|| श्री स्वामी समर्थ||
लोकहो,
या ब्लॉगावर मोडी लिपीत आम्ही लिहिलेला काही मजकूर प्रकाशित केला आणि चोखंदळ वाचकांनी मोडीबद्दल लिहा अशा सूचना केल्या. मोडी लिपीबद्दल आदर असलेला सुसंस्कृत आणि चोखंदळ वाचकवर्ग या ब्लॉगला लाभला, याचा आम्हांला फार आनंद आहे.
"मोडीबद्दल लिहा" हे आम्हांला सांगणे, म्हणजे "तुमच्या प्रेयसीबद्दल लिहा" हे सांगण्यासारखे आहे. कारण मोडी लिपीवर आम्ही प्रेयसीवर करावे तसे प्रेम करतो. त्यामुळे त्यांच्या या आग्रही मागणीची पूर्तता करण्यासाठी मोडी लिपीबद्दल हा लेख.
सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, मोडी ही कुठलीही स्वतंत्र लिपी नाही. ही देवनागरीची उप-लिपी आहे. मोडी लिपीची जननी ही देवनागरीच आहे. जरी मोडीने गुजराती, कन्नड व बंगाली लिपीतील काही वर्ण घेतले असले तरी तिचा पाया हा देवनागरीचा आहे.
देवनागरी असतांना मोडी लिपी अस्तित्वात का आली?
याचे कारण असे की, देवनागरीत लिहितांना वेळ बराच वाया जातो. ही बाब पटो किंवा न पटो, पण हे वास्तव आहे. कारण प्रत्येक अक्षर सुटे लिहायचे, प्रत्येक शब्दावर शिरोरेघ मारायची, विरामचिन्हांचा वापर करायचा यामुळे लेखनाचा वेग मंदावतो.
मोडी लिपीचे जनक श्री. हेमाडपंत आहेत. त्यांचे नाव पंत हेमाद्री असे होते. हे अत्यंत विद्वान आणि प्रगल्भ बुद्धिमत्तेचे होते. ज्यावेळेस यादवांचे साम्राज्य होते त्याकाळी राजा रामदेवराव यादवांच्या दरबारात ते
"करणाधिप" या हुद्यावर होते. राज्याच्या सर्व वसुलीचे कामकाज करणे, राजकारणाबद्दल राजाला योग्य ती सल्लामसलत देणे, दरबाराचा सर्व पत्रव्यवहार पाहणे हे त्यांचे काम होते. आजच्या युगात "चीफ सेक्रेटरी" ज्याला म्हणतात तसा त्यांचा हुद्दा होता.
सहाजिकच त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर पत्रव्यवहार पहावा लागे. अशा वेळेस अशा एखाद्या लिपीची आवश्यकता त्यांना भासू लागली की ज्यात अत्यंत शीघ्रतेने कमीत कमी वेळात प्रचंड मजकूर लिहिता येईल. त्या गरजेपोटी त्यांनी मोडी लिपीची निर्मिती केली.
मोडी ही शीघ्रलिपी आहे. ज्याला इंग्रजीत रनिंग हॅण्ड म्हणतात तशी देवनागरीची रनिंग हॅण्ड म्हणजे मोडी.
अत्यंत शीघ्र गतीने लेखन हे जसे मोडीचे वैशिष्ट्य आहे तसेच अत्यंत सुंदर वळण हे ही तिचे वैशिष्ट्य आहे. मोडी लिपी दिसायला अतिशय सुंदर दिसते. तिचा स्वतःचा रूबाब आहे, तिच्यात नज़ाकत आहे.
आपल्या सर्वांचे पूर्वज मोडी लिपीतच लिहायचे. याचे कारण तेराव्या शतकापासून महाराष्ट्रात मोडी लिपी रुजलेली आहे. यादवकाळापासून ते शिवशाही, पेशवाई, परकीय राजवट, स्वातंत्र्यसंग्राम असे अनेक टप्पे या मोडी लिपीने पाहिलेले आहेत. छत्रपतींचा सर्व पत्रव्यवहार याच लिपीतून होत असे. सातशे वर्षांचा महाराष्ट्राचा इतिहास या लिपीमध्ये नोंदला गेलेला आहे.
सन १९५२ पर्यंत मोडी लिपी शालेय शिक्षणक्रमात होती. त्यानंतर त्यावेळच्या मूर्ख राजकारण्यांनी शिक्षणातून मोडी लिपी काढून टाकली. काही लोकांना असे वाटते की, ब्रिटीशांनी मोडी लिपी हद्दपार केली. पण तसे नाही. ब्रिटिश असतांनाही मोडी लिपी पूर्ण जोमात होती. अगदी ईस्ट इंडिया कंपनीचे पत्रव्यवहारही मोडी लिपीत होत असतं. १९४७ ला जेव्हा ब्रिटीश देश सोडून गेले त्यानंतर आलेल्या भारतीय राजकारण्यांचे हे १९५२ सालचे उपद्व्याप आहेत.
हिंदी ही राष्ट्रभाषा व्हावी म्हणून प्रादेशिक लिप्यांना नेस्तनाबूत करण्याचा एक व्यापक कट त्याकाळी शिजला होता असे म्हणतात. कारण हिंदी रुजवायची असेल तर देवनागरीच राहिली पाहिजे. मग देवनागरी सोडून इतर लिप्यांना उडवायचे. त्या हेतूने मोडी शिक्षणक्रमातून हद्दपार केली गेली असे मानणारा एक विद्वान वर्ग आहे, आणि त्यांचे हे म्हणणे पटण्यासारखे आहे.
मोडी लिपीचे सौंदर्य हा मोठा मनोरंजक आणि आल्हाददायक विषय आहे. मोडी लिपीतील प्रत्येक अक्षर हे लपेटीदार आहे. आणि अक्षरे जोडून लिहिली जातात त्यामुळे एखादी माळ गुंफल्यासारखी मोडी दिसते. तुम्हाला जे जे साधारण सत्तरी ओलांडलेले वृद्ध लोक माहित असतील, त्यांचे हस्ताक्षर पहा. त्या बहुतेकांचे हस्ताक्षर उत्तम असेल. तुम्ही या गोष्टीचे अवलोकन करा. आम्ही अनेक वृद्ध व्यक्तिंची हस्ताक्षरे पाहिली आहेत. ती अतिशय सुंदर आहेत.
आमचे आजोबा श्री. तात्यासाहेब आपटे यांचे हस्ताक्षर अतिशय सुंदर होते. याचे कारण हे की, हे लोक लहानपणापासून मोडीत लिहायचे. त्याकाळी मोडीचा कित्ता गिरवत असतं. त्यामुळे त्यांच्या अक्षरांना सुंदर वळण लागलेलं असे.
त्यानंतरची जी पिढी आली म्हणजे जे १९५२ नंतर शाळेत गेले त्या बहुतेकांची अक्षरे ही बिघडलेली दिसतील. अर्थात अपवाद प्रत्येक गोष्टीला असतात. पण त्या पूर्वीच्या काळात खराब अक्षर असलेला एखादा सापडे, १९५२ नंतर चांगलं हस्ताक्षर असलेला एखादा सापडतो. अशा बहुतेकांचे हस्ताक्षर पाहिल्यावर तर आमच्या मनात,
" रांडेच्यान् काय लिहिलाय तेच कळत नाही" असा विचार येतो. याचे प्रमुख कारण हे की, त्या लोकांचा मोडीशी संबंध आला नाही.
मोडी लिपीची लेखन वैशिष्ट्ये:-
मोडी लिपी ही देवनागरीप्रमाणे डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. लिहिण्यापूर्वी ज्या शाईने आपण मजकूर लिहिणार त्या शाईने डावीकडून उजवीकडे एक ओळ आखून त्याखाली मोडी लिहिली जाते. प्रत्येक शब्दावर रेघ देण्याचा वेळ त्यामुळे वाचतो. तसेच पूर्वीच्याकाळी मोडी एकही शब्द आणि वाक्य न तोडता सलग लिहिली जात असे. त्यामुळे वाचणार्याच्या प्रज्ञेची कसोटी लागे.
म्हणून पूर्वी पत्रात, " लिहिणार्याचे वाचणार्यास दंडवत" असे लिहिण्याची प्रथा होती. कारण लेखन करणार्याने जे लिहिले आहे ते त्याच अर्थाने समजून घेण्याची बुद्धी वाचणार्याजवळ हवी.
नको तिथे वाक्य तोडून वाचले तर अनर्थ होईल. उदाहरणार्थ, आमचे एक मित्र आहेत कवी इलाही जमादार. त्यांच्या एखाद्या रचनेबद्दल लिहितांना, समजा असे लिहिले की,
कवी इलाही जमादार आहे.
हे वाक्य मोडीत लिहायचे तर ----- कवीइलाहीजमादारआहे ------ या पद्धतीने पूर्वी लिहिले गेले असते.
वाचणार्याने हे वाक्य नको तिथे तोडले तर --- कवी इला ही जमादार आहे --- असे वाचले जाईल आणि अनर्थ होईल. त्यामुळे मोडीत लेखन करणार्यापेक्षा, ते वाचणार्याच्या बुद्धीचा कस लागतो.
हल्ली मोडीत सुटे शब्द लिहिले जात असल्यामुळे मोडी बरीच "माणसाळलेय". नाहीतर पूर्वी मोडीला पिशाच्च लिपी म्हणत ते यामुळेच.
मोडीचे दुसरे वैशिष्ट्य हे की, मोडीत एक अक्षर अनेक प्रकारे लिहिले जाते. काही अक्षरे तर सहा सात पद्धतीने लिहिली जातात. इतकेच नव्हे तर नेहमीप्रमाणे डावीकडून उजवीकडे लिहिण्याऐवजी उजवीकडून डावीकडे लिहिली जातात. उदाहरणार्थ, 'च' हे अक्षर डावीकडून उजवीकडे जसे लिहिले जाते तसे उजवीकडून डावीकडेही लिहिले जाते. त्यात प्रत्येकाच्या "चॉईस" चा भाग आहे. आम्ही शक्यतो 'च' उजवीकडून डावीकडे लिहितो.
मोडीत 'र' अनेक प्रकारे लिहिला जातो. त्यात ज्या अक्षरांत बालबोध प्रमाणे काना असतो त्या कान्याला र जोडला जातो. त्यामुळे एका अक्षरात दोन अक्षरे लिहून होतात.
मोडीत काही अक्षरे अशी आहेत की ज्यात अत्यंत सूक्ष्म भेद किंवा प्रचंड साम्य आहे. लेखन करतांना त्यांच्या वळणावर नीट लक्ष ठेऊन लिहावे लागते. अक्षराचे वळण जरा चुकले की अनर्थ होतो. उदाहरणार्थ,
"कौलांवर पक्ष्यांचा थवा दिसत होता" या वाक्यात थ लिहितांना गडबड झाली आणि थ चे वळण चुकले तर "कौलांवर पक्ष्यांचा खवा दिसत होता" असे वाचले जाईल. त्यामुळे प्रत्येक अक्षराचे वळण नीट येईल ही काळजी घ्यावी लागते.
तसेच मोडीचा महत्त्वाचा भाग म्हणजे र्हस्व दीर्घाची भानगड मोडीत नाही. सर्व उकार हे र्हस्व आणि सर्व इकार दीर्घ. कितीही खटकलं तरी ते तसचं लिहायचं. लेखनाचा वेग महत्त्वाचा. बाकी विचार करायचा नाही. उदाहरणार्थ, कविवर्य राजा बडे यांची
चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले.... ही ओळ मोडीत.... चांदणे शींपीत जाशी चालता तु चंचले...
अशीच लिहिली जाईल. किंवा सुरेश भटांची
दूर दूर तारकातं, बैसली पहाट न्हातं...... ही ओळ मोडीत.... दुर दुर तारकातं, बैसली पहाट न्हात....
अशीच लिहिली जाईल. किंवा
जिवलगा राहिले रे, दूर घर माझे... ही ओळ मोडीत.... जीवलगा राहीले रे, दुर घर माझे
अशीच लिहिली जाईल. तिथे र्हस्व-दीर्घाचा पर्यायच नाहीये. अशा लेखनामुळे वृत्ताची काशी झाली का? मात्रा चुकल्या का? या चौकशा करायच्या नाहीत.
अशी आहे मोडी
या महाराष्ट्राच्या इतिहासाची राखणदार बनून राहणारी, सातशे वर्षांचा इतिहास स्वतःमध्ये साठवून ठेवणारी, छत्रपतींची पत्रे सौभाग्यलेण्यासारखी मिरवणारी, तुकोबांच्या अजरामर अभंगाना स्वत:चे कोंदण बहाल करणारी, अत्यंत कमी वेळात लेखकाला भरपूर मजकूर लिहून देणारी, वाचणार्याच्या डोक्याचं खोबरं करणारी, विरामचिन्हे टाळणारी, सलग लेखनामुळे दुर्बोध ठरणारी, विविध लिपीतील वर्ण घेऊनही स्वत:ची मिजास दाखवणारी, लिहिणार्याला वरदहस्त देणारी, वाचणार्याला वेठीस धरणारी, शुद्धलेखनाचे कोणतेही नियम न पाळणारी, शब्दसंक्षेप वापरून लेखनाची गती वाढवणारी, अनेक शब्द चुकीच्या पद्धतीने लिहूनही त्याची खंत न बाळगणारी, शुद्धलेखनाचा आग्रह धरणार्यांना फाट्यावर मारणारी, तिची खडतर साधना आणि सराव करणार्यालाच वश होणारी, एकदा वश झाली की आयुष्यभर त्याला लेखनाचा निखळ आनंद देणारी..... आणि
स्वतःच्या सौंदर्याने पाहणार्याचे हृदय घायाळ करणारी, त्याच्या हृदयाचे सिंहासन काबीज करून त्याची मल्लिका बनणारी...
त्या मोडी लिपीला आणि तिचे जनक श्री. हेमाडपंत यांना आमचा दंडवत. मोडी नसती तर आम्ही कसे लिहिले असते? असा प्रश्न आम्हाला अनेकदा पडतो.
कारण मोडीने जी लेखनाची मजा दिली ती अन्य कुठल्याही लिपीने दिलेली नाही. तसेच मोडीचा पदर 'हाती लागल्यावर' आम्ही सुद्धा इतर कुठल्या लिपीचा 'दामन' हाती यावा अशी अपेक्षा केली नाही.
कारण ज्याला मोडी येते त्याला इतर कुठल्या लिपीत लिहावे असे वाटत नाही. उत्तम भोग हाती आला की दुय्यम भोग वृत्तीतून वजा होतो अशी मानवाचीच नव्हे तर सर्व प्राणीमात्रांची प्रवृत्ती आहे.
ज्यांच्या घरात मांजर आहे त्यांनी हा प्रयोग करून पहा. भुकेल्या मांजराला दूध पोळी खायला द्या. ते आवडीने खातं. ते खात असतांना त्याच्या समोर पापलेट, सुरमई धरा. मांजर दूधपोळी सोडून पापलेटच्या मागे जातं. उत्तम भोग मिळाला की लगेच दुय्यम भोग वजा होतो.
किंवा एखादा कवी असतो. सुरूवातीस कविता लिहितो. मग त्याला गझल लिहायचे तंत्र साधतं. एकदा तो गझलेकडे वळला की बहुतकरून गझलच लिहितो. असे आहे.
मोडी आली की जे काही लिहाल ते मोडीतच यायला लागतं. म्हणूनच म्हणावसं वाटतं,
ज्याला लिहिता आली मोडी... त्याला कळली लेखनातली गोडी
आपला,
(मोडीप्रेमी) धोंडोपंत