Monday, November 29, 2010

" हे कसले स्वातंत्र्य अगस्ती?"

॥ श्री स्वामी समर्थ॥
लोकहो,

या देशात भ्रष्टाचाराने एवढी वाईट पातळी गाठलेली आहे की सामान्य माणसाने इथे कसे जगावे हा प्रश्न आहे. गेल्या काही महिन्यात वृत्तपत्रात जे काही छापून येताय ते पाहिले की, कुठल्याही व्यक्तिचे मन विषण्ण होईल. 

देशात भ्रष्टाचार इतका वाढला आहे की, आता देश रसातळाला जाणे अजून काय शिल्लक आहे? असे वाटते. कॉमनवेल्थ असो, स्पेक्ट्रम असो, आदर्श असो.......  पाच उंगली घी में, सर कडाई में.... असे चाललेले आहे.

परवा श्री. रतन टाटा यांनी त्यांच्या मुलाखतीत हाच मुद्दा मांडला आहे. " हे असेच चालू राहिले तर जगात भारताची किंमत शून्य होईल" हे श्री. टाटा म्हणाले.

प्रत्येक पक्षाचे नेते बरबटलेले आहेत. जिथे जाऊ तिथे खाऊ.... या प्रवृत्तीचेच लोक राजकारणात येत आहेत. काही मोजके अपवाद वगळता, गेंड्याच्या कातडीचे राजकारणी, हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. समाजाची, देशाची सेवा वगैरे भानगडी आता काही नाहीत. आपला गल्ला भरायचा. बसं.

महाराष्ट्रात तर बघायलाच नको. 

" मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा" 

या ओळी म्हणतांना, यापुढे शंभर वेळा विचार करायला लागेल, असे उपद्व्याप येथील राजकारणी आणि नोकरशहांनी केलेले आहेत. 

त्यावर हे काव्यात्मक भाष्य:-

लाजिरवाणे वळण मिळाले
या देशाला ग्रहण मिळाले

कसे त्यास ’आदर्श’ म्हणावे?
जिथे गुरांना कुरण मिळाले

आधी होता तहानलेला
मंत्री झाला.. धरण मिळाले

नेत्यांची कोठारे भरली
सामान्यांना सरण मिळाले

स्वत:च नेते बरबटलेले
चेल्यांना मग स्फुरण मिळाले

"हे कसले स्वातंत्र्य ’अगस्ती’?"
"जगतांनाही मरण मिळाले"

आपला,
(व्यथीत) धोंडोपंत


3 comments:

mynac said...

प्रिय धोंडोपंत,
सर्वसामान्य माणसाची व्यथा तुम्ही मोजक्या नि नेमक्या शब्दात पकडली.
राजकारण म्हणजे बिन भांडवली श्रीमंत होण्याचा धंदा नि मार्ग नि तो हि अल्पावधीत.
सरकारी नोकरी म्हणजे लाच खाण्याचा अधिकृत परवाना असलेले ठिकाण.
नि काही सन्माननीय अपवाद वगळता धंदा करणे म्हणजे फसविणे किंवा घोडा लावणे,
जीवघेण्या स्पर्धे मुळे नि चंगळवादी विचारसरणी मुळे वर उल्लेखिलेल्या गोष्टी ह्या आजच्या समाजव्याख्या बनताना दिसत आहेत.
"अगस्तीना" पडलेला प्रश्न हाच ह्या देश पुढील सध्याचा यक्षप्रश्न आहे.त्या मुळे "यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत"ची वाट बघायची नि दुसरे काय?

Anjali said...

panta, agadee sola ane sach baat!! kay karUn thevala aahe deshacha ya rajkarnyani... baghunach udvignata yete :(

अमोल केळकर said...

वा पंत वा वा !!