Sunday, December 25, 2011

वेडे खुळे शहाणे.........


|| श्री स्वामी समर्थ||
लोकहो,


मूर्ख माणसं मूर्खासारखी वागली तर आपण समजू शकतो. पण शहाणी माणसं जेव्हा मूर्खासारखं वागतात, तेव्हा आपल्यालाच वेड लागायची पाळी येते. त्यातून आडनाव "शहाणे" असलेला माणूस जेव्हा अत्यंत मूर्खासारखा बॉसला काहीबाही बोलून, स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतो, तेव्हा शेक्सपिअरचं वाक्य पटतं. नावात काय आहे? नावात खरचं काही नाही. गोरे आडनावाचा माणूस काळा असतो. काळे आडनावाचा गोरा असतो. जहागिरदार आडनावाचा माणूस कुठल्यातरी सोसायटीत वॉचमन म्हणून काम करत असतो तर राजे आडनावाचा माणूस कुठल्यातरी ऑफिसात कारकून असतो. असो.


तर हा शहाणे आहे एक संगणक अभियंता. ( गोपनीयतेमुळे नाव लिहिलेले नाही.) सॉफ्टवेअर कन्सल्टंट. एका अतीप्रतिष्ठीत सॉफ्टवेअर कंपनीत कामाला आहे. सप्टेंबरमध्ये त्याला प्रोजेक्ट बदलून मिळाला. आणि नवीन प्रोजेक्ट मॅनेजरचे आणि याचे राडे सुरू झाले. त्यांचे रुलिंग प्लॅनेट्स जमत नसावेत. याच्या म्हणण्यानुसार, नवा प्रोजेक्ट मॅनेजर याला उगाच नडत असतो. 


१५ नोव्हेंबरला शनीने तुळेत प्रवेश केला आणि याला साडेसाती सुरू झाली. १८ नोव्हेंबरला म्हणजे शुक्रवारी रात्री, याचे आणि त्या मॅनेजरचे जाम वाजले. हा कंपनीतून बाहेर पडला तो डोकं फिरवूनच. हे एवढ्यावर थांबलं नाही. तर ऑफिसातून निघाल्यावर, त्याने तडक एक बार गाठला आणि दारू ढोसली. आणि त्या नशेत करू नये ते केले. त्याने प्रोजेक्ट मॅनेजरला मोबाईलवर फोन करून शिव्यांची लाखोली वाहिली. 


२१ तारखेला कंपनीत गेल्यावर एच.आर. कडून एक ईमेल आली आणि त्याला कामावरून काढत असल्याचे सूचित केले. त्यामुळे त्याने प्रोजेक्टसंबंधी कोणतेही काम करू नये, तसेच अपॉईंटमेंट घेऊन भेटावे, प्रकरण गंभीर आहे, असे एच. आर. मॅनेजरने त्याच्या ईमेल मध्ये लिहिले होते. हा घाबरला. तो संपूर्ण आठवडा तो एच आर मॅनेजरची भेट घेण्यासाठी तडफडत होता. पण त्याला भेट मिळाली नाही. २५ नोव्हेंबरला त्याची आणि एच आर मॅनेजरची भेट झाली आणि त्या भेटीत एच आर मॅनेजरने त्याला पेपर्स टाकायला सांगितले.


२८ तारखेला याने आम्हाला फोन करून झालेला प्रकार सांगितला आणि काहीही करून यातून बाहेर काढा, असे म्हणाला. एकंदर प्रकार ऐकून आम्हालाही धक्का बसला. इतक्या हुशार मुलाचे प्रोफाईल अशा पद्धतीने बिघडावे, ही घटना निश्चित तापदायक आहे. 


आम्ही त्याला नंबर द्यायला सांगितले. त्याने २६ नंबर दिला. नंबर पाहून बरे वाटले. यात दोन हे अर्थस्थान आणि सहा हे नोकरीचे स्थान. पण बेरीज येतेय आठ ......




२६ क्रमांकाची प्रश्नकुंडली वर दिलेली आहे. चंद्र स्वत: अष्टमात असून तो अष्टमातल्या शुक्राच्या नक्षत्रात आहे. शुक्राची संपूर्ण तूळ रास जरी भावारंभी नसली तरी षष्ठ या नोकरीच्या स्थानी येते. प्रश्न नोकरीत होणार्‍या नुकसान, हानी, तोटा, मनस्ताप याबद्दल आहे.


दशमस्थानाचा उपनक्षत्र स्वामी रवि आहे. रवी नेहमीच मार्गी असतो. रवि स्वत: सप्तमात असून पंचमेश आहे. (जॉब जाण्याचे ठिकाण), रवि वृश्चिकेत ११ अंशांवर म्हणजे शनीच्या नक्षत्रात आहे. प्रश्नवेळी शनी मार्गी आहे. शनी षष्ठात असून तो दशमेश आणि लाभेश आहे. म्हणजे दशमाचा उपनक्षत्रस्वामी हा नोकरीसाठी आवश्यक असलेल्या ६/१०/११ या तीनही स्थानांचा बलवान कार्येश आहे. म्हणजे नोकरी काही जात नाही, ही काळ्या दगडावरची रेघ. 


आता पुढचा प्रश्न कामावर कधी रुजू होता येईल? त्यासाठी रुलिंगप्लॅनेट्स पाहिले की झाले. प्रश्नवेळी शुक्राचे लग्न सुरू आहे. केतू शुक्राच्या राशीत म्हणजे केतू शुक्राचे प्रतिनिधीत्व करेल. चंद्र धनुराशीत २१ अंशांवर म्हणजे शुक्राच्याच नक्षत्रात. म्हणजे पुन्हा शुक्र, केतू येतील. राशीस्वामी गुरू म्हणून गुरू आणि वार होता सोमवार. म्हणजे चंद्र. 


आता रुलिंगप्लॅनेट्स मध्ये चंद्रभ्रमण पहायचे की रविभ्रमण? ज्या वेळेस घटना महिनाभरात घडेलच याची हमी नसते, तेव्हा फार मोठा संभ्रम निर्माण होतो. याचे उत्तर कुठल्याही ज्योतिषग्रथांत दिलेले नाही. 
पण चिंता करायचे कारण नाही. कारण याचे उत्तर आम्ही आमच्या अभ्यासातून शोधून काढले आहे.


रविभ्रमण की चंद्रभ्रमण असा प्रश्न जेव्हा निर्माण होतो, अशा वेळेस आम्ही स्वतः शोधून काढलेले सूत्र वापरतो. ते असे की, लग्ननक्षत्रस्वामी, लग्नाचा उपनक्षत्रस्वामी, लग्नावर दृष्टी असणारे ग्रह, रुलिंगप्लॅनेट्सच्या युतीतील ग्रह यामध्ये रवि आणि चंद्र मिळत आहेत का ते पहावे. रुलिंगमध्ये रवी असेल तर रविभ्रमण घ्यावे चंद्र असेल तर चंद्रभ्रमण घ्यावे. अचूक कालनिर्णय येतो. हे करून पहा. 


प्रश्नवेळेच्या रुलिंगप्लॅनेट्समध्ये रवि आणि चंद्र दोघेही आहेत. पण रवी ग्रह उजवा आहे. कारण चंद्र हा वाराचा स्वामी म्हणजे सर्वात कमी दर्जाचा रुलिंगप्लॅनेट आहे. तर रवी लग्ननक्षत्र स्वामी आहे. तसेच लग्नावर रविची दृष्टी आहे. त्यामुळे रवीभ्रमण शोधणेच योग्य आहे.


प्रश्नवेळी रवी वृश्चिकेत होता. वृश्चिकेचा स्वामी रुलिंगमध्ये नाही. त्यामुळे वृश्चिकेत रवि असेपर्यंत म्हणजे १५ डिसेंबर पर्यंत काही होणार नाही. त्यानंतर रवि धनेत जाईल. धनेत केतू शुक्र आणि रवि यांची नक्षत्रे आहेत. त्यापैकी केतु हा सर्वात महत्त्वाचा आहे. त्यामुळे गुरूच्या धनुराशीत केतूच्या मूळ नक्षत्रात जेव्हा रवी जाईल, तेव्हा याला नोकरीत रुजू होता येईल. 


हा कालावधी १६ डिसेंबर ते २९ डिसेंबर असा येतो. यातही दिवस काढायचा झाल्यास केतूचेच उपनक्षत्र निवडावे लागेल. कारण केतू हा रुलिंगमध्ये दोन वेळा आला आहे. त्यामुळे १६ डिसेंबर हीच तारिख नक्की केली. तसे त्याला सांगितले.


आम्ही शहाणेला एक तोडगा करायला सांगितले. तसेच रुलिंगमध्ये शुक्राचे प्राबल्य पाहून एखाद्या स्त्री च्या मार्फत मध्यस्ती घडवून आण, असा सल्ला दिला. आम्ही हे सांगितल्यावर तो एकदम चमकलाच. कारण त्याच्या पूर्वीच्या कंपनीत असलेली त्याची मॅनेजर बाई या बॉसची चांगली मैत्रीण आहे, हे याला ठाऊक आहे. तो म्हणाला, तिच्यातर्फेच प्रयत्न करतो.


त्यानंतर लगेच त्याने तिच्याकडे जाऊन तिला सर्व हकीगत सांगितली. बॉसची क्षमा मागतो, तू काहीही करून त्याला पटव असे सांगितले. तिनेही जिव्हाळ्याने या गंभीर प्रश्नाकडे पाहून, तिच्याकडून जे काही करता येईल ते ती करेल असे त्याला आश्वासन दिले. त्यानंतर तिने, हा शहाणे, ती मॅनेजर बाई आणि त्याचा बॉस यांची एक मिटिंग तिने एका हॉटेलात आयोजित केली. त्या मिटिंगला शहाणे येणार आहे, हे तिने आधी मॅनेजरला कळवलेच नव्हते. लय हुशार बाई ही! ते दोघे हॉटेलात भेटले. तेव्हा तिने शहाणेचा विषय काढला. शहाणे खरचं शहाणा आहे हे तिने बॉसला पटवून दिले. :) 


थोड्या वेळात शहाणे तिथे "अवतीर्ण" झाला. त्याने बरीच क्षमायाचना केली. बरीच चर्चा झाल्यावर बॉसही त्याला कामावर घ्यायला तयार झाला. पण मॅटर एचआर पर्यंत गेले आहे. I will have to talk to them to stop the proceedings. You will have to wait for a while to resume. असे त्याने शहाणेला सांगितले.


शेवटी शहाणेला एचआर कडून एक वॉर्निंग लेटर आणि विदाउट पे चा आहेर मिळाला आणि दिनांक १६ डिसेंबर रोजी सकाळी सर्व सोपस्कार पार पाडून, दुपारी शहाणे शहाण्यासारखा कामावर रुजू झाला.


आपला,
(शहाणा) धोंडोपंत

अभ्यासकांसाठी- जेव्हा घटना महिनाभरात निश्चितपणे घडणार असेल तेव्हा चंद्रभ्रमण आणि जेव्हा घटना निश्चितपणे महिनाभरानंतर ते वर्षभरापर्यंत घडणार आहे तेव्हा रविभ्रमण हा नियम कृष्णमूर्ती पद्धतीतला अनुभवसिद्ध नियम आहेच. पण जेव्हा घटनेचे स्वरूप निश्चित कालखंड सांगू शकत नाही, तेव्हा काय या प्रश्नाला आमच्या पद्धतीनुसार योग्य उत्तर मिळते. इथे एक गोष्ट लक्षात येते की, जरी घटना महिनाभरात घडली असली तरी रविभ्रमणानुसारच अचूक दिवस मिळाला आहे. त्यामुळे रविभ्रमण की चंद्रभ्रमण असा संभ्रम निर्माण झाला असता, आमची पद्धत योग्य उत्तर देते, हे अभ्यासकांच्या लक्षात आले असेलच. 

2 प्रतिसाद:

essbeev said...

आता जरा इन्टरनेटवर फेरफटका मारल्यासारखे वाटत आहे.. :)

VINE said...

that was great