Tuesday, February 21, 2012

शुक्र मंगळ षडाष्टक....


|| श्री स्वामी समर्थ||
लोकहो,


आज बरेच दिवसांनी अमावास्येच्या निमित्ताने लेख लिहिण्याचा योग आला. कार्यबाहुल्ल्यामुळे लेखनास वेळ कमी मिळतो, हे वास्तव आहे. एक लेख लिहायचा तर तो पाच मिनिटात लिहून होत नाही. कुंडल्या शोधायच्या, त्या फोटोशॉपमध्ये जेपीजी स्वरुपात रूपांतरीत करायच्या, त्या अंतर्जालावर चढवायच्या, त्याचे विवेचन करायचे, या गोष्टींसाठी वेळ लागतो. एखादी कविता किंवा रुबाई सहज जातायेता सुचते, ती लिहून फेसबुकावर टाकणे कमी कष्टाचे आणि अल्प वेळात होणारे आहे. लेखनासाठी विषय भरपूर आहेत. लेखनाची आवडही आहे. लेखनास प्रचंड लोकमान्यताही लाभली आहे. पण वेळेचा प्रश्न आहे. असो.


आज, दिनांक २३ फेब्रुवारी रोजी होणार्‍या, मंगळ-शुक्र षडाष्टकाबद्दल विचार मांडतो. कुंडलीतील ग्रहयोग हा कुंडलीचा आत्मा आहे असे आम्ही ज्योतिष शिकवतांना नेहमी म्हणतो. या योगांवर माणसाचे जीवन, आवडीनिवडी, त्याला लाभणारे सुख-दु:ख हे अवलंबून असतं. कुंडलीत एखाद्या स्थानाचा भावेश व कारकग्रह जर बिघडला असेल तर मुळातच त्या गोष्टीच्या सुखात उणेपणा येतो. महादशास्वामी कितीही चांगला असो. दुर्दैवाने कृष्णमूर्ती पद्धतीत ग्रहांच्या कारकत्वाला जे महत्त्व द्यायला पाहिजे ते दिले गेलेले नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे अनेक कृष्णमूर्तीसम्राट कारक ग्रहाचा विचार न करता बेधडकपणे भाकिते करतांना दिसतात. असो.

शुक्र या ग्रहाचा मुख्य संबंध भावना, प्रेम, विलास, चैन, मनोरंजन, कला, लैंगिक सुख या गोष्टींशी आहे. तर मंगळ हा उद्दाम, क्रौर्यप्रेरित, अहंमन्य, कलहप्रिय, बल आणि उर्जेचा पुरवठा करणारा, उष्ण प्रकृती, दुसर्‍यांवर हुकूमत गाजवणारा, लोकांना आपल्या तंत्राने वागायला लावणारा अशा गुणधर्माचा ग्रह आहे.


शुक्राशी मंगळाचा कुयोग असता शुक्राच्या कारकत्वावर मंगळाचा अशुभ प्रभाव पडतो. यात शुक्र प्रतियोग मंगळ, शुक्र केंद्रयोग मंगळ आणि शुक्र षडाष्टक मंगळ या तीन प्रमुख योगांचा समावेश आहे. शुक्र मंगळ युतीत देखील अशुभफळे मिळतात, पण जर ही युती सुस्थानी आणि राशीबली असेल तर शुक्राच्या चांगल्या गुणधर्मांचे उद्दीपनही मंगळ करतो.  संभोगाची अतिरिक्त आवड, प्रबळ कामवासना, हा दुर्गुण मानायचा का? आम्हांला तसे वाटत नाही. कुणाचे पोट दोन पोळ्यांनी भरते कुणाला चार लागतात. हे त्याचे उत्तर. त्यामुळे शुक्र मंगळ युती अशुभच असे गृहीत धरणे बरोबर नाही.


कर्क लग्नाला ( जरी ही लग्नरास मंगळाची नीच रास असली तरी) लाभातली शुक्र-मंगळ युती ही कलाप्रांतात आत्यंतिक चांगली फळे देते, असा आमचा व्यक्तिगत अनुभव आहे. हल्ली दूरदर्शन मालिकात चमकणार्‍या एका अभिनेत्रीची पत्रिका पाहून आम्ही तिला सांगितले होते की तुला या क्षेत्रात अतीउत्तम यश मिळेल. असो.

तर शुक्र मंगळ अशुभयोगात शुक्राचे कारकत्व मंगळाच्या अंमलाखाली आलेले दिसते. त्यामुळे कुठल्याही ऐहिक गोष्टीत 'असमाधान' ही प्रवृत्ती असते. कितीही मिळालं तरी समाधान नाही. कारण मंगळ ती हाव अधिकाधिक वाढवत असतो. एका अतीप्रतिष्ठित मॅनेजमेंट कन्सल्टंट कंपनीत फार मोठ्या हुद्द्यावर असणार्‍या मुलाच्या कुंडलीत हा योग आम्ही पाहिला. वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी त्याला ४२ लाखाचं पॅकेज आहे. तरी तो रडत होता. म्हणाला, "पंत, करिअरमध्ये काही बरोबर होत नाही आहे हो"


म्हटलं, " अरे भोसडीच्या, अठ्ठावीसाव्या वर्षी तुला ४२ लाख रुपये वर्षाला पगार आहे, तो काय कमी झाला?"


तो म्हणाला, " धोंडोपंत, तुम्हांला समजत नाहीये....  पगार मिळतोय पण इथे ग्रोथ नाहीये."


आता या माणसाला काय म्हणायचं ते तुम्ही ठरवा. म्हणजेच काय, तर कितीही मिळालं तरी समाधान नाही, तृप्ती नाही.


शुक्र मंगळाच्या कुठल्याही योगात चैनीकडे प्रवृत्ती असते. शुक्राच्या चैनी आणि विलासी स्वभावाला मंगळ चेतना देत असतो. विशेषतः असा षडाष्टक योग ७/१२ या स्थानातून होत असेल तर स्त्रियांचा शौकीन असतो. वृश्चिक लग्नाला लग्नेश व्ययात आणि शुक्र सप्तमात अंशात्मक षडाष्टकात असणारी एका माणसाची कुंडली आमच्याजवळ आहे. डान्सबारमध्ये हजारो रुपयांचा चुराडा दर महिन्याला करायचा. वर त्याचे जीवनविषयक तत्वज्ञान आम्हांला ऐकवायचा. 


आम्हाला म्हणायचा, " धोंडोपंत, मी दर महिन्याला तीनचार लाख रुपये व्यवसायात कमावतोय तर त्यातले दोन अडीच हजार पोरींवर आणि दारूवर  उडवले  बारमध्ये रोज, तर बिघडलं कुठे? आपको मालूम है कि हमारी तबियत तो इश्किया है " आम्ही भक्तीभावाने त्याला हात जोडायचो. :)

या योगात वैवाहिक सौख्यात समस्या निर्माण होतात. हे तुम्हांला बहुतेक कुंडल्यांमध्ये बघायला मिळेल. विवाह झाला आणि संसार सुरू असला, तरी त्यात सुख नसतं. कर्तव्य म्हणून एकमेकांबरोबर झोपायचं, यापलिकडे त्या संसारात काही आनंद नसतो. स्त्रियांच्या कुंडलीत हा योग पती प्रचंड डॉमिनेटिंग दाखवतो. पंचमस्थान जर अशा वेळेस बिघडले असेल तर स्वखुशीने म्हणा किंवा जोडीदाराच्या दबावामुळे म्हणा, विवाहपूर्व शरीरसंबंध येतात. यासाठी पंचमस्थान, पंचमेश बिघडले असले पाहिजे आणि शुक्रावर मंगळाबरोबर आणखी एखाद्या पापग्रहाचा कुयोग हवा.


यासंदर्भातली एक कुंडली खाली देत आहोत. गोपनीयतेच्या कारणास्तव जन्मतपशील दिलेले नाहीत. तसेच ग्रहांचे अंशही दिलेले नाहीत. होतं काय की, काही विद्वान ग्रहांच्या अंशांवरून जन्मतारीख काढतात आणि मग आपल्या कुटुंबातल्या कुणाच्या पत्रिकेत ते योग आहेत हे हुडकत बसतात. 


आता एखाद्या लग्नाला असा योग असेल तर महिनाभर त्या लग्नावर लाखो लोक जन्मतील, त्या सर्वांच्या पत्रिकेत तशीच घटना घडेल का? अजिबात नाही. कारण फलित बनतं ते एखाद्या खमंग खाद्यपदार्थसारखं बनतं. त्यात अनेक घटक असतात. चंद्राची भूमिका फलितात फार महत्त्वाची असते. तो दर सव्वादोन दिवसांनी बदलत असतो. त्यामुळे नुसतं मंगळापासून शुक्र सहा किंवा आठ स्थानात असला म्हणजे अमूक व्यक्तीच्या बाबतीत तसेच होईल असे समजणे हा मूर्खपणा आहे.


वरील पत्रिका पहा. या पत्रिकेत शुक्र मंगळ अंशात्मक षडाष्टक आहे. शुक्र मेष १२ आणि मंगळ कन्या १०. हा शुक्र मंगळ षडाष्टक योग इथे निर्माण झाला. शुक्र मंगळाच्या राशीत आहे. (महत्वाचा मुद्दा) आणि तो मंगळाच्या आठव्या दृष्टीत आला. शुक्र आणि पंचम स्थान कसे बिघडताय ते पहा. मजेशीर आहे. मुख्य योग झाला शुक्र मंगळ अंशात्मक षडाष्टक. त्यात शुक्र मंगळाच्या राशीत (प्रबळ कामवासना), मंगळाच्या दृष्टीत (मंगळाच्या पूर्ण प्रभावाखाली). 


आता सप्तमेश शनी तृतीयात वक्री आहे. ही पार्श्वभूमी शनीने तयार केली. चंद्र कुंडलीचा सप्तमेश शुक्र तो दशमात आला म्हणजे स्वस्थानापासून बारावा. इथे भाकीत टक्केवारीत पुढे सरकलं. पुढे शुक्रावर हर्षलचाही अंशात्मक षडाष्टक योग झाला. हर्षल वृश्चिकेत आठ अंशांवर वक्री आहे. हा अत्यंत महत्त्वाचा योग वैवाहिक सौख्याची हानी करणारा आणि विचित्र कामवासना देणारा.


म्हणजे मंगळाने शेकोटीसाठी लाकडं रचली, शनीने घासलेट ओतलं आणि हर्षलने काडी लावली. आता पुढचं बघू. फलित कसं तयार होत असतं ते पहा. मोठा इंटरेस्ट्रींग प्रकार आहे.


कर्क लग्नाच्या या कुंडलीला लग्नेश चंद्र पंचमात गेला. तो नुसता पंचमात गेला नाही. तर चंद्र हर्शलच्या युतीत पंचमात आला. चंद्र ४ अंशावर आणि वक्री हर्षल ८ अंशावर. कुंडलीचा पंचमेश मंगळ हा वक्री शनीने युक्त. पंचमस्थानावर, लग्नेश चंद्रावर वक्री शनीची तिसरी दृष्टी, जी अत्यंत अशुभ आहे ती. राशीकुंडलीचा पंचमेश गुरू आहे. तो ही वक्री आहे. आणि स्वस्थानापासून आठव्या स्थानी म्हणजे चतुर्थात पडला आहे. 


पंचमस्थान, कारक शुक्र, पंचमेश हे कसे बिघडत गेलेत ते पहा. पंचमातला हर्शल विचित्र स्वरूपाची प्रेमप्रकरणे दाखवतो हा ढोबळ नियम आहेच. फलित कसे रंग दाखवत जातं हे तुम्हांला कळले असेल.


बाय द वे, लग्नाआधी ऍबॉर्शन करायला लागलेल्या एका मुलीची ही कुंडली आहे. पुढे विवाह होऊनही वैवाहिक सौख्य शून्य. 


आपला,
(सूक्ष्मदर्शी) धोंडोपंत

  

2 comments:

Abhijit said...

Khoop divasanni apala lekh vachayala milala.Aamhi tumchya lekhanchi manapasun vat baghat asato.

Sandeep B said...

Namaskar Pant,

After many days you could find time to wrie such excellent article. It was a pleasure reading the same.

We always look forward to reading such informative articles on your blog.

Swaminchi Krupa sadaiv aapalywar raho...

Best Regards
Sandeep Bagalkar