Tuesday, March 6, 2012

चक्षु:पूतं न्यसेत्पादम्‌ ......

|| श्री स्वामी समर्थ || 
 लोकहो, 

शास्त्रकारांनी सांगितले आहे 

चक्षु:पूतं न्यसेत्पादम्‌।

पाऊल टाकण्यापूर्वी डोळ्यांनी नीट बघून आणि काळजीपूर्वक पाऊल टाकावे. 

आणि विवाहाच्या बाबतीत पाऊल टाकतांना तर फारच काळजीपूर्वक पाऊल टाकावे. नाहीतर सप्तपदीची ती सात पाउले दु:ख आणि खिन्नतेच्या गावालाच घेऊन जातात. 


 नुकतेच पंधरा मिनिटांपूर्वी एक पत्रिकामेलन केले. त्यातल्या मुलाची ही कुंडली. पत्रिकामेलनाबद्दल 
आजपर्यंत आम्ही अनेक लेखांमधून आमचे विचार मांडले आहेत. आयुष्याचा जोडीदार निवडतांना तो पंचागात दिलेल्या कालबाह्य कोष्टकातील तथाकथित गुणांवरून न निवडता, समोरच्या व्यक्तीच्या पत्रिकेचा सखोल अभ्यास करूनच निवडणे अत्यंत आवश्यक आहे. 


होतं असं की, लोक गुणमेलन करून विवाहाला उभे राहतात. समजा एका नक्षत्राच्या मुलाचे दुसर्‍या नक्षत्राच्या मुलीशी ३० गुण जमत आहेत, तर त्या नक्षत्राच्या प्रत्येक मुलीशी ३० गुणच जमतील. याचा अर्थ त्या नक्षत्राची प्रत्येक मुलगी त्याची एकाच पात्रतेची सहचारिणी होईल काय? हे कदापि शक्य नाही. कारण प्रत्येकीची पत्रिका भिन्न आहे. 


त्यामुळे केवळ नक्षत्रावरून काढलेल्या गुणांचा अवलंब करून वैवाहिक सुख मिळेल किंवा कसे हे ठरवणे मूर्खपणाचे आहे. त्यासाठी पत्रिका सखोलपणे पाहिली पाहिजे म्हणजे सखोल पत्रिकामेलन केले पाहिजे. 


आत्ता ज्या मुलीने पत्रिकामेलनासाठी पत्रिका दिली होती, त्या मुलाची कुंडली खाली दिलेली आहे. गोपनीयतेच्या कारणास्तव जन्मतपशील लपवून ठेवले आहेत. 


वरील पत्रिकेला २०१० पासून शनीची महादशा सुरू आहे. शनीचे कार्येशत्व नीट पहा. 


शनी स्वतः सप्तमात आहे. तो तृतीयेश आणि चतुर्थेश आहे. तो चतुर्थातल्या रवीच्या नक्षत्रात आहे. रवी दशमेश आहे. शनीची दृष्टी ९/१/४ या स्थानांवर आहे. शनी कुठल्याही प्रकारे २/५/११ या संततीच्या स्थानांचा दूरान्वयेही कार्येश होत नाही. अर्थात पुढे १९ वर्ष याला संततीसौख्य नाही.


पत्रिकेचा नवमांश पंचमेश काय सांगतोय पहा. नवमांश पंचमेश मंगळ आहे. मंगळ स्वतः षष्ठात, लग्नेश आणि षष्ठेश. मंगळ हा ग्रह केतुच्या नक्षत्रात, केतू भाग्यात. केतु शनीच्या नक्षत्रात शनी ७/३/४. केतु चंद्राच्या राशीत. चंद्र स्वतः तृतीयात व नवमेश. चंद्र पुन्हा मंगळाच्याच नक्षत्रात. मंगळाची दृष्टी ९/१२/१. म्हणजे याच्या नशिबात संततीसौख्य नाहीच.


कारक गुरू पहा. कारक गुरू स्वतः धनात आहे. तो आहे मूळ नक्षत्रात आणि शनीच्या षडाष्टकात. 


काय सांगू तिला? कर याच्याशी लग्न? आम्ही तिला वर उल्लेख केलेल्या सर्व बाबी समजावून दिल्या. तिला ज्योतिष कळतं. त्यामुळे तिला ते पटलं. ती म्हणाली,


" मला कुंडली पाहिल्यावर असं काहीतरी असेल हे जाणवलं होतचं. पण तुमच्याकडून खात्री केलेली बरी. " 


पत्रिका जुळवतांना या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. उगाच उडत उडत काहीतरी बघायचं आणि त्या गुणमेलनांच्या कोष्टकावरून काहीतरी विपर्यस्त अर्थ काढून लोकांचे विवाह लावून द्यायचे, याला काही अर्थ नाही. असो. 


आपला, 
(काटेकोर) धोंडोपंत

2 comments:

Abhijit said...

पंत, पंचमातील शुक्र शनीच्या नक्षत्रात आहे. मग "शनी कुठल्याही प्रकारे २/५/११ या संततीच्या स्थानांचा दूरान्वयेही कार्येश होत नाही." असं का बर ? या विषयी सांगाल का ?

AJ said...

Interesting Blog. Ya aadhi jyotish wishayi blog MI tari wachla navta.

AJ
http://ajstates.blogspot.com