॥ श्री स्वामी समर्थ॥
लोकहो,
नुकतेच काही प्रतिभावान(?) कवींनी उर्दू ग़ज़लांचे केलेले मराठी "भावानुवाद" वाचनात आले आणि मन अस्वस्थ झालं. :) त्याला जरी ते कवी भावानुवाद संबोधत असतील तरी भाषांतर हा शब्द जास्त योग्य आहे. याचे कारण भावाचा अनुवाद करताच येत नाही. प्रत्येक भाषा ही स्वत:चा ढंग, स्वत:ची शैली, स्वत:चा लहजा घेऊन आलेली असते.
तिचा तो लहजा दुसर्या भाषेत कसा आणणार? शब्दाला शब्द योजता येतीलही, पण त्या शब्दातला भाव परावर्तीत कसा होईल?
प्रत्येक गोष्टीचं मराठीकरण करण्याचा हव्यास हा स्तुत्य असेल कदाचित पण तो शोभला पाहिजे हे ही तितकचं खरं. नाहीतर मूळ काव्याची वाट लावणं, मोडतोड करणं या पलिकडे त्यात काही उरत नाही. आम्ही जे तथाकथित भावानुवाद वाचले ते मिर्झा ग़ालिब यांच्या ग़ज़लांचे होते. किमान त्या कवीने आपण कुणाच्या वाटेला जातोय याचे तरी भान ठेवायला पाहिजे होते. ग़ालिब सारख्या उत्तुंग प्रतिभेच्या कवीच्या शायरीचा अनुवाद करणे ही साधी गोष्ट आहे काय? ते शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे.
आज तो भावानुवाद वाचायला/ ऐकायला ग़ालिब जिवंत नाही, हे ग़ालिबचे मोठे भाग्य म्हटले पाहिजे. जर का ग़ालिबने त्याच्या ग़ज़लांची मोडतोड ऐकली असती, तर त्याच्या तोंडून त्याचा खालील शेर बाहेर पडला असता.
हम कहॉं के दाना थे, किस हुनर में यक़्ता थे
बेसबब हुआ ’ग़ालिब’, दुष्मन आसमॉं अपना
(आम्ही कुठे एवढे बुद्धीवान होतो की लोकांनी आमच्यावर जळावं? कुठल्या कलेत एवढे प्राविण्य आमच्याकडे होतं की ज्यामुळे लोकांनी आमचा हेवा करावा. ग़ालिब, या दुनियेनी उगीच आमच्याशी वैर धरलं. [ आणि आमच्या काव्याची मोडतोड केली] --- हे आमच्या पदरचं. असो)
एक गोष्ट या कवींनी समजून घेतली पाहिजे की उर्दू भाषेची नज़ाकत वेगळी आहे. तिचा अंदाज़ वेगळा आहे. ती त्याच पद्धतीने शोभून दिसते. तिची प्रतिके वेगळी आहेत. तिचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. तिच्यात शृंगार आहे पण अश्लीलतेला कुठेही थारा नाही. ग़ज़लेतली सुंदरी ही अंगभर कपडे घातलेली सलज्ज नवयौवना आहे. ती चेहराही दिसू देत नाही. तिच्यात हुस्न आहे, क़ैफ़ आहे पण कुठेही लाज सोडून पुरूषाला आव्हान देण्याची तिची वृत्ती नाही. आणि त्या लाजण्यातच तिचं खरं सौंदर्य आहे.
जवॉं होने लगे जब वो, तो कर लिया हमसे पर्दा
हया यक़लख़्त ही आयी, और शबाब आहिस्ता आहिस्ता
अशी तिची अवस्था आहे. तिला तिचेच कोंदण शोभतं. दुसर्या भाषेच्या कोंदणात ती गुदमरून जाईल. पु.लं. नी असं म्हटलाय की, " समजा श्राद्धाचा भटजी दर्भ घेऊन येण्याऐवजी कोकाकोलाच्या स्ट्रॉ घेऊन आला, तर कसे वाटेल?" तसेच या उर्दू गझल सुंदरीला मराठमोळा पोशाख केला तर वाटेल.
आणि खरं सांगायचं तर अनेक शेरांचे मराठीतच काय कुठल्याही भाषेत अनुवाद होऊच शकत नाही. उदाहरणार्थ काही शेर लिहितो. काय त्याचा मराठीत अनुवाद करणार?
अहमद फ़राज़ म्हणतो
कुर्ब-ए-जानॉं का न मैख़ाने का मौसम आया
फिरसे बेसर्फा उजड़ जाने का मौसम आया
कुर्ब-ए-जानॉं चा काय अनुवाद करणार? प्रेयसीच्या सामिप्याचा न मैखान्याचा ऋतू आला..... असा??? किती हास्यास्पद होईल ते?
कुंज-ए-गु़र्बत में कभी गोश-ए-ज़िंदॉं में थे हम
जानेजान जब भी तेरे आने का मौसम आया
करा अनुवाद. होईल? किंवा
शिकवा-ए-जुल्मत-ए-शब से तो कहीं बेहतर था
अपने हिस्से की कोई शमआ जलाते जाते
काय अनुवाद करणार?
ज़ब्त लाज़िम है मगर दुख है क़यामत का "फ़राज़"
ज़ालिम अब के भी न रोयेगा तो मर जाएगा
करा अनुवाद
पेच रखते हो बहुत साज-ओ-दस्तार के बीच
हमनें सर गिरते हुए देखे हैं बाज़ार के बीच
बाग़बानों को अजब रंज से तकते हैं गुलाब
गुलफ़रोश आज बहुत जमा हैं गुलज़ार के बीच
अजून देतो
इक उम्र से हूँ लज़्ज़त-ए-गिरिया से भी महरूम
ऐ राहत-ए-जाँ मुझको रुलाने के लिए आ
अब तक दिल-ए-ख़ुशफ़हम को तुझ से हैं उम्मीदें
ये आखिरी शमएँ भी बुझाने के लिए आ
अजून बरीच उदाहरणे देता येतील. असो.
सांगायची गोष्ट ही की, उर्दूतल्या या गझलसुंदरीला तिच्या मूळ रूपात ठेऊनच तिचा आस्वाद घ्या. तिला बेनक़ाब करून, मराठी लुगडं नेसवून, तमाशाच्या फडावर नाचवायला नेऊ नका, किंवा तुळशी वृंदावनाभोवती तिला प्रदक्षिणा घालायला लावू नका. ते तिला शोभणार नाही.
उर्दू गजलांचे मराठीत अनुवाद करण्याच्या उठाठेवी करण्यापेक्षा, मराठीतील प्रतिके घेऊन उत्तम मराठी ग़ज़ल लिहा. मराठी ग़ज़लेला मराठी मातीचाच सुगंध आला पाहिजे, असे सुरेश भटांनी म्हटले आहेच ना? ते अत्यंत योग्य आहे. आपल्या भाषेत, आपल्या वातावरणात, आपल्या परंपरेत ग़ज़लेला नटवा. त्यात ती जास्त मोहक आणि सुंदर दिसेल, अशी उसनी लुगडी परिधान करून वावरण्यापेक्षा.
लेखाचा शेवट अहमद फ़राज़च्या आमच्या अत्यंत आवडत्या ग़ज़लेने करतो. कृपा करुन या ग़ज़लेच्या वाटेला जाऊ नका अशी अनुवादक कवींना हात जोडून विनंती. :)
सोबत अहमद फ़राज़ आणि नूरजहॉंचे एक दुर्मीळ छायाचित्र जोडत आहोत. आयुष्यभर एखाद्या व्यक्तीवर जिवापाड प्रेम करणं काय असतं, हे या दोघांकडे पाहून समजतं. साधारणपणे समाजात याला "लफडं" असं संबोधलं जातं. कारण दोन व्यक्तींमधले भावबंध आणि स्नेहबंध, त्यांच्यातला जिव्हाळा आणि ओलावा जाणण्याची प्रगल्भताच समाजामध्ये नसते. येता जाता कुणाच्याही व्यक्तिगत भावविश्वावर पानाच्या पिंका टाकण्याची किडलेली मानसिकता असलेले लोकच समाजात बहुसंख्येने असतात.
Love is Divine असे म्हटले जाते त्याची प्रचिती यांच्यावरून येते. हे छायाचित्र घेतले तेव्हा ते दोघेही साधारण साठीचे असावेत. सुरेश भटांनी म्हटल्याप्रमाणे - " जरी तुझ्या पाकळ्यातं मी गुंतलो तरीही... गडे तुझा हा सुगंध माझ्या न मालकीचा" हेच अहमद फ़राज़ नूरजहॉं ला सांगत असेल काय?
अब के तज्दीद-ए-वफ़ा का नहीं इम्काँ जानाँ
याद क्या तुझ को दिलाएँ तेरा पैमाँ जानाँ
यूँ ही मौसम की अदा देख के याद आया है
किस क़दर जल्द बदल जाते हैं इन्साँ जानाँ
ज़िन्दगी तेरी अता थी सो तेरे नाम की है
हम ने जैसे भी बसर की तेरा एहसाँ जानाँ
दिल ये कहता है कि शायद हो फ़सुर्दा तू भी
दिल की क्या बात करें दिल तो है नादाँ जानाँ
अव्वल-अव्वल की मुहब्बत के नशे याद तो कर
बे-पिये भी तेरा चेहरा था गुलिस्ताँ जानाँ
आख़िर आख़िर तो ये आलम है कि अब होश नहीं
रग-ए-मीना सुलग उठी कि रग-ए-जाँ जानाँ
मुद्दतों से ये आलम न तवक़्क़ो न उम्मीद
दिल पुकारे ही चला जाता है "जानाँ जानाँ "
हम भी क्या सादा थे हम ने भी समझ रखा था
ग़म-ए-दौराँ से जुदा है ग़म-ए- जॉं जानाँ
अब की कुछ ऐसी सजी महफ़िल-ए-याराँ जानाँ
सर-ब-ज़ानू है कोई सर-ब-गिरेबाँ जानाँ
हर कोई अपनी ही आवाज़ से काँप उठता है
हर कोई अपने ही साये से हिरासाँ जानाँ
जिस को देखो वही ज़न्जीर-ब-पा लगता है
शहर का शहर हुआ दाख़िल-ए-ज़िन्दाँ जानाँ
अब तेरा ज़िक्र भी शायद ही ग़ज़ल में आये
और से और हुआ दर्द का उन्वाँ जानाँ
हम कि रूठी हुई रुत को भी मना लेते थे
हम ने देखा ही न था मौसम-ए-हिज्राँ जानाँ
होश आया तो सभी ख़्वाब थे रेज़ा-रेज़ा
जैसे उड़ते हुये औराक़-ए-परेशाँ जानाँ
आपला,
(फ़राज़भक्त) धोंडोपंत