Sunday, February 28, 2010

जन्मवेळशुद्धी.....|| श्री स्वामी समर्थ||
लोकहो,

आज सकाळची कन्सलटेशन्स उरकली आणि गौरव पेठे हा ज्योतिष अभ्यासक आम्हांला भेटायला आला. त्याला काही ज्योतिषविषयक शंकांचे निरसन करून घ्यायचे होते म्हणून त्याने काल आम्हांला फोन केला होता. आम्ही त्याला दुपारी बाराची वेळ दिली होती आणि त्यानुसार पेठे बरोब्बर बारा वाजता आमच्या घरी पोहोचला.

तो आल्यावर सौभाग्यवतींनी चहा करून दिला. चहा घेत आमचा विषय सुरू असतांना गौरव म्हणाला की,

"पंत, मला जन्मवेळेची शुद्धी करायला अजूनही नीट जमत नाही. ते करणं खूप किचकट वाटतं. एखाद्या जातकाची जन्मवेळ त्याला निश्चित माहित नसेल तर अशा पत्रिका बघणे जीवावर येतं. तर त्याबद्दलच मला तुम्हांला विचारायचे आहे."

आम्ही दोन वर्षांपूर्वी ज्योतिषशास्त्राच्या खाजगी शिकवण्या घेतल्या होत्या. दहा-बारा जणांचा एक ग्रुप होता. त्यांनी आम्हांला त्यांच्याच एका मित्राच्या घरी येऊन शिकविण्याची विनंती केली होती. त्या मित्राचे घर आमच्या घराजवळ असल्याने आम्ही मान्यता दिली आणि वर्षभर त्यांना आठवड्यातून एक दिवस आम्ही केपी शिकवली.  पुढे त्यातील तीन-चार जण मध्येच गळले, पण बाकीच्या आठ जणांनी शेवटपर्यंत येऊन सर्व अभ्यासक्रम शिकून घेतला. हा गौरव पेठे त्यापैकी एक.

आम्ही गौरवला विचारले, " तुला जन्मवेळेची शुद्धी करतांना नक्की काय समस्या येतात?"

त्यावर तो म्हणाला, " रुलिंगमधले ग्रह जर नीट मिळाले तर जमतं. पण कधी कधी तसं होत नाही. रुलिंगमधले ग्रह मदत करत नाहीत. कधी कधी जातकाचा जन्म दोन लग्नांच्या संधीवर असतो आणि दोन्ही लग्नस्वामी रुलिंगमध्ये नसतात. त्यावेळेस खूप "कन्फ्युजन" होतं. अशा पत्रिका फार त्रास देतात. त्यामुळे कधी कधी जमतं, कधी कधी नाही जमत"

आम्ही म्हटले, " तुझे लग्न झाल्यावर जर तू असे म्हणालास की, ' कधी कधी जमतं, कधी कधी नाही जमत' तर तुझी बायको राहील का तुझ्याबरोबर?" 

आमच्या वाक्यावर तो खळखळून हसत म्हणाला, " पंत, ते दरवेळेस जमतं हो"

आम्ही विचारले, " जेव्हा तुला जन्मवेळशुद्धी करायला जमत नाही, तेव्हा तू काय करतोस? पत्रिका कशी बनवतोस?"

तो म्हणाला," मी ती पत्रिका सरळ बाजूला ठेवून देतो. नंतर काही तासांनी पुन्हा प्रयत्न करतो. तेव्हा रुलिंगप्लॅनेट्स बदलले असतील (लग्न आणि लग्नाबरोबर इतर) तर मला जमतं. नाहीतर पुन्हा काही तासांनी/ दुसर्‍या दिवशी प्रयत्न करतो."

आम्ही त्याला म्हटले, " असे करणे हे सर्वस्वी चूक आहे. ज्यावेळेस आपण जन्मवेळेची शुद्धी करायला बसतो, त्या वेळेचेच रुलिंग प्लॅनेट्स आपल्याला त्या व्यक्तीची अचूक जन्मवेळ सांगतात. हे असे रुलिंग प्लॅनेट्स बदलायची वाट पाहून आजचे उद्यावर ढकलणे अशास्त्रीय आहे."

असे म्हणत आम्ही आमची जी-मेलची पत्रपेटी उघडली. त्यातील एक ईपत्र काढले. त्या जातकाच्या सौभाग्यवतींनी हे पत्र पाठवले होते. जातकाच्या जन्मवेळेबद्दल शंका होती. त्या पत्राचा जन्मवेळेचा मजकूर इथे कॉपी पेस्ट करून चिकटवत आहोत जो आम्ही गौरवला दाखवला. गोपनीयतेच्या कारणास्तव जातकाचे नाव लपवले आहे.


From
to धोंडोपंत
cc
date 27 February 2010 19:16
subject Re: Consultation request
mailed-by gmail.com
Signed by gmail.com

hide details 19:16 (19 hours ago)
नमस्कार पंत
आज संध्याकाळी आपल्याशी बोलणे झाल्याप्रमाणे खालील माहिती पाठवत आहे

जातक : *** ***  ***
जन्मवेळ (approx ) : ३.२० दुपारी, नागपूर, २२/११/७७
आम्ही गौरवसमोर स्क्रीनवर पत्राचा एवढा मजकूर ठेवला. त्याला म्हटले, " या जातकाची जन्मवेळशुद्धी करायची आहे. त्याची अचूक जन्मवेळ शोधून काढून पत्रिका बनवायची आहे. ती सुद्धा आत्ताच. जे असतील ते रुलिंग प्लॅनेट्स घेऊन. तू कर सुरू आम्ही आलोच तंबाखू लावून. "

असे म्हणत आम्ही त्याला आमच्या खुर्चीत बसवले व त्याच्या हाती एक पॅड आणि पेन दिले. संगणकावर सॉफ्टवेअर सुरू होते. हाताशी पंचांग होते.

तेवढ्यात बेल वाजली आणि आमचे मित्र श्री. परब आले. परबांनी आल्याआल्या पिशवीतून एक स्टीलचा डबा काढला. आम्ही विचार केला की, आज रविवारी हा मालवण्या डबा घेऊन आला म्हणजे काहीतरी खास असेल.

परबांना म्हटलं, " परबांनू,  हे काय?" 

ते म्हणाले, " हा उंधियो आहे स्पेशल."

आम्ही म्हटले, " हत तिच्यायला....... आम्हांला वाटले वहिनींनी मस्त पापलेटाचं कालवण करून दिलं असेल. तर हे गुजरगांड्यांचे पदार्थ कसले घेऊन आलात?"

परब म्हणाले, " अहो लता ( त्यांची कोळीण) होळीसाठी गावाला गेलेय. आम्ही मार्केटमधून कधी बाजार आणत नाही. त्यामुळे ती येईपर्यंत पापलेट, सुरमई काही नाही."

परबांचा चहा झाला आणि ते गेले. आम्ही गौरवकडे आलो. म्हटलं, " काय महाराज, जातकाची अचूक जन्मवेळ मिळाली की नाही अजून?'

पेठे ने हिरमुसला चेहरा करून सांगितले, " पंत, यात खूप लोच्या आहे."

आम्ही म्हटले, " म्हणूनच तुला करायला दिलेय. संधीवर लग्न येताय. बरोबर?"

तो म्हणाला, " हो ना. आणि दोन्ही लग्नांपैकी एकही लग्नस्वामी रुलिंगमध्ये नाहीये."

" म्हणजेच तुला जन्मवेळशुद्धीबाबत ज्या समस्या आहेत, त्याच समस्या या ठिकाणी आहेत. बरोबर?'

"बरोबर"

"मग आपण या जातकाची अचूक जन्मवेळ शोधून काढू. म्हणजे तुझ्या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळेल."

पेठे खूश झाला. आम्ही त्याला म्हटले, " तुझे आत्ताचे रुलिंगप्लॅनेट्स काय आहेत?"

तो म्हणाला, " पंत, आत्ता वृषभ लग्न सुरू आहे. चंद्र केतुच्या मघा नक्षत्रात आहे. सिंह राशीत. आज वार रविवार आहे."

" वृषभेत लग्ननक्षत्र कुठले सुरू आहे?"

"रोहिणी"

"म्हणजे तुझे रुलिंग प्लॅनेट्स हे शुक्र, चंद्र, केतु, रवि, रवि हे झाले. बरोबर?"

तो म्हणाला, " हो हो. हे काय मी लिहिले आहेत ना" असे म्हणत त्यांनी लिहिलेले रुलिंगप्लॅनेट्स आम्हाला दाखवले.

अभ्यासकांपैकी ज्यांना खोलात जायचे असेल त्यांनी, दिनांक २८ फेब्रुवारी २०१० रोजी दुपारी १२.२६ चे मुंबई अक्षांशाचे रुलिंग प्लॅनेट्स मांडावेत.

आम्ही म्हटले, " आता आपण मूळ प्रश्नाकडे जाऊ. नागपूरच्या क्षितिजावर जन्मदिवशी म्हणजे दिनांक २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ०३.२० च्या सुमारास कोणते लग्न सुरू होते?"

" दुपारी ०३.२१ पर्यंत मीन लग्न होते, पुढे मेष सुरु झाले." पेठे

"आता यापैकी कोणत्या लग्नावर जातक जन्माला आला असेल हे आपल्याला शोधायचे आहे. मीनेचा आणि मेषेचा मालक कोण आहे?"

"गुरू आणि मंगळ"

" यापैकी कोणीही तुझ्या रुलिंगमध्ये नाही. मग तू कोणते लग्न निवडणार?"

"हाच तर प्रॉब्लेम आहे."

"यात प्रॉब्लेम काहीही नाही. आपण ठराविक पातळीच्या पलिकडे दृष्टी टाकत नाही. म्हणून आपल्याला प्रॉब्लेम वाटतो. मीनेत शेवटी कुठले नक्षत्र आहे?"

"रेवती"

"मालक?"
"बुध"

"बुध रुलिंगमध्ये आहे?

"नाही"

"मेषेची सुरूवात कशाने होते?"

"अश्विनी"

"मालक?"

"केतु"

"केतु रुलिंगमध्ये आहे?"

"होय. आणि तो सुद्धा नक्षत्रस्वामी म्हणून आलेला आहे."

"तुम्हाला जन्मवेळशुद्धी शिकवतांना राहु-केतु बद्दल मी एक महत्त्वाचा नियम सांगितला होता. तो कोणता?"

"अरे हो! पंत, तुम्ही म्हणाला होतात की जन्मवेळशुद्धीच्या वेळेस जेव्हा नक्षत्र निश्चित करायचे असते, तेव्हा जर राहु-केतु रुलिंगमध्ये नक्षत्रस्वामी म्हणून आले असतील तर त्यांचेच नक्षत्र असते."

"व्हेरी गुड. आता मला असे सांग की, हा नियम फक्त पाठ करून डोक्यात ठेवायचा की आवश्यक आहे तिथे वापरायचा?"

"ओ सॉरी. हे माझ्या लक्षातच नाही आलं. त्यामुळे केतुचेच नक्षत्र आहे. म्हणजेच जातकाचा जन्म अश्विनी नक्षत्रावरच झालेला आहे. बरोबर ना, पंत?" पेठ्याचा आम्हांलाच प्रतिप्रश्न.

"अश्विनी नक्षत्रावर जन्म झालाय तर लग्न कोणते असेल मीन की मेष?"

"अर्थात मेष"

"म्हणजे आता जातकाचे मेष लग्न, अश्विनी नक्षत्र हे निश्चित झाले. अश्विनी नक्षत्र कधी सुरू झाले आहे?"

"दुपारी ०३ वाजून २२ मिनिटांनी"

"म्हणजे जातकाची जन्मवेळ ०३.२२ पासून पुढे आहे."

"यस सर" पेठ्याला इंग्रजी मड्डम चावली.

"आता आपल्याला उपनक्षत्र निश्चित करायचे आहे. आपण रुलिंगमधील केतु वापरला.. शिल्लक कोणते ग्रह राहिले?"

"शुक्र आणि रवि"

"या दोघात बलवान कोण?"

"शुक्र. कारण तो लग्नस्वामी म्हणून आला आहे. रवि हा राशीस्वामी आहे त्यामुळे शुक्र हाच बलवान आहे."

"उत्तम. शुक्राचे उपनक्षत्र मेषेत किती अंश ते किती अंश आहे?"

पेठ्यांनी उपनक्षत्रस्वामीचे कोष्टक उघडले. आम्ही ते त्याच्या हातातून खेचून घेऊन बाजूच्या स्टुलावर टाकले. त्याला म्हटले,

"पेठे, अशी कोष्टके पाहून कुणीही उत्तरे देईल. १ ते २४९ नंबरच्या सबचे कोष्टक तोंडपाठ करा असे आम्ही तुम्हाला शिकवतांना म्हटले होते. दोन वर्ष केपी शिकून झाली अजून तुझे कोष्टक तोंडपाठ नाही. असा अभ्यास करून कोणी महान ज्योतिषी होईल काय?"

" अहो पंत, तुम्ही म्हणाला होतात खरे. पण एवढे मोठे कोष्टक तोंडपाठ होईल काय? हे शक्य तरी आहे का?"

"का शक्य नाही? आमचे हे संपूर्ण कोष्टक तोंडपाठ आहे. झोपेतून उठवून आम्हाला विचारले तरी एखादा ग्रह अमुक राशीत, अमुक अंशावर, अमुक कलांवर, अमुक विकलांवर आहे तर त्याचा सबलॉर्ड कोण हे आम्ही सांगू शकतो. जर आम्ही हे करु शकतो तर तू का नाही करू शकत?"

पेठे ने हात जोडत म्हटले, "पंत, तुम्ही महान आहात."

म्हटलं, " आम्ही महान आहोत हे सांगायचे नाहीये आम्हाला. तर आपण जे शास्त्र शिकतो त्यावर आपली प्रचंड मास्टरी असणे आवश्यक आहे हे सांगतोय. आम्ही महान नाही. हे कोष्टक कृष्णमूर्ती गुरूजींना तोंडपाठ होते, हसबे गुरूजींना तोंडपाठ होते, विजय हजारींना हे तोंडपाठ आहे. आम्ही एकट्याने काही मोठे केले आहे असे समजण्याचे कारण नाही. "

 "शुक्राचे उपनक्षत्र मेषेत केतुच्या नक्षत्रात ०० अंश ४६ कला ४० विकला ते ०३ अंश ०० कला ०० विकला एवढे आहे. जातकाचा जन्म शुक्राचा सब नागपूरच्या पूर्वक्षितिजावर उदीत असतांना झाला आहे. त्यात रविचा सब-सब शोधला म्हणजे जातकाची अचूक जन्मवेळ मिळेल. सॉफ्टवेअरच्या दिलेल्या कोष्टकात ती १५ वाजून २५ मिनिटे इतकी दाखवली आहे. हीच जातकाची अचूक जन्मवेळ आहे."

"क्या बात है !" असे पेठे जोरात ओरडला.

म्हटले, " आता या वेळेनुसार त्याची कुंडली तयार कर."

पेठ्याने एक मिनिटात संगणकावर कुंडली बनवली.

म्हटलं, " आपली कुंडली बरोबर आहे की नाही हे आता पाहिले पाहिजे. आपले काम अचूक पाहिजे. कसे पाहणार?"

पेठे डोक्यात ऊवा झाल्यासारखे डोके खाजवायला लागला. मग एकदम म्हणाला,

" हं पंत, तुम्ही म्हणाला होतात की पत्रिका बनवल्यावर त्याचा महादशास्वामी लिहून घ्या. महादशास्वामी ज्या स्थानांचा कार्येश असतो त्याच स्थानासंबंधी जातकाचा प्रश्न असतो."

"व्हेरी गुड. या कुंडलीला कुठली महादशा सुरू आहे?"

" या कुंडलीला २७/०२/२००५ पासून रविची महादशा सुरू आहे. पंत, रवि स्वतः अष्टमात असून तो पंचमेश आहे. आणि तो पंचमस्थ शनीच्याच नक्षत्रात आहे. रवि अष्टमस्थ बुधाच्याच उपनक्षत्रात आहे."

"उत्तम. आता तुला सांगतो की या जातकाला त्याच्या व्यवसायासंबंधीच समस्या आहेत. हा माणूस एमबीए फायनान्स आहे. पण नोकरी न करता, पुण्याच्या रांजणगावं जवळ काही एकर जमीन घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून, प्लांटेशनचा व्यवसाय करतो. रवि महादशा सुरू झाल्यापासून याच्या व्यवसायात प्रचंड समस्या येत आहेत. त्यामुळे काय करावे असा प्रश्न त्याच्या सौभाग्यवतींनी विचारला आहे. जातक जेव्हा नोकरी, व्यवसायाच्या समस्या घेऊन आपल्याकडे येतो, तेव्हा त्याचा महादशास्वामी पाच, आठ, नऊ, बारा या स्थानांशी संबंधीत असतो हे मी तुम्हाला शिकवले आहे. झाली कुंडली टॅली? मिळाले प्रश्नाचे उत्तर?"

"त्या बाईंनी पूर्वी कुणाला कुंडली दाखवली असेल आणि त्यांनी ०३.२० जन्मवेळ धरून कुंडल्या मांडल्या असतील तर या पत्रिकेबद्दल भरमसाठ भाकीते केली असतील जी वस्तुस्थितीला धरून नाहीत. कारण ०३.२० या जन्मवेळेप्रमाणे मीन लग्न येते आणि  मीन लग्नाच्या कुंडलीला रवि षष्ठेश होऊन षष्ठस्थ शनिच्या नक्षत्रात येतो. त्यामुळे रवि महादशेत याचा व्यवसाय प्रचंड चालायला हवा होता. पण तसे घडलेले नाही, हे वास्तव आहे."

हे सर्व ऐकून पेठ्याला काय वाटले कुणास ठाऊक. तो आम्हाला म्हणाला, "पंत, मला तुम्हाला नमस्कार करायचाय."

आम्ही त्याला थोपवत स्वामींकडे हात दाखवून म्हटले, " नमस्कार त्यांना करायचा. आम्ही जे काही आहोत ते त्यांच्यामुळे आहोत."

" ते तर आहेतच. त्यांच्यामुळेच इथपर्यंत आलो' असे म्हणत पेठ्याने स्वामींना दंडवत घातला.

पण त्याचा आम्हाला नमस्कार करण्याचा हट्ट तो सोडेना. शेवटी नाईलाजास्तव आम्ही उभे राहिलो. पेठ्याने वाकून नमस्कार केला.

म्हणाला, " पंत, आज तुम्ही जे सांगितलेत त्यामुळे यापुढे जन्मवेळशुद्धी करतांना माझे कुठे अडणार नाही. मला हे ज्ञान मिळावं अशी स्वामींचीच इच्छा असावी म्हणून त्यांनी तुमच्याकडे पाठवले असे मी मानतो. आणि कधी अडलेच तर काय करायचे, कुणाकडे जायचे? या प्रश्नाचे उत्तरही स्वामींनी दिले आहे. 

आजच मठात जाऊन नारळाचे तोरण बांधतो."

आपला,
(कृतकृत्य) धोंडोपंत
Saturday, February 27, 2010

हुताशनी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...

॥ श्री स्वामी समर्थ॥

लोकहो,

आमच्या सर्व जातकांना आणि वाचकांना हुताशनी पौर्णिमेच्या म्हणजेच होलिकोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

सायंकाळी सूर्यास्तानंतर होळी पूजा करून पेटवावी. होळीला तीन प्रदक्षिणा घालून नमस्कार करावा. आपल्या   सर्व समस्या आणि दु:ख, आपले त्रास आणि क्लेश, होळीत जळून भस्म होवोत, अशी प्रार्थना करावी. होळीला श्रीफळ अर्पण करुन त्याचा प्रसाद घ्यावा. घरात कीटकांचा, श्वापदांचा त्रास असेल तर त्यांच्या कणकेच्या आकृत्या करून होळीला अर्पण कराव्यात. उदाहरणार्थ, मधमाशा, उंदीर, ढेकूण इत्यादी.

त्यानंतर दुसरे दिवशी म्हणजे धूलिवंदनाच्या दिवशी होळीचे भस्म काढून घ्यावे व कपाळी लावावे. हे करत असतांना खालील श्लोक म्हणावा.

वंदितासि सुरेंद्रेण ब्रह्मणा शंकरेणच।
अतस्त्वां पाहिनो देवि भूते भूतिप्रदाभव॥

असे म्हणून होळीचे भस्म कपाळी धारण करावे. अभ्यंगस्नान करावे. सहाणेवर चंदन उगाळून घ्यावे, त्यात थोडा आंब्याचा मोहर (आंब्याची फुले) घालावा. त्यात पाणी घालून ते मिश्रण प्यावे. 

एक आग्रहाची विनंती:-

होळीसाठी नारळाच्या झावळ्या, वठलेल्या वृक्षाचे लाकूड, खडसणी केलेले सरपण, पिचलेले बांबू इत्यादि वस्तूंचाच वापर करा.

होळीसाठी वृक्षतोड करू नका. एकाही चांगल्या, जिवंत वृक्षावर कुर्‍हाड मारू नका. एक वृक्ष वाढण्यासाठी आठ आठ वर्षे वाट पहावी लागते. तोडायला दहा मिनिटेही लागत नाहीत. त्यामुळे वृक्षांची काळजी घ्या. तुमच्यासमोर कुणी वृक्ष तोडत असेल तर त्याला मज्जाव करा.  

पर्यावरणाची आय झवून सण साजरे करू नका, एवढी सर्वांना नम्र विनंती.

आपला,
(दक्ष) धोंडोपंत

Thursday, February 25, 2010

आम्ही जातो आमुच्या गावा.... आमचा रामराम घ्यावा

॥ श्री स्वामी समर्थ ॥

|| श्री स्वामी समर्थ||
लोकहो,


काही दिवसांपूर्वी आमचे शेजारी श्रीपाद शिवराम वैद्य उर्फ बाबा वैद्य हे सकाळी फिरायला बाहेर गेले असतांना त्यांना पॅरॅलिसिसचा झटका आला. गल्लीच्या नाक्यावरच ही घटना घडली. दूध घेऊन येणार्‍या मुलाने ही गोष्ट त्यांच्या घरी येऊन सांगितली आणि त्यांच्या घरात हलकल्लोळ झाला.

आवाज ऐकून आमच्या सौभाग्यवती त्यांच्या घरी गेल्या व लगेच घरी येऊन आम्हाला झोपेतून उठवून ही बातमी सांगितली. आम्ही ताबडतोब त्यांना धन्वंतरी रुग्णालयात घेऊन गेलो. धन्वंतरी रुग्णालयातून त्यांना हिंदुजा रुग्णालयात हलविण्यात आले.


तिथे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

त्यांचा मुलगा महेश हा आमचा मित्र. एक दिवस त्यांने आम्हांला त्यांची कुंडली पहायला सांगितली. त्यासाठी एका कागदावर त्यांचे जन्मतपशील तो घेऊन आला होता. ज्या दिवशी त्याने आम्हाला हा प्रश्न विचारला तेव्हा शनीचे नक्षत्र सुरू होते. त्यामुळे बाबा वैद्य या आजारातून बरे होणार नाहीत, ते हिंदुजा हॉस्पिटलाच्या बाहेर येणार ते लोकांच्या खांद्यावरूनच, हे आम्हाला कळले होते.

पण कशाला उगाच कुंडली मांडून नकारात्मक भाकीत सांगा? त्यामुळे उलट घरच्या लोकांचे मनोधैर्य खचून जाईल या विचारांने आम्ही महेशला म्हटले,

" अरे, होतील बरे. एवढ्या मोठ्या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचार चालू आहेत की"

असे म्हणून त्याने त्याच्या वडिलांचे जन्मतपशील लिहून आणलेला कागद आम्ही त्याच्याकडे दिला.

दरम्यानच्या काळात त्यांच्यावर हिंदुजा हॉस्पिटलात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांना व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आले होते. आजचा मृत्यू उद्यावर ढकलणे एवढेच शिल्लक होते.

जसजसे ते उपचारांना दाद देत नाहीत असे डॉक्टरांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी महेशला तसे सांगितले. " आता जे आहे ते वरच्यावर, आमच्या हाती आता काही नाही" अशा पद्धतीने योग्य त्या सूचना नातेवाईकांना देण्यात आल्या होत्या.

लाईफ सेव्हिंग सपोर्टवर माणूस महिनोंमहिने काढू शकतो. ते यातून बरे व्हायची चिन्हे तर नाहीतच, मग किती दिवस असे लाईफ सेव्हिंग सपोर्टवर त्यांना ठेवायचे? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला.


एकदा सपोर्ट काढला की दहा मिनिटात खेळ खलास. काय करावे? याच परिस्थितीत त्यांना ठेवावे की सर्व सपोर्ट काढून त्यांना मृत्यूच्या हवाली करावे? हे विचारण्यासाठी महेश रविवारी संध्याकाळी आमच्याकडे आला.

प्रश्न अतिशय गंभीर होता. याहून गंभीर प्रश्न असू शकत नाही. अशा प्रश्नांची उत्तरे नवशिक्या ज्योतिषांनी देण्याच्या भानगडीत पडू नये. कारण आपल्या एका वाक्यामुळे आपण एका माणसाला मृत्यूच्या स्वाधीन करतोय, याचे भान ठेवायला पाहिजे. 

जरी डॉक्टरांनी सर्व आशा सोडल्या असल्या तरीही लाईफ सेव्हिंग सपोर्टमुळे तो जे काही श्वास अजून मोजू शकतोय तिथेच आपण आपल्या उत्तराने कुर्‍हाड घालतोय, याची जाणीव ज्यांना असेल आणि स्वतःच्या भविष्यकथनाबद्दल आत्यंतिक विश्वास असेल त्यांनीच असले प्रश्न पहावेत.

आम्ही महेशला बाजूला बसवून बाबा वैद्यांची सखोल कुंडली तयार केली. त्यांची जन्मकुंडलीसुद्धा कन्या लग्नाचीच आहे. कुंडलीला मारक बाधक स्थानांच्या दशा सुरू होत्या. त्यामुळे या अंतर्दशेत मृत्यू अटळ आहे हे निदान केले. त्यानंतर प्रश्नवेळेची कुंडली मांडली. ती वर दिली आहे.

एरव्ही दोन मिनिटात कुंडली बघणारे आम्ही त्या दिवशी पंधरा मिनिटे कुंडली पहात होतो. महेश शांतपणे बाजूला बसला होता. कुंडली पाहून झाल्यावर आम्ही त्याला म्हटले,

" हे यातून बरे होत नाहीत हे नक्की. ते डॉक्टरांनी देखील सांगितले आहे. प्रश्न ते बरे होतील का असा नसून मृत्यूयोग कधी हा आहे. त्यावरून लाईफ सेव्हिंग सपोर्ट बद्दल निर्णय घेता येईल."

तो " हो हो " म्हणाला.

आम्ही म्हटले, " आज तारीख २१ फेब्रुवारी आहे. यांचे आयुष्य २८ फेब्रुवारी किंवा फार फार तर १ मार्च रात्री आठ वाजेपर्यंत आहे. २ मार्च बघायला ते या जगात नसतील हे नक्की. एवढे दिवस ट्रीटमेंट चालू आहे. आता केवळ एक आठवड्याचा प्रश्न आहे. एक आठवडा मॅक्झिमम. त्याआधीही घटना घडू शकेल. कशाला काढायचे लाईफ सेव्हिंग सपोर्ट? जगू दे त्यांना. आत्ता जर लाईफ सेव्हिंग सपोर्ट काढले तर आपण तसे केल्याचे शल्य आयुष्यभर तुझ्या मनात राहील. फारतर आठ दिवस कळ काढा. त्यांची होईल तेवढी सेवा करा."

ते त्याला पटले. त्याला भेडसावणार्‍या प्रश्नाचे यथार्थ उत्तर त्याला मिळाले होते. " तू म्हणतोस तसेच करू" असे तो म्हणाला. कुंडलीची उत्तम जजमेंट घेतल्याचे समाधान आम्हालाही होते.

त्याची बहीण पद्मा जी चेन्नईत असते ती बाबांच्या शुश्रुषेसाठी इथे आली आहे. ती मंगळवारी दिनांक २३ रोजी तिच्या मुलाची पत्रिका दाखविण्यासाठी आमच्याकडे आली होती. तिच्या मुलाच्या पत्रिकेबद्दल बोलून झाल्यावर म्हणाली की,

" मी २७ तारखेला चेन्नईला परत जातेय. बरेच दिवस माझी रजा झाली आहे. तेव्हा कामावर हजर होऊन मग पुन्हा पुढील आठवड्यात मुंबईत परत येईन."

तिच्या बोलण्यावरून महेशने वडिलांच्या मृत्यूयोगाची कल्पना घरी दिलेली नाही, हे आमच्या लक्षात आले. हे सांगून घरच्या मंडळींना आत्तापासून दु:खात टाकायला नको, असा विचार त्याने केला असावा.

पण पद्मा चेन्नईला गेली तर मोठा घोळ होणार होता. आम्ही पद्माला म्हटले, " तू २७ ला काही जाऊ नकोस. त्यानंतर अजून दोन दिवस थांब. १ मार्च पर्यंत इथे रहा. मग बघू."

तिने भुवया उंचावून मान हलवली. बाबांचे आयुष्य अजून पाच सहा दिवस आहे हे तिला उमगले. आमच्या बोलण्यातली हिंट तिच्या लक्षात आली.

दरम्यान त्यांच्यावर नेहमीप्रमाणे उपचार सुरू होते.

आज सकाळी शिवाजी पार्कात फिरायला गेलो असतांना सौभाग्यवतींचा फोन आला. " सकाळसकाळ हिला काय नवर्‍याचा एवढा पुळका आलाय?" असे मनातत्या मनात म्हणत आम्ही फोन घेतला. फोनवर बाबा वैद्य गेल्याची बातमी सौभाग्यवतींनी दिली.

घरी आलो. महेशच्या चुलतभावाला समीर वैद्यला बरोबर घेतले. पुढच्या तयारीला लागलो. सामान आणले.  मुगणेकर गुरूजींना फोन केला. 

अंत्येष्टि करण्यात मुणगेकर गुरूजी म्हणजे गागाभट्ट. ते फक्त अंत्येष्टिचीच कामे करतात. सुपर स्पेशलायझेशन  म्हटले तर चालेल. मुणगेकर गुरूजींनी विधी केले म्हणजे डायरेक्ट मुक्ती. आपलं सेटिंग सगळीकडे मजबूत असतं. फोन केल्यावर गुरूजी आम्हांला म्हणाले,

" पंत, तब्येत बरी नाहीये माझी. गुडघा दुखतोय, उठताबसता येत नाहीये. त्यामुळे काम आले की मी संजयलाच पाठवतो."

संजयसुद्धा सर्व विधी उत्तम करतो. पण इस्टॅब्लिश्ड माणसानेच आपले काम करावे, अशी आपली इच्छा असते. उद्या आमच्या मुलाने कितीही चांगल्या पद्धतीने पत्रिका पाहिली तरी, धोंडोपंतांना पत्रिका दाखवायचेय, असे लोक म्हणणारच.

आम्ही गुरूजींना म्हटलं, " तुम्हीच या. संजयला नका पाठवू. गुडघ्याचाच त्रास आहे ना? टॅक्सी पकडून या. साडेबारापर्यंत आम्ही बॉडी घेऊन येतो."

मुणगेकर गुरूजींचा आणि आमचा फार जुना स्नेह आहे. म्हणाले, " पंत, तुमचे काम आहे म्हणजे मलाच यायला पाहिजे. साडेबारा वाजता मी तिथे हजर आहे."

ठरल्याप्रमाणे मुणगेकर गुरूजी आले. आज पंच्याहत्तरी ओलांडलेले मुणगेकर गुरूजी आम्ही पोहोचायच्या आधी स्मशानाच्या दारात उभे होते. केवळ आमच्या शब्दाखातर म्हातारा गुडघा दुखत असतांना, नी कॅप घालून साडेबाराला स्मशानात आमची वाट पहात होता. ही स्वामीसेवेची पुण्याई. आम्ही गेल्यागेल्या मुणगेकर गुरूजींना वाकून नमस्कार केला.

पुढे सर्व अंत्यविधी यथासांग पार पडले. घरी येऊन अंघोळ, गायत्रीचा जप केला. संगणकावर बसलो. आजच्या संध्याकाळपर्यंतच्या अपॉईंटमेंट रद्द केल्यामुळे हा लेख लिहिला.

श्री बाबा वैद्य यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी परमेश्वराकडे प्रार्थना.

आपला,
(किरवंत) धोंडोपंत


Wednesday, February 24, 2010

सचिनला सलाम......


॥ श्री स्वामी समर्थ॥

 


लोकहो,


एकदिवसीय सामन्यात जगातले पहिले द्विशतक आज महाराष्ट्रसुपुत्र सचिनने झळकावले. 


जीवन धन्य झाले असे वाटणारा तो क्षण होता. अक्षरश: डोळ्यांचे पारणे फिटले. १४७ चेंडूत नाबाद २०० धावा !!!
क्या बात है !! 


दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजांना सचिनने धुपाटण्याने धुणे धुवावे तसे धुतले. 


सचिनचे आत्यंतिक मनापासून हार्दिक अभिनंदन आणि त्याला लाख लाख शुभेच्छा.


सचिन १९८ वर असतांना धोणीने भिकारचोटासारख्या तीन षटकांच्या शेवटच्या चेंडूवर एकेरी धाव्या घेतल्या आणि स्ट्राईक स्वत:कडे ठेवला. त्याने स्वत: टोलेबाजी करण्याऐवजी तेव्हा  सचिनला स्ट्राईक द्यायला हवा होता हे कुणीही मान्य करेल.  सचिनचे द्विशतक हुकते की काय, अशी भीति तेव्हा निर्माण झाली होती.


पण पठ्ठयाने शेवटच्या षटकात संधी मिळताच ते पूर्ण केले आणि आजपर्यंत कुणी न केलेला विश्वविक्रम केला. 


माणसाच्या कर्तृत्वाला श्रद्धेची जोड मिळाल्यावर ईश्वरी कृपेने त्याचे कर्तृत्व उजळून निघते आणि त्याच्या मागे यश स्वत: चालत येते हे दाखविण्यासाठी सचिनचे दुसरे छायाचित्रही येथे दिले आहे. अमिताभ बच्चन, अनिल अंबानी, अशोकराव चव्हाण अशी इतरही अनेक व्यक्तिंची उदाहरणे देता येतील. असो.


आपला,
(हर्षभरित) धोंडोपंत

प्रश्नोत्तरे - भाग २

॥ श्री स्वामी समर्थ ||

लोकहो,
प्रश्नोत्तरे या मालिकेतील हा दुसरा भाग. वाचकांच्या काही प्रश्नांना उत्तरे.
  
१) सौ. मानसी पटवर्धन, डोंबिवली
प्रश्नः- 

नमस्कार पंत,
मी, मानसी पटवर्धन. डोंबिवलीला राह्ते. मी नुकतेच ज्योतिष शिकायला सुरूवात केली आहे. तुमचा ब्लॉग नियमीतपणे वाचते. त्यातून खूप शिकायला मिळतं. त्याबद्दल धन्यवाद.
माझा प्रश्न असा आहे की गुरू शुक्र अस्तात विवाहमुहूर्त नसतात. जसे आत्ता नाही आहेत. पण पंचांगात साखरपुड्याचे मुहूर्त दिलेले आहेत. साखरपुडा हा विवाहाचाच भाग आहे. मग गुरु शुक्र अस्तात विवाहमुहूर्त नसतांना साखरपुड्याचे मुहूर्त पंचांगात कसे देतात? विवाह चालत नाही तर साखरपुडा करून कसा चालतो?

उत्तरः- फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला आहे. तुमचे पत्र वाचताच या प्रश्नाबद्दल लिहायचे आम्ही योजले होते. त्याचे उत्तर आता देतो.

विवाह आणि साखरपुडा यात मूलभूत फरक हा आहे की, विवाह हा धार्मिक विधी आहे व साखरपुडा हा लौकिक विधी आहे. विवाह धार्मिक विधी असल्यामुळे त्याला गुरू-शुक्र अस्त, चातुर्मास, अधिक महिना यांची बंधने आहेत. तशी बंधने साखरपुड्याला नाहीत. त्यामुळे तो साधारण दिनशुद्धी पाहून केव्हाही करता येतो.

साखरपुडा हा विवाहाचा भाग आहे असे तुम्ही जे नमूद केले आहे, तसे नाहीये. साखरपुडा हा पाश्चात्यांच्या "एन्गेजमेंट"च्या संकल्पनेतून इथे आलेला आहे. तीन चार पिढ्यांपूर्वी कुणाचाही साखरपुडा होत नसे. त्यामुळे तो विवाहाच भाग नाही.

२) पुरूषोत्तम लिमये, ठाणे

प्रश्नः- पंत, तीन वर्षांपासून आपला परिचय आहे. माझ्या सर्व कुटुंबीयांना तुम्ही मार्गदर्शन करता. गेल्या वर्षी तुम्ही प्राचीच्या संततीयोगाबद्दल सांगतांना म्हणाला होतात की तिची डिलिव्हरी आठव्या महिन्यात होईल आणि केवळ त्यामुळे मी अमेरिकेतून माझी टूर गुंडाळून लवकर परतलो आणि तिची डिलीव्हरी तशीच लवकर झाली. ते तुम्ही इतक्या अचूकतेने सांगितले होते तेव्हापासून  एक प्रश्न मनात येतो की, तुमच्या भविष्यकथनातील अचूकता ही तुमच्या अभ्यासातून आली आहे की तुमच्या कुंडलीतील ग्रहस्थितीतून?
 
उत्तर - आमच्या भविष्यकथनातील तथाकथित अचूकता ही तीन गोष्टीतून आली आहे असे आमचे मत आहे.

त्यापैकी एक म्हणजे अभ्यास. अनेक लोक तो करतात. आम्ही काही वेगळे दिवे लावले आहेत असे समजावयाचे कारण नाही.
दुसरी अर्थात कुंडलीतील ग्रहस्थिती. आमच्या कुंडलीत कुंभेचा शनी लग्नी, लग्न व शनी वर्गोत्तम आहे. बुध हर्षल युती आहे. भाग्यात तुळेचा नेपच्यून आहे.  अभ्यास खरे तर कुंभेच्या लग्नात असलेल्या शनीमुळे झाला आहे. त्याचे श्रेय शनीला. असा शनी असणारे लोक जो विषय हातात घेतात त्यात पार तळ गाठतात.

पण नुसती विद्या असून भागत नाही. नुसती विद्या असणारे समाजात रग्गड आहेत. जेव्हा त्या विद्येला सद्गुरूंचा आशीर्वाद लाभतो तेव्हा ती विद्या फलद्रूप होते. हे आम्हाला उमगलेले जीवनातील वास्तव आहे.

कर्णाकडे विद्या होती. पण गुरूंचा आशीर्वाद नव्हता. भगवान पर्शुराम त्याला म्हणाले की, " कर्णा, माझ्याकडून विद्या घेतलीस ती मला फसवून घेतलीस. क्षत्रिय म्हणून नावलौकिक मिळवशील पण शेवटी ही विद्या तुला फळणार नाही."

कर्णाचे पुढे काय झाले हे सर्वांना ठाऊक आहे.  त्यामुळे सद्गुरूकृपा ही आमच्यादृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ती नसेल तर सर्व ज्ञान व्यर्थ आहे. 

माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात

मज हृदयी सद्गुरू| जेणें तारिलो हा संसारपुरू| म्हणोनी विशेषे अत्यादरु| विवेकावरी||
जैसे डोळियां अंजन भेटें| ते वेळ दृष्टीसीं फांटा फुटे| मग वास पाहिजे तेथ प्रकटे|महानिधि||
कां चिंतामणी आलिया हातीं| सदा विजयवृत्ती मनोरथीं| तैसा मी पूर्णकाम श्रीनिवृत्ती| ज्ञानदेवो म्हणे||
म्हणोनी जाणतेनी गुरू भजिजे| तेणे कृतकार्य होईजे| जैसे मूळसिंचनी सहजे| शाखापल्लव तोषती||

३) विभास कन्नमवार, नागपूर

प्रश्न:- भविष्यकथनाच्या विविध पद्धतींबाबत आपले मत काय? तुमची सर्वात आवडती पद्धत कोणती आणि का?

उत्तर:- सिनेमातल्या विविध तारकांबद्दल आपले मत काय? असे कुणी विचारले तर,  मत हेच की, जी आवडते तिला पहावे. कॅथरिना आवडणार्‍यांने बिपाशा आवडणार्‍याला नावे ठेऊ नये. असो.

प्रत्येक पद्धतीत जे काही चांगले आहे ते घ्यावे आणि आपले ज्ञान समृद्ध करावे. एकाच पद्धतीच्या नावाने लेझिम खेळत बसू नये. 

कृष्णमूर्ती पद्धतीची अचूकता घ्यावी, पारंपारिक पद्धतीचे विश्लेषण घ्यावे. कारकत्वावरून अचूक भाकीते कशी करता येतात हे पारंपारिक पद्धत शिकल्याशिवाय समजायचे नाही.

कृष्णमूर्ती पद्धती ही रिझल्ट ओरिएन्टेड पद्धती आहे. अतिशय सूक्ष्मात जाऊन भाकीत करता येते. विलक्षण अचूकता ही कृष्णमूर्ती पद्धतीची खासियत आहे.

हीच अचूकता पारंपारिक पद्धतीतही आहे. पण अनेक नादान विद्वानांनी आपल्या मतांची शेवाळे त्यावर चढवून वैदिक ज्योतिषपद्धतीला विचित्र रुप दिले हे वास्तव आहे. वराहमिहीराने विक्रम राजाच्या मुलाच्या मृत्यूचे भाकीत घटिका पळांमध्ये केले होते. त्यावेळेस कुठे होती कृष्णमूर्ती पद्धती?
 
शककर्त्या विक्रम राजाचा मुलगा वयाच्या ठराविक वर्षी, ठराविक दिवशी, रानडुक्कराकडून मृत्यू पावेल असे मिहीराने तो जन्मल्यावर लगेचच सांगितले होते. 

जसजसा तो दिवस जवळ येत चालला तसे राजपुत्राच्या रक्षणासाठी सैन्य तैनात झाले. त्याला उज्जैनच्या राजवाड्यात वरच्या मजल्यावर कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आले. जिथे रानडुक्कर काय, मांजरही जाऊ शकणार नाही अशी सुरक्षा राजपुत्राला होती. म्हणजे आजच्या युगात सांगायचे तर झेड प्लस सिक्युरिटी.

त्याच्या मृत्यूच्या दिवशी विक्रम राजाने दरबार भरवला. मिहीराने सांगितलेली वेळ टळून गेल्यावर त्याची दरबारात चेष्टा सुरू झाली. त्या चेष्टेत विक्रमराजाही सामील झाला. 

तेव्हा मिहीराने त्याला म्हटले की, "राजा, मी सांगितलेल्या वेळेला राजकुमार मेलेला आहे."

धावाधाव करून त्याचा शोध घेण्यासाठी जेव्हा राजासह दरबारातले लोक त्याच्या महाली गेले तेव्हा महालाबाहेरील गच्चीत तो रक्ताच्या थारोळ्यात मृत होऊन पडलेला होता.

विक्रम राजाचे जे राजचिन्ह होते ते वराह होते. त्या राजचिन्हाचा पुतळा त्याच्या अंगावर पडून त्याचा मृत्यू झाला होता. वराह म्हणजेच रानडुक्कर.

तेव्हा विक्रम राजाने मिहीर ज्योतिषाला " वराहमिहीर" ही पदवी दिली आणि तो पुढे वराहमिहीर म्हणून ओळखला गेला. त्याने ज्योतिषशास्त्रावर विपुल लेखन केले आहे.
  
सांगायचा मुद्दा हा की, प्रत्येक पद्धतीत काही चांगले आहे. ते नीरक्षीरविवेकबुद्धीने वेचता आले पाहिजे.

४) दिपक देवकर, दुबई

प्रश्नः-
Namaskar Pant,
 
Kundalit asalelya "tarachakra" ani "ghatchankra" che mahatva kay aahe.
Jatak hyacha kahi upyog karun gheu shakto ka.
 
Rgds
Deepak
 
उत्तर:- घातचक्रात दिलेल्या मास, तिथी, दिवस, नक्षत्र, योग, करण, प्रहर इत्यादी दिवशी महत्त्वाची कामे करू नयेत असा संकेत आहे. तुम्हाला पाठविलेल्या पत्रिकेत तिसर्‍या पानावर हे घातचक्र दिले आहे.
 
त्याचा उपयोग काय? खरे सांगायचे तर काही नाही. कारण तसे अनुभवायला येत नाही. जन्मकुंडलीतील गोचर भ्रमणावरून शुभाशुभ निर्णय करावा. 
 
आमच्या या विधानावर वाद होऊ शकतात. पण आमचे मत खोडण्याची बौद्धिक ताकद कुठल्याही युक्तिवादात नाही, हे ठामपणे सांगतोय.
 
५) मालती करोपाडी, कारवार
 
प्रश्नः- जप मोजावा का? जपासाठी माळ कुठली वापरावी?
 
उत्तर:- जरूर मोजावाच. नामस्मरण मोजण्याची आवश्यकता नाही. ते मोजायचे नसते म्हणून ते नामस्मरण. पण जप मोजावा. 

प्रत्येक मंत्र फलद्रूप होण्यासाठी त्याची जपसंख्या असते. मोजल्याशिवाय किती झालाय हे कसे कळणार?  त्यासाठी माळेची आवश्यकता आहे. मोजायचा म्हणून माळ आली. मोजायचा नसता तर माळ कशाला?

प्रत्येक माळेत १०८ मणी आहेत. ब्रह्मांडाची विभागणी १०८ नवमांशात आहे. हे सर्व लिहायचे म्हणजे फार लांबेल. तर ते पुन्हा केव्हातरी.
 
उत्तर इतकेच की जप जरूर मोजावा.
 
माळ कुठली वापरावी?  याचे उत्तर हे की, कुठला जप करतोय त्यावर अवलंबून आहे. अभिप्सितार्थ सिद्धयर्थं यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या माळा आहेत.
 
हल्ली बहुतेक लोक पैसे मिळण्यासाठी, प्रमोशन मिळण्यासाठी, व्यवसाय चालण्यासाठी जप करतात. त्यात काही चुकीचे आहे असे नाही. जो जे वांछील तो ते लाहो | प्राणिजात ||
 
पण अशा जपांसाठी रुद्राक्ष वापरणे हे संयुक्तिक नाही. ज्याला मोह माया यांचा त्याग करून केवळ कैवल्यप्राप्तीसाठी साधना करायची आहे, त्यांनी रुद्राक्षाची माळ जपासाठी वापरावी.
 
सकाम साधनेसाठी विशेषतः आर्थिक आकांक्षापूर्तीसाठी जप करतांना कमळाकाकडीची माळ वापरावी.
 
बाकीचे प्रश्न पुढील भागात.
 
आपला,
(आश्वासक) धोंडोपंत