॥ श्री स्वामी समर्थ॥
लोकहो,
गेल्या रविवारी म्हणजे २१ मार्चला दुपारी वामकुक्षी उरकून, चहा घेत असतांनाच सौ. वर्तक यांचा फोन आला. त्यांच्या मुलीच्या प्रसूतिची तारीख जवळ आली होती.
ऑक्टोबर २००८ मध्ये आम्ही तिची पत्रिका पाहिली होती. तिला सहा वर्षांची एक मुलगी आहे. पहिल्या बाळंतपणानंतर साडेतीन/चार वर्षांनी त्यांनी द्वितीय संततीसाठी प्रयत्न केले पण दोन वेळा गर्भधारणा होऊन, दोन्ही वेळा तिचा दुसर्या महिन्यात गर्भपात झाला होता. त्या टेन्शनमध्ये सौ. वर्तक तिला घेऊन द्वितीय संततीच्यासंबंधी विचारण्यासाठी आमच्याकडे आल्या होत्या.
अंतर्दशास्वामी बुधाच्या नक्षत्रात असून चतुर्थाचा कार्येश होता. त्यामुळे दोन वेळा गर्भपात झाला. बुध कुठलीही घटना पुन्हापुन्हा घडवतो. अशा अंतर्दशेत गर्भपात झाल्यास त्या अंतर्दशेत पुन्हा चान्स न घेणे शहाणपणाचे असते. ती अंतर्दशा सोडून द्यावी. घटस्फोट झाल्यास त्याच अंतर्दशेत दुसरा विवाह करू नये. असो.
आम्ही तिला सहा महिने थांबण्याचा सल्ला दिला होता. "अजून सहा महिने म्हणजे एप्रिल २००९ पर्यंत अजिबात चान्स घेऊ नकोस. त्यानंतर संततीसाठी प्रयत्न कर, तुला दुसरे मूल होईल." असे आम्ही तेव्हा तिला सांगितले होते.
त्यानुसार तिला जून २००९ मध्ये गर्भधारणा झाली. " यावेळी तरी सर्व नीट होईल ना?" असा प्रश्न त्यांनी तेव्हा पुन्हा विचारला. "सर्व व्यवस्थित होईल, काळजी नको." असे सांगितले.
गेल्या रविवारी फोन केल्यावर, त्यांच्या मुलीला नऊ महिने मंगळवारी, २३ तारखेला पूर्ण होत आहेत तर तिची प्रसूति नक्की कधी होईल? असा प्रश्न त्यांनी विचारला. वर हे ही म्हणाल्या की,
" पंत, दोन वेळेस हे असं झाल्यामुळे या वेळेस खूप टेन्शन आहे. एक एक दिवस आम्ही कसा काढतोय आमचे आम्हाला माहीत. "
आम्ही म्हटले, " टेन्शन कसलं घेताय? तिचा सध्याचा अंतर्दशास्वामी स्थिर राशीत आहे आणि त्याचा चतुर्थाशी काही संबंध नाही. सर्व व्यवस्थित होईल म्हणून सांगितलाय ना? जरा थांबा. दोन मिनिटात सांगतो ती कधी मोकळी होईल ते."
घटना आठ दहा दिवसात घडणारी आहे त्यामुळे चंद्रभ्रमणावरून कालनिर्णय करता येईल. प्रश्नवेळेचे म्हणजे दिनांक २१ मार्च २०१० रोजी दुपारी ०३ वाजून १६ मिनिटांचे रुलिंग प्लॅनेट्स असे होते.
लग्न- कर्क - चंद्र
नक्षत्र- रोहिणी - चंद्र
राशी - वृषभ - शुक्र
वार - रविवार - रवि
नक्षत्र- रोहिणी - चंद्र
राशी - वृषभ - शुक्र
वार - रविवार - रवि
प्रश्नवेळेस चंद्र वृषभेत रोहिणी नक्षत्रात होता. प्रश्नवेळेस कर्क लग्न सुरू आहे. तसेच रुलिंगमध्ये सर्व शीघ्रगती ग्रह आहेत. रुलिंगमध्ये शनीसुद्धा नाही. म्हणजे हिची प्रसूति फार लांबणार नाही. मंगळवारी नऊ महिने पूर्ण होतील. त्यानंतर नऊ दिवस वाट पहावी लागणार नाही. घटना लगेच घडेल. हे पहिले अनुमान.
वृषभेतील पुढील मृगशीर्ष नक्षत्राचा स्वामी मंगळ रुलिंगमध्ये नाही. म्हणजे वृषभेत चंद्र असतांना प्रसूति होणार नाहीच. पुढे मिथुन व कर्क राशीतील भ्रमणही सोडावे लागेल.
त्यानंतर चंद्र सिंहेत जाईल. सिंहेत केतुचे मघा, शुक्राचे पूर्वाफाल्गुनी व रविचे उत्तराफाल्गुनी नक्षत्र आहे. त्यापैकी केतु रुलिंगमध्ये नाही. म्हणजे मघा नक्षत्रात प्रसूति होणार नाही. रवि एकदाच रुलिंगमध्ये आहे. त्यामुळे सिंहेतील उत्तराफाल्गुनीतील चंद्रभ्रमण धरता येणार नाही.
पण सिंह रास आणि शुक्राचे नक्षत्र हे कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे चंद्र सिंहेत गेल्यावर जेव्हा शुक्राच्या पूर्वाफाल्गुनी नक्षत्रातून भ्रमण करेल तेव्हा हिची प्रसूती होईल.
आम्ही पंचांग काढले. त्यात दिनांक २८ मार्च २०१० रोजी चंद्र पूर्वाफाल्गुनीत असेल असे दिले आहे. आम्ही सौ. वर्तकांना म्हटले,
"पुढच्या रविवारी २८ मार्चला ती बाळंत होईल. अजून एक आठवडा आहे. काळजी करू नका. स्वामींचे नाव घेत रहा. सर्व व्यवस्थित होईल."
त्यांना आनंद झाला. त्या म्हणाल्या, " अजून एक विचारायचायं"
"आम्हांला ते माहीत आहे तुम्हालां काय विचारायचाय ते. काय फरक पडणार आहे काहीही असले तरी?"
"तसा काहीच फरक पडणार नाही. पण तिला पहिली मुलगी आहे."
सौ. वर्तक त्यांना नातू हवाय आणि तो होईल का? हे स्पष्टपणे न विचारता आडून आडून बोलत होत्या. आम्ही क्षणार्धात त्यांना म्हटलं,
" होईल तुमच्या मनासारखं. वाटा पेढे."
सांगितल्याप्रमाणे आज दुपारी ०१ वाजून ०५ मिनिटांनी ती प्रसूत झाली. प्रसूति झाली तेव्हा चंद्र रविच्या सिंह राशीत शुक्राच्या पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात होता. महादशास्वामी शुक्र पंचमेश असून लाभात.
आणि हो,
तिला मुलगाच झाला.
आपला,
(आनंदित) धोंडोपंत
(आनंदित) धोंडोपंत
