Thursday, November 18, 2010

ज्याला लिहिता आली मोडी... त्याला कळली लेखनातली गोडी

|| श्री स्वामी समर्थ||
लोकहो,

या ब्लॉगावर मोडी लिपीत आम्ही लिहिलेला काही मजकूर प्रकाशित केला आणि चोखंदळ वाचकांनी मोडीबद्दल लिहा अशा सूचना केल्या. मोडी लिपीबद्दल आदर असलेला सुसंस्कृत आणि चोखंदळ वाचकवर्ग या ब्लॉगला लाभला, याचा आम्हांला फार आनंद आहे. 

"मोडीबद्दल लिहा" हे आम्हांला सांगणे, म्हणजे "तुमच्या प्रेयसीबद्दल लिहा" हे सांगण्यासारखे आहे. कारण मोडी लिपीवर आम्ही प्रेयसीवर करावे तसे प्रेम करतो. त्यामुळे त्यांच्या या आग्रही मागणीची पूर्तता करण्यासाठी मोडी लिपीबद्दल हा लेख.

सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, मोडी ही कुठलीही स्वतंत्र लिपी नाही. ही देवनागरीची उप-लिपी आहे. मोडी लिपीची जननी ही देवनागरीच आहे. जरी मोडीने गुजराती, कन्नड व बंगाली लिपीतील काही वर्ण घेतले असले तरी तिचा पाया हा देवनागरीचा आहे.

देवनागरी असतांना मोडी लिपी अस्तित्वात का आली? 

याचे कारण असे की, देवनागरीत लिहितांना वेळ बराच वाया जातो. ही बाब पटो किंवा न पटो, पण हे वास्तव आहे. कारण प्रत्येक अक्षर सुटे लिहायचे, प्रत्येक शब्दावर शिरोरेघ मारायची, विरामचिन्हांचा वापर करायचा यामुळे लेखनाचा वेग मंदावतो.

मोडी लिपीचे जनक श्री. हेमाडपंत आहेत. त्यांचे नाव पंत हेमाद्री असे होते. हे अत्यंत विद्वान आणि प्रगल्भ बुद्धिमत्तेचे होते. ज्यावेळेस यादवांचे साम्राज्य होते त्याकाळी राजा रामदेवराव यादवांच्या दरबारात ते 
"करणाधिप" या हुद्यावर होते. राज्याच्या सर्व वसुलीचे कामकाज करणे, राजकारणाबद्दल राजाला योग्य ती सल्लामसलत देणे, दरबाराचा सर्व पत्रव्यवहार पाहणे  हे त्यांचे काम होते. आजच्या युगात "चीफ सेक्रेटरी" ज्याला म्हणतात तसा त्यांचा हुद्दा होता.

सहाजिकच त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर पत्रव्यवहार पहावा लागे. अशा वेळेस अशा एखाद्या लिपीची आवश्यकता त्यांना भासू लागली की ज्यात अत्यंत शीघ्रतेने कमीत कमी वेळात प्रचंड मजकूर लिहिता येईल. त्या गरजेपोटी त्यांनी मोडी लिपीची निर्मिती केली.

मोडी ही शीघ्रलिपी आहे. ज्याला इंग्रजीत रनिंग हॅण्ड म्हणतात तशी देवनागरीची रनिंग हॅण्ड म्हणजे मोडी.

अत्यंत शीघ्र गतीने लेखन हे जसे मोडीचे वैशिष्ट्य आहे तसेच अत्यंत सुंदर वळण हे ही तिचे वैशिष्ट्य आहे. मोडी लिपी दिसायला अतिशय सुंदर दिसते. तिचा स्वतःचा रूबाब आहे, तिच्यात नज़ाकत आहे.

आपल्या सर्वांचे पूर्वज मोडी लिपीतच लिहायचे. याचे कारण तेराव्या शतकापासून महाराष्ट्रात मोडी लिपी रुजलेली आहे. यादवकाळापासून ते शिवशाही, पेशवाई, परकीय राजवट, स्वातंत्र्यसंग्राम असे अनेक टप्पे या मोडी लिपीने पाहिलेले आहेत. छत्रपतींचा सर्व पत्रव्यवहार याच लिपीतून होत असे. सातशे वर्षांचा महाराष्ट्राचा इतिहास या लिपीमध्ये नोंदला गेलेला आहे.

सन १९५२ पर्यंत मोडी लिपी शालेय शिक्षणक्रमात होती. त्यानंतर त्यावेळच्या मूर्ख राजकारण्यांनी शिक्षणातून मोडी लिपी काढून टाकली. काही लोकांना असे वाटते की, ब्रिटीशांनी मोडी लिपी हद्दपार केली. पण तसे नाही. ब्रिटिश असतांनाही मोडी लिपी पूर्ण जोमात होती. अगदी ईस्ट इंडिया कंपनीचे पत्रव्यवहारही मोडी लिपीत होत असतं. १९४७ ला जेव्हा ब्रिटीश देश सोडून गेले त्यानंतर आलेल्या भारतीय राजकारण्यांचे हे १९५२ सालचे उपद्व्याप आहेत. 

हिंदी ही राष्ट्रभाषा व्हावी म्हणून प्रादेशिक लिप्यांना नेस्तनाबूत करण्याचा एक व्यापक कट त्याकाळी शिजला होता असे म्हणतात. कारण हिंदी रुजवायची असेल तर देवनागरीच राहिली पाहिजे. मग देवनागरी सोडून इतर लिप्यांना उडवायचे. त्या हेतूने मोडी शिक्षणक्रमातून हद्दपार केली गेली असे मानणारा एक विद्वान वर्ग आहे, आणि त्यांचे हे म्हणणे पटण्यासारखे आहे.

मोडी लिपीचे सौंदर्य हा मोठा मनोरंजक आणि आल्हाददायक विषय आहे. मोडी लिपीतील प्रत्येक अक्षर हे लपेटीदार आहे. आणि अक्षरे जोडून लिहिली जातात त्यामुळे एखादी माळ गुंफल्यासारखी मोडी दिसते. तुम्हाला जे जे साधारण सत्तरी  ओलांडलेले वृद्ध लोक माहित असतील, त्यांचे हस्ताक्षर पहा. त्या बहुतेकांचे हस्ताक्षर उत्तम असेल. तुम्ही या गोष्टीचे अवलोकन करा. आम्ही अनेक वृद्ध व्यक्तिंची हस्ताक्षरे पाहिली आहेत. ती अतिशय सुंदर आहेत. 

आमचे आजोबा श्री. तात्यासाहेब आपटे यांचे हस्ताक्षर अतिशय सुंदर होते. याचे कारण हे की, हे लोक लहानपणापासून मोडीत लिहायचे. त्याकाळी मोडीचा कित्ता गिरवत असतं. त्यामुळे त्यांच्या अक्षरांना सुंदर वळण लागलेलं असे.

त्यानंतरची जी पिढी आली म्हणजे जे १९५२ नंतर शाळेत गेले त्या बहुतेकांची अक्षरे ही बिघडलेली दिसतील. अर्थात अपवाद प्रत्येक गोष्टीला असतात. पण त्या पूर्वीच्या काळात खराब अक्षर असलेला एखादा सापडे, १९५२ नंतर चांगलं हस्ताक्षर असलेला एखादा सापडतो. अशा बहुतेकांचे हस्ताक्षर पाहिल्यावर तर आमच्या मनात,

" रांडेच्यान् काय लिहिलाय तेच कळत नाही" असा विचार येतो.  याचे प्रमुख कारण हे की, त्या लोकांचा मोडीशी संबंध आला नाही.

मोडी लिपीची लेखन वैशिष्ट्ये:-

मोडी लिपी ही देवनागरीप्रमाणे डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. लिहिण्यापूर्वी ज्या शाईने आपण मजकूर लिहिणार त्या शाईने डावीकडून उजवीकडे एक ओळ आखून त्याखाली मोडी लिहिली जाते. प्रत्येक शब्दावर रेघ देण्याचा वेळ त्यामुळे वाचतो. तसेच पूर्वीच्याकाळी मोडी एकही शब्द आणि वाक्य न तोडता सलग लिहिली जात असे. त्यामुळे वाचणार्‍याच्या प्रज्ञेची कसोटी लागे. 

म्हणून पूर्वी पत्रात, " लिहिणार्‍याचे वाचणार्‍यास दंडवत" असे लिहिण्याची प्रथा होती. कारण लेखन करणार्‍याने जे लिहिले आहे ते त्याच अर्थाने समजून घेण्याची बुद्धी वाचणार्‍याजवळ हवी. 

नको तिथे वाक्य तोडून वाचले तर अनर्थ होईल. उदाहरणार्थ, आमचे एक मित्र आहेत कवी इलाही जमादार. त्यांच्या एखाद्या रचनेबद्दल लिहितांना, समजा असे लिहिले की,

कवी इलाही जमादार आहे.

हे वाक्य मोडीत लिहायचे तर ----- कवीइलाहीजमादारआहे ------ या पद्धतीने पूर्वी लिहिले गेले असते. 

वाचणार्‍याने हे वाक्य नको तिथे तोडले तर ---  कवी इला ही जमादार आहे --- असे वाचले जाईल आणि अनर्थ होईल. त्यामुळे मोडीत  लेखन करणार्‍यापेक्षा, ते वाचणार्‍याच्या बुद्धीचा कस लागतो. 

हल्ली मोडीत सुटे शब्द लिहिले जात असल्यामुळे मोडी बरीच "माणसाळलेय". नाहीतर पूर्वी मोडीला पिशाच्च लिपी म्हणत ते यामुळेच.

मोडीचे दुसरे वैशिष्ट्य हे की, मोडीत एक अक्षर अनेक प्रकारे लिहिले जाते. काही अक्षरे तर सहा सात पद्धतीने लिहिली जातात. इतकेच नव्हे तर नेहमीप्रमाणे डावीकडून उजवीकडे लिहिण्याऐवजी उजवीकडून डावीकडे लिहिली जातात. उदाहरणार्थ, 'च' हे अक्षर डावीकडून उजवीकडे जसे लिहिले जाते तसे उजवीकडून डावीकडेही लिहिले जाते. त्यात प्रत्येकाच्या "चॉईस" चा भाग आहे.  आम्ही शक्यतो 'च' उजवीकडून डावीकडे लिहितो.

मोडीत 'र' अनेक प्रकारे लिहिला जातो. त्यात ज्या अक्षरांत बालबोध प्रमाणे काना असतो त्या कान्याला र जोडला जातो. त्यामुळे एका अक्षरात दोन अक्षरे लिहून होतात.

मोडीत काही अक्षरे अशी आहेत की ज्यात अत्यंत सूक्ष्म भेद किंवा प्रचंड साम्य आहे. लेखन करतांना त्यांच्या वळणावर नीट लक्ष ठेऊन लिहावे लागते. अक्षराचे वळण जरा चुकले की अनर्थ होतो. उदाहरणार्थ, 

"कौलांवर पक्ष्यांचा थवा दिसत होता"  या वाक्यात थ लिहितांना गडबड झाली आणि थ चे वळण चुकले तर "कौलांवर पक्ष्यांचा खवा दिसत होता" असे वाचले जाईल. त्यामुळे प्रत्येक अक्षराचे वळण नीट येईल ही काळजी घ्यावी लागते.

तसेच मोडीचा महत्त्वाचा भाग म्हणजे र्‍हस्व दीर्घाची भानगड मोडीत नाही. सर्व उकार हे र्‍हस्व आणि सर्व इकार दीर्घ.  कितीही खटकलं तरी ते तसचं लिहायचं. लेखनाचा वेग महत्त्वाचा. बाकी विचार करायचा नाही.             उदाहरणार्थ, कविवर्य राजा बडे यांची

चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले.... ही ओळ मोडीत.... चांदणे शींपीत जाशी चालता तु चंचले...  

अशीच लिहिली जाईल.  किंवा सुरेश भटांची

दूर दूर तारकातं, बैसली पहाट न्हातं...... ही ओळ मोडीत.... दुर दुर तारकातं, बैसली पहाट न्हात.... 

अशीच लिहिली जाईल. किंवा


जिवलगा राहिले रे, दूर घर माझे...  ही ओळ मोडीत....  जीवलगा राहीले रे, दुर घर माझे


अशीच लिहिली जाईल. तिथे र्‍हस्व-दीर्घाचा पर्यायच नाहीये. अशा लेखनामुळे वृत्ताची काशी झाली का? मात्रा चुकल्या का? या चौकशा करायच्या नाहीत.

अशी आहे मोडी

या महाराष्ट्राच्या इतिहासाची राखणदार बनून राहणारी, सातशे वर्षांचा इतिहास स्वतःमध्ये साठवून ठेवणारी, छत्रपतींची पत्रे सौभाग्यलेण्यासारखी मिरवणारी, तुकोबांच्या अजरामर अभंगाना स्वत:चे कोंदण बहाल करणारी, अत्यंत कमी वेळात लेखकाला भरपूर मजकूर लिहून देणारी, वाचणार्‍याच्या डोक्याचं खोबरं करणारी, विरामचिन्हे टाळणारी, सलग लेखनामुळे दुर्बोध ठरणारी, विविध लिपीतील वर्ण घेऊनही स्वत:ची मिजास दाखवणारी, लिहिणार्‍याला वरदहस्त देणारी, वाचणार्‍याला वेठीस धरणारी, शुद्धलेखनाचे कोणतेही नियम न पाळणारी, शब्दसंक्षेप वापरून लेखनाची गती वाढवणारी, अनेक शब्द चुकीच्या पद्धतीने लिहूनही त्याची खंत न बाळगणारी, शुद्धलेखनाचा आग्रह धरणार्‍यांना फाट्यावर मारणारी, तिची खडतर साधना आणि सराव करणार्‍यालाच वश होणारी, एकदा वश झाली की आयुष्यभर त्याला लेखनाचा निखळ आनंद देणारी..... आणि

स्वतःच्या सौंदर्याने पाहणार्‍याचे हृदय घायाळ करणारी, त्याच्या हृदयाचे सिंहासन काबीज करून त्याची मल्लिका बनणारी...

त्या मोडी लिपीला आणि तिचे जनक श्री. हेमाडपंत यांना आमचा दंडवत. मोडी नसती तर आम्ही कसे लिहिले असते? असा प्रश्न आम्हाला अनेकदा पडतो.

कारण मोडीने जी लेखनाची मजा दिली ती अन्य कुठल्याही लिपीने दिलेली नाही. तसेच मोडीचा पदर 'हाती लागल्यावर' आम्ही सुद्धा इतर कुठल्या लिपीचा 'दामन' हाती यावा अशी अपेक्षा केली नाही. 

कारण ज्याला मोडी येते त्याला इतर कुठल्या लिपीत लिहावे असे वाटत नाही. उत्तम भोग हाती आला की दुय्यम भोग वृत्तीतून वजा होतो अशी मानवाचीच नव्हे तर सर्व प्राणीमात्रांची प्रवृत्ती आहे.

ज्यांच्या घरात मांजर आहे त्यांनी हा प्रयोग करून पहा. भुकेल्या मांजराला दूध पोळी खायला द्या. ते आवडीने खातं. ते खात असतांना त्याच्या समोर पापलेट, सुरमई धरा. मांजर दूधपोळी सोडून पापलेटच्या मागे जातं. उत्तम भोग मिळाला की लगेच दुय्यम भोग वजा होतो. 

किंवा एखादा कवी असतो. सुरूवातीस कविता लिहितो. मग त्याला गझल लिहायचे तंत्र साधतं. एकदा तो गझलेकडे वळला की बहुतकरून गझलच लिहितो.  असे आहे. 

मोडी आली की जे काही लिहाल ते मोडीतच यायला लागतं. म्हणूनच म्हणावसं वाटतं,

ज्याला लिहिता आली मोडी... त्याला कळली लेखनातली गोडी

आपला,
(मोडीप्रेमी) धोंडोपंत

16 comments:

mynac said...

प्रिय धोंडोपंत,
मोडी बद्दल माझ्या वाचनात आलेला हा पहिला लेख आहे.आपण दिलेल्या सखोल माहिती बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
१९५२ साली मोडी तत्कालीन राजकारण्यांनी हद्दपार केली ह्या आपण दिलेल्या माहिती मुळे उत्सुकतेपोटी १९५२ सालात गेलो.१९५२ साली नेहरूंचे १ले सरकार स्थापन केले गेले आणि अजून एक विलक्षण योगागोग म्हणजे कुख्यात तस्कर वीरप्पनचा जन्म नि योगी योगानंद परमहंस ह्यांचा मृत्यू हि १९५२ ह्या साला मधेच झाला होता असो.थोडक्यात काय तर १९५२ हे साल जणू चांगल्या गोष्टी नामशेष होऊन वाईट गोष्टींचा पायंडा पडण्याचे जणू वर्ष होते तर.

Aditya said...

पंत, एकदम छान आणि जरा वेगळ्या विषयावरचा लेख..मोडीचा इतिहास वाचायला मजा आली..मला आठवते, माझ्या आजोबांना त्यांच्याकडे असलेली मोडी लिपीमधील काही पेशवेकालीन पत्रे मराठीमध्ये लिप्यांतरीत करायची होती. त्या पत्रांमधला मजकुर समजणारा व्यक्ती सापडणे ही एक कठीण गोष्ट बनली होती..शेवटी आजोबांनी सगळी पत्रे पुण्यातील राजा केळकर संग्राहलयाला सप्रेम भेट देऊन टाकली :-)

mohanrao said...

shri dhondopant

Saprem namaskar

aaple sarva lekh mee nitya vachat aasto atishya chhan knowledge wadhavnare aahet

प्रसाद साळुंखे said...

नमस्कार पंत,
मोडीवरच्या रंजक माहितीसाठी आभार
तुमचे ज्योतिषी किस्से मला जाम आवडतात

Naniwadekar said...

गीताई-मधे व्याकरणाची एकही चूक राहू दिलेली नाही, हे आत्मविश्वासपूर्वक सांगणार्‍या विनोबांची 'वीनोबा' अशी सही मी पाहिली आहे. त्यामागे मोडीचा प्रभाव हे कारण असू शकेल. मात्र त्यांनी त्यांच्या प्रसिद्‌ध प्रस्तावनापर श्लोकांत 'लू' हा दीर्घ ऊकार वापरला आहे. र्‍हस्व इ-कार वापरलेला नाही आण्भि हस्ताक्षरांत 'तीचा' शब्द दिसतो. छपाअ‍ीत 'तिचा' हा शब्द व्यवस्थित दिला आहे.

विनोबांच्या अक्षरांतला श्लोक असा :
गीताअ‍ी माअ‍ुली माझी
तीचा मी बाळ नेणता
पडता रडता घेअ‍ी
अ‍ुचलूनी कडेवरी

एके काळी अशिक्षित लोक आपल्या आलेली पत्रें सुशिक्षितांकडे, विशेषत: ते ज्यांच्याकडे मिंधेपणानी भिक्षा मागत त्या ब्राह्‌मणांकडे, नेत आणि वाचून दाखवण्याची विनन्ती करत. म्हणून 'वाचणार्‍याला लिहिणार्‍याचा नमस्कार' लिहिण्याची प्रथा होती, असा एक मतप्रवाह आहे.

धोंडोपंत said...

एके काळी अशिक्षित लोक आपल्या आलेली पत्रें सुशिक्षितांकडे, विशेषत: ते ज्यांच्याकडे मिंधेपणानी भिक्षा मागत त्या ब्राह्‌मणांकडे, नेत आणि वाचून दाखवण्याची विनन्ती करत. म्हणून 'वाचणार्‍याला लिहिणार्‍याचा नमस्कार' लिहिण्याची प्रथा होती, असा एक मतप्रवाह आहे...... -- नानिवडेकर

मोडी ही कुठल्याही जातीची मक्तेदारी कधीच नव्हती. ती राज्यकारभाराची लिपी होती. त्यामुळे तिचा वापर समाजातील सर्व थरातील लोक करीत. अनेक वैश्य लोक या मोडीत ब्राह्मणांपेक्षाही प्रवीण होते. कारण त्यांचा लेखनाशी घनिष्ठ संबंध येई. त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार याच लिपीत नोंदले गेले आहेत.

तुकारामबोवांनी सर्व अभंग मोडीतच लिहिलेले आहेत. त्यामुळे त्या दंडवताचा आणि ब्राह्मणांचा काही संबंध नाही.

दुर्बोधपणे लिहिला गेलेला मजकूर सुबोधपणे वाचणार्‍याला आदराने घातलेला तो दंडवत होता. मग तो वाचणारा कुणीही आणि कुठल्याही जातीचा असो.

सावर्ड्याच्या जवळच्या एका गावात गुणाजी बुधाजी मुकादम नावाचे एक कुणबी गृहस्थ रहायचे. आता ते हयात आहेत की नाही याची कल्पना नाही. कारण आम्ही त्यांना काही वर्षांपूर्वी भेटलो तेव्हा त्यांचे वय ऐंशीच्या आसपास असेल. आमचे एक स्नेही त्यांच्याकडे घेऊन गेले होते. त्यांचे हस्ताक्षर बघायला.

गृहस्थ एकदम अशिक्षित. कधीही शाळेत गेलेले नाहीत. मजुरी करून पोट भरायचे. गावातल्या एका लेले नावाच्या शास्त्रीबुवांची जमीन कसायचे. शास्त्रीबुवांनी त्यांना मोडी लिहायला शिकवली. पुढे मजुरी सोडून लेखनिकाचे काम करायला लागले. तलाठी, मामलेदाराच्या कचेरीत करावयाचे अर्ज, खरेदी खत, साठ्येखत वगैरे लिहून देत. टाकाने लिहीत. त्यांच्याइतके सुंदर हस्ताक्षर आम्ही आजपर्यंत पाहिलेले नाही.

गुणाजी बुधाजी मुकादम यांच्या पायावर आम्ही डोके ठेवले. जिथे दिव्यत्व आहे तिचे आमचा दंडवत असतो आणि तो तसाच असावा.

माणसाच्या मोठेपणाचा आणि जातीचा काही संबंध नाही.

धोंडोपंत

धोंडोपंत said...

गीताई आणि विनोबा भावे या विषयांवर आम्ही काही भाष्य करत नाही. विनोबांनी "वीनोबा" म्हणून सही केली असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण ते कधी काय करतील याचा भरवसा कुणालाच देता आला नाही.

एरव्ही मौनात असणार्‍या विनोंबांचे मौन देशाच्या पंतप्रधान आणि मंत्री भेटायला आले की कसं सुटायचं? आणि मग विनोबा पोपटासारखे चुरूचुरू कसे बोलायचे याचेही उत्तर कुणाला मिळालेले नाही.

धोंडोपंत

Naniwadekar said...

> दुर्बोधपणे लिहिला गेलेला मजकूर सुबोधपणे वाचणार्‍याला आदराने घातलेला तो दंडवत होता. मग तो वाचणारा कुणीही आणि कुठल्याही जातीचा असो.
>----

एके काळी अनेक लोकांना, विशेषत: त्या काळच्या अस्पृश्यांना, कुठलीच लिपी वाचता येत नसे. 'तुमची अमुक अमुक (चुलत की) मामेबहीण वारली' अशी ४-५ शब्दांची चिठ्ठी वाचायला शंकरराव खरातांच्या वडिलांना एका ब्राह्‌मणाकडे ज़ावं लागलं, आणि त्या संधीचा फायदा घेऊन त्या ब्राह्मणानी ती ओळ वाचून दाखवण्याआधी त्याचा मोबदला म्हणून खूप लाकडं फोडून घेतलीत, हा पूर्ण किस्सा 'तराळ अंतराळ' पुस्तकात आहे. या पार्श्वभूमीवर आधीच आपल्या माणसाला पत्र वाचून घेण्याचा त्रास होणार, तो सौम्य करायला 'वाचणार्‍याला दंडवत' घालायची पद्‌धत होती हा दावा खरा असण्याची शक्यता आहे. हा मज़कूर पाठवणार्‍यालाही त्या दोन ओळी कळवण्यासाठी कोणी राबवलं असेल.

माझ्या आज़ोबांना कमी दिसू लागल्यावर त्यांचे एक भाऊ 'वाचणार्‍यालाही दंडवत' घालत. असा गमतीचा दंडवत मला पत्र वाचून दाखवताना मिळाला आहे. त्या दंडवतामागे दुर्बोधतेशिवाय इतर कारणं असू शकतात. त्या काळच्या एका गृहस्थांनी मला या वाक्यामागचं सांगितलेलं कारण हे की पत्र वाचून घेणारा हा खालच्या सामाजिक स्तरावरचा असल्यामुळे त्याच्या वतीनी त्याला पत्र लिहिणारा एक दंडवत घालत असे.

Naniwadekar said...

सावरकरांनी इंग्रज़ सरकारला एक पत्र लिहिलं यावरून सावरकरांच्या सर्व कृती पारखणारे सावरकर-द्‌वेष्टे आणि विनोबांच्या कॉग्रेस लांगूलचालनावरून 'त्यांचा कधीच काही भरवसा नव्हता' म्हणणारे हे दोघेही एकाच रोगानी पछाडलेले. विनोबांच्या मृत्युनंतर 'साहित्यिक म्हणून ते फार श्रेष्ठ होते' हे ग वा बेहेरे यांनी लिहिलं, हे आमचं नशीब. त्यामुळे आमचे डोळे उघडले, आणि पुढे त्यांचं साहित्य आम्ही त्यांच्या अनेक विक्षिप्त प्रकारांचं ओझं विनाकारण न वागवता वाचू शकलो.

धोंडोपंत said...

श्री. ग.वा. बेहेरे यांना विनोबांच्या दिव्यत्वाचा झालेला ’दृष्टांत’ प्रमाण मानावा का, हा ज्याचा त्याचा प्रश्न आणि मतस्वातंत्र्याचा भाग आहे.

विनोबांच्या कॉंग्रेसप्रेमी वर्तनाचे आणि राजकारण्यांशी ’जमवून’ घेण्याच्या कृत्याचे समर्थन करणारे लोक विनोबांच्या काळातही होते.

भूदान चळवळीचा प्रणेता कॉंग्रेसच्या नेत्यांपुढे जेव्हा "घालीन लोटांगण, वंदिन चरण" करतो, हेच विनोबांना समजून घेण्यास पुरेसे आहे असे आम्हांला वाटते.

एक मात्र खरे की, विनोबांचा पंचमेश व भाग्येश दशमात असला पाहिजे, त्यामुळे हे सर्व उपद्व्याप करूनही विनोबा संत ठरले आणि त्यांच्या आश्रमाला तीर्थक्षेत्राचा लौकिक प्राप्त झाला.

धोंडोपंत

Naniwadekar said...

आपटे साहेब : तुमच्या विधानांची मणिशंकर-अय्यर-आवृत्ती अशी :

१) श्री. ग.वा. बेहेरे यांना सावरकरांच्या दिव्यत्वाचा झालेला ’दृष्टांत’ प्रमाण मानावा का, हा ज्याचा त्याचा प्रश्न आणि मतस्वातंत्र्याचा भाग आहे.

२) तुम्ही बरोबर न आल्यास तुमचा विरोध मोडून कार्यसिद्‌धी करीन अशी वल्गना करणारे सावरकर 'राजकारणात भाग घेणार नाही पण मला अंदमानातून सोडा हो' हे पत्र पुढे लिहिते झाले, हेच सावरकरांना समजून घेण्यास पुरेसे आहे असे आम्हांला वाटते.

विनोबांच्या लेखणीला बा भ बोरकर, पु ल देशपांडे यांच्या योग्यतेचे साहित्यिक चाहते म्हणून लाभले होते. त्याचा संबंध पंचमेशाशी तुम्हाला लावायचा असेल तर ते स्वातंत्र्य तुम्हांला आहेच. त्यांच्या थोरवीकडे दुर्लक्ष करून त्यांनी सत्ताधीशांच्या केलेल्या लांगूलचालनाबद्दलच बोलायचे मणिशंकरी स्वातंत्र्यही प्रत्येकाला आहेच.

धोंडोपंत said...

नमस्कार नानिवडेकर,

<<<< त्यांच्या थोरवीकडे दुर्लक्ष करून त्यांनी सत्ताधीशांच्या केलेल्या लांगूलचालनाबद्दलच बोलायचे मणिशंकरी स्वातंत्र्यही प्रत्येकाला आहेच.>>>>

तेच आमचे म्हणणे आहे. एवढा थोर समजला गेलेला माणूस जर कॉंग्रेसच्या नेत्यांचे जोडे कवटाळत असेल तर ती त्याची थोरवी काय कामाची? अगदी अंतू बर्व्याच्या भाषेत सांगायचे तर त्यांच्या मोठेपणाची नोंद आम्ही करायची ती कुठल्या खात्यावर?

या चर्चेतून आपण तात्यारावांना वगळूया. विनोबा आणि तात्याराव ही दोन टोकं आहेत. तात्याराव सूर्य होते. त्यांना विनोबांच्या चर्चेत आणणे हे संयुक्तिक वाटत नाही. तात्यारावांच्या दिव्यत्वाचा कुणाला दृष्टांत होण्याची आवश्यकता नाही. सूर्याला पाहून हा सूर्य आहे, असे म्हणावे लागत नाही.

आपला,
(सावरकरभक्त) धोंडोपंत

mohanrao said...

"ज्याला लिहिता आली मोडी... त्याला कळली लेखनातली गोड...":केवळ काँग्रेस प्रेमामुळे विनोबा सामान्य कसे काय ठरतात ?

काँग्रेस द्वेषी फार थोर व काँग्रेस प्रेमी मग ते कितीही विद्वान असो ते तुमच्या लेखी तुच्छ याला काय म्हणावं
हा नीर-क्षीर न्याय नाही पंत केवळ एखाद्या काँग्रेस प्रेमा मुळे तो कितीही विद्वान असला तरी तो तुमच्या लेखी मुर्खच नाही का ?

मोहनराव

Rajesh Khilari said...

कवीइलाहीजमादारआहे
- कवी इला ही जमादार आहे
- कवी इलाही जमादार आहे.

या वरील धोंडोपंतांनी दिलेल्या उदाहरणावरून मोडी लिपी शिकत असतान आमच्या वर्गात सांगितले गेलेले वाक्य आठवले.


रस्त्यातनाचतमासेचाललेहोते
- रस्त्यात नाचत मासे चालले होते.
- रस्त्यात नाच तमासे चालले होते.

Rajesh Khilari said...

दुसरे महत्त्वाचे म्हणजे मोडी लिपीला पिशच्च लिपी हे अन्य कोणत्या कारणामुळे नसून तर मौर्य काळापासून “पैशाची” नावाची भाषा बोलली जाणारे लोक त्यांच्या लेखनात फक्त मोडी लिपीचाच वापर करीत. त्याकाळी हीला मोडी लिपी हे नाव नव्हते. पैशाची भाषेची लिपी म्हणून “पिशच्च” लिपी. आश्चर्य म्हणजे हेला “भूत लिपी” आणि “राक्षस लिपी” असे ही संबोधले गेले आहे. त्याला कारण म्हणजे ही लोकं प्रगतीशील नव्हती आणि सातवाहन राजवटीत याची अवहेलना होत. या उपाध्या त्या सातवाहन सम्राटांनी दिल्या आहेत. एक कवी गुणाध्य सोडला तर अन्य कोणी या पिशच्च लिपीत लेखन केल्याचे इतिहासाला ज्ञात नाही. (ही घटना इ.स ८० मधली आहे). पिशाच्च लिपीची व्युत्पत्ती ही ईसापूर्व ४०० वर्षांपूर्वी सम्राट अशोक राजवटीच्या वेळी मौर्य लिपीत दडली आहे. मौर्य लिपी आणि पाली भाषा ही बौद्ध पंथा बरोबर सिंहलद्वीपात (श्रीलंकेत) गेली. मग त्या श्रीलंकेतील लिपीचे या मोडी लिपीशी साधारम्य आढळल्याने एका स्वयंघोषित संशोधकाने म्हटले की हेमाद्रिपंडिताने मोडी लिपी श्रीलंकेतून आणली. महादेवरावयादवांच्या काळात मर्‍हाट्टी हीला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि मोडी लिपी ही व्यवहारीक आणि खाजगी पत्रव्यवहाराची लिपी झाली. पण हेमाडपंतांनी ती कदापि निर्मीली नाही.अन्यथा, प्रश्न उद्भवतात की त्यांनी ही निर्माण कधी केली; एवढे मोठे साम्राज्य – त्यात कानाकोपर्‍यात यांचे पत्र जात. मग या सर्व लोकांना मोडी लिपी शिकवली केंव्हा आणि कशी ?

abhayvarsha said...

सर, आपल्या प्रेरणेने मोडीचा रा.म्हात्रेगुरूजींचा मुलुंड येथील शिकवणी वर्ग करीत आहे. या पूर्वी लहान असतांना माझ्या काकांकडून मोडीची तोंडओळख करून घेतली होती. पण आता मोडीचे अधिकृत प्रशिक्षण घेत आहे. मजा येत आहे.