|| श्री स्वामी समर्थ||
लोकहो,
आज झालेल्या आयसीसी टी २० मालिकेच्या मुंबई इंडियन्स विरूद्ध साऊथ ऑस्ट्रेलियन्स रेडबॅक्स या संघांमधील सामन्यात मुंबई इंडियन्सने जो खेळ केला तो खरतरं इतका लाजिरवाणा होता की, रणजी सामन्यातील खेळाचा दर्जा याहून चांगला असेल. आजच्या मुंबई इंडियन्सच्या प्रदर्शनाने समस्त मुंबई इंडियन्सचे चाहते व्यथित झाले असतील, याबद्दल काही शंका नाही. आम्हीही व्यथित अंतःकरणाने हा लेख लिहीत आहोत.
सर्वप्रथम रेडबॅक्स संघाचे अभिनंदन. त्यांच्याकडे डाव जिंकण्याची निश्चित योजना होती. They had a definite strategy to follow. त्या योजनेनुसार त्यांनी खेळ केला आणि ते जिंकले.
पहिल्या दहा षटकांपर्यंत विकेट्स जपायच्या, आणि दहा षटकांनंतर मुंबईच्या गोलंदाजीवर तुटून पडायचे, असे त्यांनी ठरवले होते. त्यानुसार त्यांनी पहिल्या दहा षटकात केवळ ६९ धावा केल्या. पण एकही विकेट गमावली नाही. बरोब्बर ११ व्या ओव्हरला त्यांनी फटकेबाजीला सुरूवात केली आणि सामना जिंकला.
मुंबई इंडियन्स संघाकडे अशा स्वरूपाची कुठलीही योजना असावी, असे त्यांच्या खेळात दिसले नाही. पाट्या टाकल्यासारखा खेळ त्यांनी केला.
मुंबई इंडियन्स जर असेच खेळत राहिले तर त्यांचे काय होईल? या प्रश्नाचे उत्तर द्यायला प्रश्नकुंडली मांडण्याची गरज नाही.
मुंबई इंडियन्सच्या या सामन्यातील पराभवाचे विश्लेषण करतांना, आम्हांला जे मुद्दे प्रकर्षाने जाणवले, ते असे:-
१) अत्यंत ढिसाळ क्षेत्ररक्षण. त्यांच्या क्षेत्ररक्षणाला काही दर्जाच नव्हता. सचिन, डुमिनी, भय्या ( सौरभ तिवारी), रायडू, हरभजन यांच्या क्षेत्ररक्षणापेक्षा गल्लीत खेळल्या गेलेल्या क्रिकेटमधील क्षेत्ररक्षण उजवे असेल. या सर्वांनी झेल सोडले. चेंडू अडवतांना बेफिकीरी दाखवली, त्यामुळे भरमसाठ धावा दिल्या गेल्या. सचिनने तर चौकार अडवतांना चेंडूला पाय लावून चेंडू अडविण्याचा जो अयशस्वी प्रयत्न केला, तो पाहून ढिसाळ क्षेत्ररक्षणासाठी 'मान्यता' पावलेल्या संदीप पाटीलची आठवण आली.
मुंबई संघाचे थ्रो अतिशय खराब होते. थ्रो ला नीट फॉलोअप नव्हता. त्यामुळे ओव्हर थ्रो च्या धावा मोजाव्या लागल्या. आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्षेत्ररक्षण मुंबई इंडियन्स कडून कुठेही दिसले नाही.
२) ढिसाळ फलंदाजी - टी २० सामन्याची वैशिष्ट्ये मुंबई संघाची तथाकथित धोरणे राबवणार्यांना अजून नीट कळलेली नाहीत, असे खेदाने म्हणावे लागते. गेल्या आयपीएलच्या वेळीही आम्ही या मुद्द्यावर भाष्य केले होते. आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेण्यामागचे तत्वज्ञान काय होते? हे आकलनाच्या पलिकडचे आहे.
तसेच शिखर धवन सारख्या लिंबूटिंबूला ओपनिंगला पाठवणे ही फार मोठी चूक ते कायम करत आहेत. शिखर धवनच्या खेळाला आंतरराष्ट्रीय दर्जा नाही. पहिल्या दोन विकेट लवकर पडल्या की पुढे सर्वांवर दडपण येतं, हा मुद्दा ते का लक्षात घेत नाहीत, हे ते स्वतः आणि ब्रह्मदेव जाणे.
एकतर मुंबईकडे चेन्नई, बंगलोर सारखी बॅटिंग ऑर्डर नाही. वर सचिन आणि खाली पोलॉर्ड हे दोन सोडले तर मधले सर्व बेभरवशाचे शिलेदार आहेत. अशा वेळेस ओपनिंगला पर्याय शोधावा लागेल. भय्या (सौरभ तिवारी) ओपनिंगला आला तर काहीतरी परिस्थिती सुधारेल. शिखर धवन ओपनिंग म्हणजे कल्पना सहन होत नाही हो! ते अंडर नाईन्टीन ला ठीक आहे. तिथले पराक्रम आणि पुण्याई, इथे उपयोगी नाही पडत.
फलंदाजीत सुरवातीस पटापट विकेट मुंबईने गमावल्या. त्यामुळे सहाजिक दडपण वाढत होतं. अशा वेळेस पोलॉर्डला वर पाठवले असते तर "धावा वाढविण्यासाठी केलेली बुद्धीमान खेळी" असे त्याचे वर्णन आम्ही केले असते. पण तसे झाले नाही. भय्या आणि पोलॉर्डमुळेच १८० हा धावसंख्येचा आकडा दिसला आहे.
३) अत्यंत खराब गोलंदाजी - याबद्दल लिहावे आणि डोके आपटावे तेवढे थोडेच आहे. लसिथ मलिंगा वगळता एकाही गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली नाही. जहीरखान आणि हरभजनला शेवटच्या दोन ओव्हर्स टाकायला देणे, ही फार मोठी चूक ह्या संघाने केली. त्या ऐवजी लसिथ मलिंगाला ठेवायला हवा होता. किमान एका बाजूने तरी धावांची गती रोखता आली असती.
झहीरखानला देशाबाहेर धुणं धुवावं तसा धुतात, हे माहित असूनही त्याला १९ वी ओव्हर टाकायला का दिली? याचे संयुक्तिक उत्तर कोणीही देऊ शकणार नाही. जहीरच्या त्या ओव्हरमुळे संपूर्ण सामना फिरला. नंतर सरदारजीच्या हातात सचिनने चेंडू देऊन रेडबॅक्सचा विजय निश्चित केला.
गोलंदाजी करतांना मलिंगा वगळून कुणीही बुद्धीचा वापर करून गोलंदाजी केली नाही. लसिथ मलिंगाचे मात्र, वेग, दिशा आणि टप्पा यावर संपूर्ण नियंत्रण होते. त्याने चार षटकात केवळ २२ धावा देऊन २ विकेट्स घेतल्या.
बाकीचे लोक जहीर, हरभजन, ब्रॅव्हो, अली मुर्तझा, पोलॉर्ड यांनी गोलंदाजीत कुठलाही सेन्स वापरला नाही. जेव्हा रेडबॅक्सचे फलंदाज फटकेबाजी करायला लागले होते तेव्हा हे लोक चेंडूला फ्लाईट देत होते, फुलटॉस, शॉर्टपीच चेंडू टाकत होते.
खरे तर तेव्हा यॉर्कर टाकायची गरज होती. जेणेकरून चेंडू फलंदाजाच्या पायाच्या बुंध्यात जाऊन पडेल आणि त्यामुळे उंच फटके मारता येणार नाहीत. एवढा कॉमनसेन्सही ह्या लोकांनी वापरला नाही. त्यांच्या फ्लाईटेड डिलिव्हरीज पाहून जीव तुटायचा.
४) या सामन्याने सिद्ध केलेली अजून एक गोष्ट म्हणजे, शॉन टॅएट ची बॉलिंग कुणालाही खेळता येत नाही.
त्याचा वेग, त्याचा टप्पा हा सर्वोत्तम आहे. त्याच्या गोलंदाजीवर फक्त एका उसळणार्या चेंडूवर एक षटकार पोलॉर्डने मारला. पण त्यानंतर त्याने लगेच ती चूक सुधारली आणि पुन्हा बाऊन्सर टाकला नाही. तर यॉर्कर टाकण्यावर त्याचा भर होता. त्यामुळे धावा रोखून धरण्यात त्याला यश आले.
एकूण आजचा जो खेळ मुंबई संघाने केला, तो पाहून वेळेचा अपव्यय झाल्याची भावना मनात आली. त्या खेळात कुठलेही तंत्र नव्हते, जिंकण्याचा मंत्र नव्हता. बिनडोकपणाने केलेली ती निव्वळ दमछाक होती.
आणि, "क्रिकेट हा केवळ हाताने नव्हे, तर डोक्याने खेळायचा खेळ आहे" असे म्हणतात.
आपला,
(तीक्ष्णबुद्धि) धोंडोपंत