॥ श्री स्वामी समर्थ॥
लोकहो,
दिनांक ०७ मे २०११ ची संध्याकाळ. शनिवार होता. " घरातल्या सामानाच्या खरेदीसाठी मॅग्नेट मॉलमध्ये जायचे आहे" अशी नोटीस स्वयंपाकघरातून मिळाली होती. फुकटचा ड्रायव्हर आणि हमाल या जबाबदार्या पार पाडत जगावं लागतं. आलिया भोगासी, असावे सादर. असो.
तिथे जायला निघणार एवढ्यात सौरभचा फोन आला. त्याचे आणि त्याच्या प्रेयसीचे काही दिवसांपासून राडे सुरू आहेत हे त्यांनी पूर्वीच सांगितले होते. आम्ही सबुरीचा सल्ला त्याला दिला होता. म्हटलं, " आहे एक तर रहा तिच्याबरोबर नीट. भांडतोस कुठे?"
गेले काही दिवस सौरभच्यात आणि तिच्यात कुरबुरी चालू होत्या. they could not get along with each other. तर दिनांक ०७ मे रोजी सौरभने सांगितले की त्या दोघांच्यात गेल्या आठवड्यात म्हणजे एप्रिल अखेरीस मोठा राडा झाला असून आता ती त्याच्याशी बोलतही नाही. फोन घेत नाही. गुगल निरोपकावर दिसत नाही म्हणजे तिने त्याला ब्लॉक केलाय आणि फेसबुकावरूनही त्याला उडवून टाकला आहे.
त्याने त्यानंतर मित्रमैत्रिणींना मध्ये घेऊन बराच कॉम्प्रोमाईज करण्याचा प्रयत्न केला पण तिने काहीही प्रतिसाद दिला नाही. सौरभचा प्रश्न होता, त्या दोघांचे पुनर्मीलन होईल का?
आम्ही त्याला नंबर द्यायला सांगितले. त्याने २८६ नंबर दिला. नंबर पाहिल्यावरच काय होणार याची कल्पना आली. पण हा आयुष्याचा प्रश्न आहे. कुंडली बनवूनच उत्तर दिले पाहिजे. तसेच नंबर २४९ पेक्षा मोठा असल्याने कृष्णमूर्ती पद्धतीने न सोडवता, भाव-नवमांश पद्धतीने हा प्रश्न पहावा लागेल हे समजले.
आम्ही प्रश्नवेळेची रुलिंग कुंडली काढली जी खाली दिली आहे.
या कुंडलीत सप्तमस्थानाचा नवमांश स्वामी चंद्र आहे. चंद्र स्वत: मिथुनेत म्हणजे बुधाच्या द्विस्वभाव राशीत आहे. खरं तर उत्तर इथेच मिळाले आहे. तरी पुढे पाहू. चंद्र राहुच्या आर्द्रा नक्षत्रात आहे आणि राहु धनु या द्विस्वभाव राशीत. राहु केतुच्या मूळ नक्षत्रात आणि केतू नवमात मिथुन या द्विस्वभाव राशीत.
दैवाचे फासे कसे पडतात बघत रहा.
केतु मंगळाच्या मृग नक्षत्रात. मंगळ सप्तमात दिसत असला तरी फळे षष्ठाची देईल. म्हणजे मंगळ सहा, दोन सात.
राहु गुरूच्या राशीत गुरू स्वत: षष्ठात, तृतीयेश आणि षष्ठेश. गुरू रेवती या बुधाच्या नक्षत्रात. बुध स्वत: षष्ठात, नवमेश आणि व्ययेश.
केतु बुधाच्या राशीत म्हणून बुध ज्या स्थानांची फळे देईल त्या सर्व स्थानांची केतु फळे देईल. बुध वर पाहिल्याप्रमाणे स्वत: षष्ठात , नवमेश आणि व्ययेश. बुध स्वत:च्या रेवती नक्षत्रात आहे त्यामुळे तो त्याच्या उपनक्षत्रस्वामी गुरूची फळे देईल. गुरू स्वत: षष्ठात, तृतीयेश आणि षष्ठेश.
म्हणजे ती काही परत येणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ.
आम्ही सौरभला तसे सांगितले. जे आहे ते सांगावे. उगाच गोड गोड बोलून काहीतरी दिशाभूल करायची नाही. आता ती नाही येणार तर नाही येणार. आमच्या फटकळ उत्तराने तो अपसेट झाला. म्हणाला, " पंत, काही तोडगा?"
म्हटलं, " जी घटना घडणारच नाहीये, त्यासाठी कसला तोडगा. अभ्यास कर आता. पुरे झाली ही नाटकं."
काल रात्री सौरभने फोन केला होता त्याचा वडिलांसाठी अपॉईंटमेंट बुक करायला. आम्ही त्याला विचारले, " काय रे, कशी आहे तुझी मैत्रीण?" तेव्हा म्हणाला की, " सर्व संपलेलं आहे." म्हटलं, "बोलते तरी की नाही." तो म्हणाला, " काहीही संपर्क नाही."
आम्हाला अहमद फ़राज़ च्या ग़ज़लेतले शेर आठवले:-
सिलसिले तोड़ गया वो, सभी जाते जाते
वर्ना इतने तो मरासिम थे, कि आते-जाते
कितना आसॉं था, तेरे हिज्र में मरना जानॉं
फिरभी इक उम्र लगी, जान से जाते जाते
उसकी वो जाने, उसे पास-ए-वफ़ा, था कि न था
तुम ’फ़राज़’ अपनी तरफ़से तो, निभाते जाते.
आपला,
(फ़राज़चा दिवाना) धोंडोपंत