Sunday, February 7, 2010

वर्षफल, राशीभविष्य वगैरे......

॥ श्री स्वामी समर्थ॥
लोकहो,

नवीन वर्ष सुरू झाले म्हणजे " हे वर्ष आम्हांला कसे जाईल हो ?" असा येडझवा प्रश्न विचारणारे अनेक लोक आम्हाला भेटतात. सालाबादप्रमाणे या वर्षीही तसे काही भेटले. अर्थात त्यात त्यांचा फारसा दोष आहे असे आम्ही मानत नाही.

कारण वर्षानुवर्षे दिवाळी अंकांमधून, विविध मासिकांमधून पुढील वर्षाचे, महिन्याचे भविष्य छापून आलेले त्यांनी वाचलेले असते. तसेच दूरदर्शनवर बहुतेक वाहिन्या लोकांना चमचमीत गोष्टी दाखवून स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी काही निरुद्योगी आणि अडगळीतल्या तथाकथित ज्योतिर्विदांना बोलावून लोकरंजनाचे कार्यक्रम आयोजित करत असतात. ( याला अपवादही आहेत.)

तसेच जवळजवळ सर्वच वर्तमानपत्रांच्या रविवारच्या पुरवण्यांचे रकानेच्या रकाने या  भुलभुलय्याने भरलेले  दिसतात.  कुणी राशींची वैशिष्ट्ये घेऊन, त्याला पाचकळ विनोदाची फोडणी लावून, लोकांची करमणूक करण्यात धन्यता मानतो. 

एक गृहस्थ तर दरवर्षी प्रत्येक राशीचे एक एक वर्षफलाचे पुस्तक प्रसिद्ध करून त्या त्या राशीच्या लोकांना त्या वर्षात काय काय लाभ होणार आहेत हे सांगत असतात. 

जगातल्या सर्व लोकांची बारा भागात विभागणी करून त्यांच्या वाट्याला काय सुखदु:खे पुढील आठवड्यात, पुढील महिन्यात किंवा वर्षभरात येतील हे बेधडकपणे सांगणारे मूर्खशिरोमणी समाजात अनेक आहेत.

भविष्यकथनाच्या नावाखाली हे जे काही "चाळे" चालतात त्याला खरोखर अर्थ आहे काय? याचा वाचकांनी विचार करावा. हे लोक या शास्त्राला काळिमा फासत आहेत. ज्योतिषशास्त्र हे करमणुकीसाठी नसून, माणसाच्या जीवनातील तात्कालीन ज्वलंत समस्यांची उत्तरे देणारे, त्याला उत्तम मार्गदर्शन करणारे शास्त्र आहे.

प्रत्येक माणसाची पत्रिका भिन्न आहे. एकाच आईच्या उदरातून दोन चार मिनिटांच्या अंतराने जन्मास येणार्‍या जुळ्या भावंडांचं नशीब भिन्न असतं. एकाचा घटस्फोट होतो तर दुसर्‍याला चांगलं वैवाहिक सौख्य लाभतं. एकाचा अपमृत्यू होतो तर दुसरा दीर्घायू असतो. एकाला संतती होत नाही तर दुसर्‍याच्या घरी एक मूल कडेवर, एक मांडीवर, एक पोटात अशी परिस्थिती असते.

याचे कारण असे की, जरी ते एका आईच्या उदरातून, साधारण एकाच वेळेस, एकाच स्थळी, एकाच इस्पितळात, एकाच खाटेवर दोन चार मिनिटांच्या अंतराने जन्मास आले असले, तरी त्या दोन तीन मिनिटांच्या जन्मवेळेतील फरकामुळे त्यांचे सबलॉर्ड भिन्न असतात. 

त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र फरक पडतो. जर दोन चार मिनिटांच्या अंतराने जन्मास येणार्‍या मुलांच्या आयुष्यात एवढा फरक पडत असेल, तर जगातल्या सर्व लोकांना बारा राशीत कोंबून एकच फलादेश सांगणे योग्य आहे काय? या प्रश्नाचा तुम्ही विचार करावा.

प्रत्येक माणसाचे आयुष्य हे त्याला सुरू असणार्‍या ग्रहदशेनुसार घडत असतं. या प्रकारच्या सार्वजनिक भविष्यकथनात कुठेही दशेचा विचार केलेला नसतो हे कृपया नीट लक्षात घ्या. तसा विचार करणे त्यांना शक्यही नाही. केवळ राशीपासून गोचर भ्रमणे पाहून, त्यातून काहीतरी विचित्र अर्थ काढून, हे लोक काहीतरी सांगत असतात. ते खरे होण्याची शक्यता किती?

समजा, एका कॉलेजात शिकणारे किंवा एका कट्ट्यावर मैफिल जमवणारे आठ दहा मित्र आहेत. त्यापैकी तिघांची रास एकच आहे. त्या राशीवरुन केलेल्या अशा सार्वजनिक,  अन्नछत्री, टुकार भाकीतानुसार त्या राशीच्या लोकांना " प्रेमप्रकरणात यश" असे भाकीत त्या महिन्यात सांगितले आहे. 

या भाकीतामुळे त्या महिन्यात त्या तिघांना पोरी पटतील काय? अजिबात नाही. कारण पोरी पटवायला नुसते राशीपासून पंचमातील शुक्राचे भ्रमण पुरेसे नाही, तर त्याच्या कुंडलीत ५ /११ या स्थानांची दशा पाहिजे. ज्याच्या कुंडलीत ती दशा नाही तो कुणाला पटवायला गेला तर चप्पल खाईल.

राशीपासून अकरावा गुरू आला तर फार मोठा भाग्योदय होईल, अशा आशयाची वक्तव्ये हे लोक करतात. ज्याला ५/८/९/१२ ची मजबूत दशा लागलेय, त्याचा गुरू कुठे का असेना काय झ्यांट  फरक पडणार आहे? त्याच्या करिअरची नासाडी आणि चुथडा होणार, हे ठरलेलेच आहे.

त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टींना किती महत्त्व द्यायचे हे तुम्हीच ठरवा.

एकदा आम्ही नाशिकच्या सीबीएस स्टँडवर सकाळी शिर्डीच्या बसची वाट पहात उभे होतो. आमच्याबरोबर आमचे तीन चार स्नेही होते. रविवार होता. सकाळी ७ ची वेळ. एका स्नेह्यांनी पेपर आणले आणि त्यातील राशीभविष्य ते वाचत होते.  आमच्या बरोबरच्या दोघांची भविष्ये वाचून झाल्यावर ते आम्हांला म्हणाले,

" पंत, तुमची रास कोणती?"

आम्ही त्यांना म्हटले, " आधी सर्व बारा राशींची भविष्ये वाचा. त्यात सर्वात चांगलं भविष्य ज्या राशीचे दिले असेल ती आमची रास."

आपला,
(नीरक्षीरविवेकी) धोंडोपंत

1 comment:

manoj said...

नमस्कार पंत
तुमचे लेख खरोखरीच माहितीपूर्ण आणि खर तर मुलभूत आणि कालानुरूप असतात, त्यामुळे वाचानाय्स नेहमीच आवडते.
आम्हाला पत्रिकेच अजिबातच ज्ञान नाही त्यामुळे ५/८/९/१२ ची मजबूत दशा यासारखे विधान जे नेहमीच तुमच्या लेखात असतात ते मात्र कळत नाही. असो. बाकी शनी अमावासेला शनी दशा असणार्यांसाठी पण मार्गदर्शन करावे हि विनंती.
धन्यवाद