Sunday, January 8, 2012

पत्रिका जुळवितांना हे पाहिलं पाहिजे.....


|| श्री स्वामी समर्थ||
लोकहो,


काल राहुल एका मुलीची पत्रिका पत्रिकामेलनासाठी घेऊन आला. पारंपारिक दृष्टीने गुण वगैरे जमत होते. पण तरीही आम्ही त्याला " हिच्याशी विवाह करू नकोस" असे सांगितले. तसे आम्ही का सांगतोय याची कारणमीमांसा त्याला सांगितली. तशी प्रत्येकालाच सांगतो.


विवाहासाठी जे पारंपारिक पद्धतीने गुणमेलन केले जाते, त्याला काही अर्थ नाही, हे आम्ही अनेकदा या ब्लॉगावर लिहिले आहे, ते तुम्ही वाचलेही असेल. त्याचे कारण असे की, पारंपारिक गुणमेलन हे केवळ नक्षत्रावर आधारीत आहे. त्यात कुठेही वधुवराच्या पत्रिकांचा, त्यातील ग्रहयोगांचा, महादशांचा विचार नाही. त्यामुळे ते अपुरे आहे.


समजा, एखादा मुलगा तूळ रास विशाखा नक्षत्राचा असेल आणि वधु तूळ रास चित्रा नक्षत्राची असेल, तर त्यांचे साडेचौतीस गुण जमतात. छत्तीसपैकी साडेचौतीस गुण म्हणजे आनंदीआनंद म्हणायचा का? असं म्हणता येईल का, या मुलाने तूळ रास चित्रा नक्षत्राच्या कुठल्याही मुलीशी विवाह केला तरी त्याचा संसार सुखाचा होईल? असे कदापि होणार नाही कारण मुळात वधूच्या पत्रिकेत वैवाहिक सौख्य कितपत आहे, त्यावर त्याचे वैवाहिक जीवन अवलंबून असेल. 


जर त्या वधूला सहा, बारा आणि आठ या स्थानांच्या महादशा सुरू असतील, तर साडेचौतीस गुण जमूनही वैवाहिक सौख्याच्या बाबतीत निराशाच पदरी येईल.


त्यामुळे नुसत्या गुणांवर न जाता, समोरच्या व्यक्तिच्या पत्रिकेचा सखोल अभ्यास करूनच विवाह जमविले पाहिजेत. म्हणजेच सखोल पत्रिकामेलन केले पाहिजे. नुसते पंचागातल्या कोष्टकातले गुण पाहून काही उपयोग नाही.


काही लोक म्हणतात, "अहो विवाहाच्या आधी पत्रिका पाहिली होती मग घटस्फोट कसा झाला?" त्यावेळेस ते लोक वर लिहिलेला मुद्दा विसरतात. पत्रिका नुसत्या गुण पाहून कुठल्यातरी ज्योतिषाने जमविलेल्या असतात. त्या पत्रिकेच्या अंतरंगात कधी डोकावून पाहिलेलं नसतं. असो.


राहुल जी पत्रिका घेऊन आला, ती खाली दिली आहे. गोपनीयतेच्या कारणास्तव नाव, जन्मतपशील दिलेले नाहीत. शास्त्र समजण्यापुरती कुंडली दिली आहे.
या कुंडलीला सध्या राहुची महादशा सुरू आहे. राहु विवाहाच्या स्थानांचा चांगला कार्येश आहे. राहु स्वतः लाभात आहे. रविच्या नक्षत्रात आहे. रवि कुटुंबस्थानात आणि कुटुंबेश. राहु शुक्राच्या राशीत, शुक्र स्वतः तृतीयात असून चतुर्थेश आणि लाभेश आहे. राहु लाभेश शुक्राच्याच उपनक्षत्रात आहे. राहु दशा मे २०१८ पर्यंत आहे. या काळात हिचा विवाह होईल. राहु वैवाहिक सौख्य बिघडवणार्‍या ६/८/१२ या स्थानांचा कार्येश नाही. 


त्यामुळे मे २०१८ पर्यंत हिला उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.


मग विवाह करू नकोस असे का सांगितले?


जरा राहुच्या पुढचा महादशास्वामी बघा. मे २०१८ ला या कुंडलीला गुरूची महादशा सुरू होईल. गुरू स्वतः षष्ठात ठाण मांडून बसला आहे. गुरू स्वतः षष्ठेश आहे. त्यामुळे वैवाहिक सौख्य बिघडेल. ठीक आहे. पण गुरू शनिच्या माध्यमातून सप्तमस्थानाचाही कार्येश आहे ना? म्हणजे भांडत भांडत का होईना संसार होईल.
षष्ठ स्थानाचे कार्येश ग्रह कोण आहेत ते काढा म्हणजे यातली गोम समजेल.


गुरू षष्ठात आहे. षष्ठेश आहे. षष्ठात गुरू व्यतिरिक्त कुठलाही ग्रह नाही. गुरूच्या नक्षत्रात कुठलाही ग्रह नाही. त्यामुळे गुरू हा षष्ठस्थानाचा एकमेव बलवान कार्येश आहे. जेव्हा महादशास्वामी कुठल्याही स्थानाच्या मागच्या स्थानाचा एकमेव बलवान कार्येश असतो तेव्हा तो त्याच्या महादशेत त्याच्या पुढच्या स्थानाचे सुख देत नाही.


महादशास्वामी गुरू सर्वात बलवान फळे षष्ठस्थानाची देईल जे वैवाहिक सौख्याला तीव्र विरोधी स्थान आहे. आता सांगा, सहा वर्षाच्या संसारासाठी हिच्याशी विवाह करावा का?


पत्रिका जुळवितांना नीट चिकित्सा करून निर्णय दिला पाहिजे. नुसते गुण जमतात म्हणून काहीबाही सांगू नये. लोकांच्या आयुष्याशी खेळू नये.


या पत्रिकेत इतरही दोष आहेत. पंचमात मंगळ- हर्षल, मंगळ-केतु या युत्या संततीसौख्याला घातक आहेत. मूल होऊन जाण्याचा हा योग आहे. संततीचा कारक गुरू वक्री, तो ही वक्री नेपच्यूनच्या युतीत षष्ठात. तो नुसता वक्री आणि षष्ठात नाही तर तो मूळ नक्षत्रात आहे. संततीसौख्याच्या दृष्टीनेसुद्धा ही पत्रिका खूप बिघडली आहे.  तसेच कन्येचा शुक्र वक्री नेपच्यूनच्या केंद्रयोगात वगैरे. असो.


काय सांगू त्याला? कर लग्न हिच्याशी आणि आय घालून घे ?


आपला,
(सूक्ष्मदर्शी) धोंडोपंत


2 comments:

pradeep dongre said...

Excellent explanation!

AD said...

Excellent explanation!! Request you to aloso write in detail about "Shadashtak Yog" and how important they are while matching horoscopes.