Friday, February 24, 2012

तदेव लग्नं सुदिनं तदेव, ताराबलं चंद्रबलं तदेव.....

॥ श्री स्वामी समर्थ॥

लोकहो,


मुहूर्तांबद्दल इथे खुलासा करतो. विविध शुभकार्यासाठी मुहूर्त काढण्यासाठी जातक आमच्याकडे येतात. अर्थात त्यांना उत्तम मुहूर्त हवा असतो हे समजण्यासारखे आहे. पण अनेकजण " पंत, रविवारचा मुहूर्त काढा" " सकाळी ११ ते १२ मधला काढा" असा आग्रह धरतात. 


हे लक्षात घ्या की, प्रत्येक मुहूर्त काढतांना काही संकेत पाळायचे असतात. त्या आवश्यक बाबींची पूर्तता होत असेल तरच तो मुहूर्त घ्यावा. आम्ही कुठलेही काम काटेकोरपणे करतो. त्यामुळे तुमच्या सोयीचा मुहूर्त मिळेलच, याची हमी नाही. 


उदाहरणार्थ, विवाहमुहूर्त काढतांना जर कोणी ११ ते १२ मधला काढा. म्हणजे कसं फार लवकर होत नाही आणि जेवायला फार उशीरही होत नाही, असा आग्रह धरून बसला आणि त्या वेळेच्या कुंडलीत जर स्थिती चांगली नसेल तर तो मुहूर्त घेण्यात काय फायदा? 


आपण ज्या कार्यासाठी मुहूर्त काढतो, तेव्हा इतर सर्व बाबींबरोबरच अत्यंत महत्वाची बाब म्हणजे मुहूर्ताच्या वेळेच्या कुंडलीत त्या कार्याच्या मुख्य स्थानात मुहूर्ताच्या वेळेस पापग्रह असता कामा नयेत. जर विवाहमुहूर्ताच्या वेळेस जे लग्न सुरू असेल त्या लग्नाला जर सप्तमात राहु, शनी, मंगळासारखे ग्रह असतील तर त्या लग्नातला मुहूर्त घेऊ नये. आम्ही नाही घेत. तासभर उशीरा लग्न, मुंज झाली म्हणून काही फरक नाही पडत. 


आमच्या सौभाग्यवतींच्या कार्यालयातील एक युनियन लिडर त्याच्या मुलाच्या बारशाचा मुहूर्त काढायला आला होता. त्याला रविवारच पाहिजे होता. म्हणाला, रविवारच बघा म्हणजे कसं सर्वांना येता येतं. जणू काही आम्ही खांद्यावर टॉवेल ठेऊन मुहूर्त काढतोय. आम्ही त्याला सांगितले की त्याला हव्या असलेल्या महिन्यात रविवारी चांगला मुहूर्त नाहीये. पण त्याला रविवारच हवा होता. आम्ही नाही सांगितले. दुसर्‍या कुणाकडून मुहूर्त काढून रविवारी बारसे केले. त्या दिवशी मूळ नक्षत्र होतं. आयुष्यात एकदा होणारा नामकरण विधी चांगल्या नक्षत्रावर करावा ही जाण काही लोकांना नाही. 


गृहप्रवेशाचे मुहूर्त काढतांना हे अनुभव फार येतात. कुणाची बहीण परदेशातून आठ दिवसांसाठी येणार असते आणि त्यातलाच मुहूर्त त्यांना हवा असतो. कोणाचे आई वडील आठवडाभरात गावाला जाणार असतात. त्यापूर्वी त्याला गृहप्रवेश उरकायचा असतो. आयुष्यभराची कमाई ज्या घरासाठी लावतो, त्या घरात प्रवेश शुभदिवस बघून करायचा की कन्व्हिनियन्स बघून?


दुकानाचा मुहूर्त एकाला काढायचा होता म्हणून तो आमच्याकडे आला. त्याचे चुलत सासरे म्हणजे बायकोचे काका ज्योतिषी आहेत. त्यांनी त्याला एक दिवस काढून दिला होता. पण त्याचा आमच्यावर विश्वास जास्त म्हणून तो नेहमी आमच्याकडे येतो. त्याच्या चुलत सासर्‍याने दिलेला मुहूर्ताचा दिवस त्याने आम्हाला सांगितला आणि हा दिवस चालेल का म्हणून विचारले. आम्ही त्याची पत्रिका आणि त्या दिवशीची ग्रहस्थिती पाहिली. तेव्हा समजलं की सासरेबुवांनी साधारण दिनशुद्धी पाहून मुहूर्त ठोकलेला आहे. कारण त्या दिवशी त्याच्या जन्मकुंडलीत चंद्र अष्टमात होता. चंद्र वाईट स्थानात असतांना शुभ कार्ये करू नयेत. आम्ही डायरेक्ट काही बोलायच्या ऐवजी त्याला विचारले, " काय रे, हा मुहूर्त काढतांना त्या चुलत सासरेबुवांनी तुझी कुंडली पाहिली होती का? किंवा तुझी कुंडली त्यांना पाठ आहे का?" तो म्हणाला, " नाही. कुंडली वगैरे नव्हती पाहिली, त्यांनी पंचांग पाहून काढून दिला. " त्याच्या उत्तरावरून आम्ही काय ते समजलो.  


तर यापुढे लक्षात ठेवा, तुमच्या सोयीचाच मुहूर्त मिळाला पाहिजे, हा अट्टाहास नको. उत्तम मुहूर्तानुसार तुमची सोय तुम्ही ऍडजेस्ट करून घ्या. ते जास्त संयुक्तिक आहे. योग्य आहे. 


आपला,
(मुहूर्तमार्तंड) धोंडोपंत


  

2 comments:

Abhijit said...

पंत, आपले लेख facebook वर कसे share करू? facility enable कारून द्या म्हणजे आमच्या मित्र-परिवाराला ही माहिती मिळू शकेन.

Vinay said...

पण म्हणूनच का सगळं कार्य झाल्यावर म्हणतात का -- "तदेव लग्नं सुदिन तदेव, ताराबलं चंद्रबलं तदेव". म्हणजे ज्यावेळी काम केलं तीच वेळ चांगली (शुभ) आहे!