Sunday, December 25, 2011

ग्रहयोगांचे चमत्कार....


|| श्री स्वामी समर्थ||
लोकहो,

पत्रिकेतले ग्रहयोग कशी धडधडीत फळे देतात, त्याबद्दल हे उदाहरण. ही कुंडली आहे एका ३८ वर्षीय महिलेची. गोपनीयतेच्या कारणास्तव जन्मतपशील आणि नाव दडवून ठेवले आहे. शास्त्र समजण्यापुरती कुंडली दिली आहे.

साधारण तीन वर्षांपूर्वी ही महिला तिच्या नवर्‍यासोबत आमच्याकडे संततीबद्दलचा प्रश्न घेऊन आली. कुंडली पाहिल्यावर आम्ही तिला स्पष्ट सांगितले की तुम्हांला मूल होणे शक्य नाही. ती त्यापूर्वी अनेकांकडे जाऊन आली होती. त्यांनी गुरूभ्रमण पाहून पुढील वर्षी होईल असे अनेक वर्ष तिला सांगितले होते. पण तसे काही घडले नाही. वैद्यकीय उपचार सुरू होते. त्यात चार वेळा आययुआय करून झाले. शेवटी डॉक्टरांनी आयव्हीएफचा पर्याय सांगितला. 

तो करून घेऊन फायदा होईल का? हे विचारण्यासाठी ती आली होती. आम्ही कुंडलीतले योग पाहून दोन मिनिटातचं तिला आयव्हीएफ करून काही होणार नाही असे सांगितले. तसेच तिच्या व तिच्या नवर्‍याच्या पत्रिकेत पंचमाशी बुधाचा संबंध पाहून, मूल दत्तक घेणे हा उत्तम पर्याय आहे हे ही सांगितले.

त्यानंतर त्यांच्याबद्दल काही कळले नाही. कदाचित आमचे स्पष्ट, परखड, फटकळ बोलणे तिला लागले असावे. काही महिन्यांपूर्वी तिचा अचानक फोन आला. बारश्याचा मुहूर्त काढायला. आम्ही मनात म्हटलं,

"चला आपलं भाकीत चुकलं पण तिला मूल झालं हे चांगलं झालं." 

मुहूर्तासाठी बाळाची जन्मवेळ विचारली. तर म्हणाली, "निश्चित वेळ माहीत नाही." म्हटलं, "म्हणजे?"

तेव्हा तिने सांगितले की, मूल दत्तक घेतले आहे. 

आम्ही तिला आयव्हीएफ करू नकोस, काही फायदा नाही होणार, हे सांगूनही तिने एक दोन नाही तर तीन वेळा आयव्हीएफ च्या सायकल घेतल्या. तीनही वेळेस त्या फेल गेल्या. पाच सहा लाखाचा चुराडा झाला तो झाला, वर तिच्या तब्येतीला हानीकारक औषधे शरीरात गेली ते वेगळचं.


या पत्रिकेत काय योग आहेत ते पहा. सिंह लग्नाच्या या कुंडलीत पंचमेश गुरू हा पंचमातच आहे. पण त्याचे अंश पहा. तो नुसता पंचमात पाहून " वा.. वा !!" म्हणण्याचे कारण नाही.  तो किती बिघडलाय ते पहा. म्हणजे हिच्या नशीबात काय लिहून ठेवलाय ते समजेल. 

तो राहूच्या अंशात्मक युतीत आहे. ज्यावेळेस कुठलाही ग्रह राहुच्या युतीत येतो तेव्हा राहु त्याला पराकोटीचा बिघडवतो. इथे पंचमेश गुरूच आहे आणि संततीचा कारकही तोच आहे. म्हणजे संबंधीत स्थानाचा अधिपती आणि कारक हे दोन्ही बिघडले. पुढची मजा पहा. 

चंद्रकुंडलीचा पंचमेशही गुरूच आहे. त्या पातळीवरही काहीच चांगले नाही. तसेच गुरू हा हर्षलच्या केंद्रयोगात आहे. त्यामुळेही तो बिघडला आहे. त्याहून अशुभ योग म्हणजे तो शनीच्या षडाष्टक योगात आहे. नुसता शनीच्या षडाष्टकात नाही तर वक्री शनीच्या. शनी वक्री असल्यामुळे अशुभत्व खूप वाढले.

आणि सर्वात कहर म्हणजे, नवमांश कुंडलीतला पंचमेशही गुरूच आहे. याला दुर्दैव नाहीतर दुसरं काय म्हणायचं?

कृष्णमूर्ती पद्धतीप्रमाणे, पंचमाचा सबलॉर्ड शुक्र आहे. तो धनेश व लाभेश बुधाच्या नक्षत्रात आहे. म्हणजे संततीचा योग आहे. शुक्राचीच महादशा २००३ पर्यंत म्हणजे वयाच्या ३० व्या वर्षापर्यंत सुरू होती. म्हणजे दशास्वामीही अनुकूल होता. पण संतती झाली नाही. पुढला महादशास्वामी रवी सुद्धा पंचमातच आहे. त्या दशेतही काही झालं नाही.

याचं कारण वर नमूद केलेले ग्रहयोग. 

विवाहासाठी पत्रिका जुळवितांना या गोष्टींचा सखोल विचार करून पत्रिकामेलन केले पाहिजे. नुसते ३० गुण आणि ३२ गुण जमताहेत, याला काही अर्थ नाही.

आपला,
(सूक्ष्मदर्शी) धोंडोपंत

0 प्रतिसाद: