काही होत नाहीये. आता तुम्ही म्हणताय की तो परदेशात जाईल. पण कधी जाईल ते सांगितलेत तर बरे."
आम्ही क्षणाचाही विलंब न करता त्या गृहस्थांना म्हटले की, " हा २१ किंवा २२ ऑक्टोबरला परदेशात जाईल."
१२९ क्रमांकाचा सब तुळेत ०५ अंश ३३ कला २० विकलांवर सुरु होतो. चित्रा नक्षत्रातील तो शेवटचा सब आहे. म्हणून २१ किंवा २२ ऑक्टोबरला जाईल असे सांगितले.
त्यानुसार तो गेल्या आठवड्यात दिनांक २१ ऑक्टोबरला मध्यरात्री म्हणजे २२ ऑक्टोबरला पहाटे अमेरिकेला रवाना झाला.
तो विमानात बसला तेव्हा विनायकी चतुर्थी सुरू होती. गणपतीबाप्पांनी दिलेला शब्द तंतोतंत पाळला.
|| गणपतीबाप्पा मोरया ||
*******************************************
असाच सबच्या नंबरावरुन भाकीत केलेला अजून एक अनुभव.
मु.पो. - दुंद, तालुका - जावळी, जिल्हा-सातारा येथील श्री. संपतराव दुंदळे यांना त्यांच्या शेतात विहीर खणायची होती.
संपतराव दुंदळे हे गृहस्थ बेस्टच्या म्हणजे बी ई एस टी च्या सार्वजनिक परिवहन सेवेत कंडक्टर आहेत.
एकदा आम्ही मंत्रालयात कामासाठी गेलो असतांना काम संपल्यावर घरी येण्यासाठी एल आय सी च्या योगक्षेम इमारतीखालील बसस्टॉपवर बसची वाट पहात उभे होतो. तेवढ्यात ९२ क्रमांकाची बस आली. बसमध्ये शिरलो. बघतो तर तिकीट द्यायला संपतराव.
दुपारची वेळ असल्यामुळे बस रिकामी होती. तिकीट दिल्यावर ते शेजारच्या सीटवर बसले.
संपतराव हे माळकरी आहेत. तेव्हा ते नुकतीच कार्तिकीची पंढरपूरची वारी करुन आले होते. वारीच्या आणि इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर म्हणाले, "पंत, गावाला आपल्या शेतात विहीर खणायचेय. लागेल का पाणी?"
आम्ही संपतरावांना नंबर द्यायला सांगितले. ते म्हणाले, " असं करा ........ ७९ घ्या"
"जरूर विहीर खणा, मुबलक पाणी लागेल" असे सांगितले.
७९ क्रमांकाचा सब कर्क राशीत आश्लेषा नक्षत्रात येतो. तसेच तो चंद्राचा सब आहे. कर्क रास जलतत्वाची, आश्लेषा नक्षत्रही जलतत्वाचे आणि चंद्र ही जलतत्वाचा ग्रह. त्यामुळे विहीरीला मुबलक पाणी लागेल असे सांगितले.
पुढे संपतरावांनी विहीर खणली. भरपूर पाणी लागले.
आम्हाला नाचणीची भाकरी फार आवडते हे त्यांना ठाऊक असल्यामुळे, त्यांच्या शेतातील नाचणी भेट म्हणून घेऊन आले.
ज्योतिषतत्वाचा डोळसपणे वापर केल्यास सहसा भाकीत चुकत नाही.
************************************************
या विषयातील अजून अनुभव पुन्हा केव्हातरी, या आश्वासनासह.
आपला,
(आकडेतज्ज्ञ) धोंडोपंत
(आकडेतज्ज्ञ) धोंडोपंत





![[Diwali_Diya_2[2].jpg]](http://lh3.ggpht.com/_XQyeaYRtFiI/StPuaCuz1YI/AAAAAAAABM8/rKPF1MrHG1Q/s1600/Diwali_Diya_2%5B2%5D.jpg)