Wednesday, April 18, 2012

शकुन अपशकुन........


|| श्री स्वामी समर्थ||
लोकहो,


आज जवळजवळ महिनाभराने ब्लॉगावर लेख लिहीत आहोत. दरम्यानच्या काळात संगणकाची समस्या होती. कामाचे प्रेशर, घरातल्या अडचणी, मुलांच्या परीक्षा वगैरे अनेक गोष्टींकडे लक्ष पुरवावे लागल्यामुळे लेखनासाठी उसंत मिळाली नव्हती. फेसबुकावर एक दोन मिनिटात काही मजकूर लिहिण्यापलिकडे बाकी काही लेखन हातून झाले नाही.


दरम्यानच्या काळात अनेकांनी नेहमीप्रमाणे आग्रह, नाराजी व्यक्त करून आम्हांला लेखनासाठी उद्युक्त केले. तो त्यांचा आमच्यावरील स्नेह आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. तसेच फोटोशॉप शिवाय कुंडल्या कशा अपलोड करता येतील याबद्दल आमचे जातक श्री. विक्रम बापट यांनी चांगले मार्गदर्शन केले. विक्रमचेही आभार.


आज गुरूच्या नक्षत्रावर लेखन सुरू करायचे, असे ठरविले होते. आत्ता रात्रीचे पावणेतीन वाजले आहेत. तरीही मॅच पाहून, त्यानंतर काम संपवून आत्ता लिहिण्यासाठी बसलो आहोत. जो वादा किया वो......... निभाना पडेगा...


आत्ता कुंडली वगैरे काही देत नाही. सई कुंडलीसाठी हटून बसलेय. ती उद्या परवा देऊ. आत्ता गेल्या काही दिवसातील शकुनांबद्दलचे काही जबरदस्त अनुभव सांगतो.


१) गेल्या रविवारी सकाळी श्री. प्रधान प्रभात पोल्ट्रीच्या दुकानाबाहेर भेटले. ते कोंबडी घ्यायला तिथे आले होते. ते म्हणाले, "पंत तुम्ही इथेच उभं राहून माझ्या मेहुणीच्या घराविषयी भाकीत केलं होतं ते आठवताय का?" प्रश्न अनपेक्षित होता.


प्रधानांची मेहुणी कोण हा विचार करत असतांना तेच म्हणाले, " अहो ठाण्याचे देशपांडे. त्यांना भाड्याचं घर घ्यायचं होतं." मग आमची ट्यूब पेटली. प्रधानांनी ही गोष्ट आम्हांला सांगितली होती. पण कुंडली वगैरे बनविण्यापूर्वीच त्या जागेचा सौदा देशपांड्यांनी केला होता. डिपॉझिट आणि अकरा महिन्याचे भाडे मालकाला दिले होते. नशीब जागा विकत नव्हती घेतली. तरीही सौदा केल्यावर काय सांगणार? पण तरी प्रधानांनी विचारले की, "लाभेल ना ती जागा त्यांना?"


त्या प्रभात ब्रॉयलर्सच्या दुकानाच्या बाजूला त्या इमारतीचा जिना आहे. तिथे उभे राहून आम्ही प्रधानांसोबत बोलत होतो. एवढ्यात वरून एक मोठे जळमट आमच्या बाजूला पडले. ते समोरून खाली येत असतांना आम्ही पाहिले आणि ते अंगावर येऊ नये म्हणून बाजूला सरकलो. आम्ही प्रधानांना सांगितले की,


" कुंडली तर बनवलेली नाही आणि बनविण्याची वेळ टळून गेलेय कारण तुम्ही म्हणालात की त्यांचं डिलिंग झालं आहे. पण शकुनावरून सांगायचे तर देशपांड्यांना ही जागा लाभणार नाही." असे म्हणून आम्ही त्या जळमटाकडे बोट दाखवले.


अगदी तसेच झाले. देशपांडे कुटुंब तिथे अकरा महिन्यांसाठी स्थलांतरीत झाले. पण तिथे गेल्यावर त्यांना कळले की त्या जागेत भयंकर लिकेज आहे. साफसफाई काही नाही. इमारतीच्या मागच्या बाजूस कचर्‍याचा ढिगारा जमा झाला आहे. त्यात गटारे वहात आहेत. सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे आणि तिथे नेमकी त्यांच्या स्वयंपाकघराची खिडकी आहे. त्या खिडकीतून सर्व दुर्गंधी घरात येते. आता ते जागा बदलायच्या तयारीत आहेत.


२) भोसलेच्या वडापावच्या गाडीच्या बाजूला एक चहावाला आहे. आम्ही मठातून दर्शन घेऊन घरी जात असता, तिथे आम्हाला सावंतांनी गाठलं. काय, कसं काय झालं. म्हणाले, " चला, भोसलेकडे वडापाव खाऊ."  


म्हटलं, "आज मंगळवार आहे. उपवास." मग म्हणाले, "चहा तरी घेऊ." म्हणून चहा घेतला. 


तिथे रस्त्यावर उभ राहून आम्ही चहा घेत होतो. सावंतांनी त्यांच्या मुलाविषयी सांगितलं. त्याच्या कंपनीत काही युनियनचे प्रॉब्लेम्स झालेत आणि सावंतांचा मुलगा त्या युनियन अ‍ॅक्टिव्हिटिजमध्ये असल्यामुळे मॅनेजमेंट त्याला त्रास देते आहे. सध्या एक प्रकरण त्याच्यावर येऊन शेकताय. काय होईल? हा सावंतांचा प्रश्न. एवढ्यात तो चहावाला भट एकाला चहाचा ग्लास देत असतांना त्या माणसाच्या हातून तो खाली पडून फुटला. 


आम्ही सावंतांना म्हटले, " संदीपचे काही खरे नाही. त्याला सांभाळून रहायला सांगा. नोकरी जाईल."


पुढे दोन आठवड्यात कंपनीने त्याला एक तर राजीखुशीने राजीनामा देऊन जा नाहीतर काढून टाकू असे सांगितले. राजीनामा देणे हाच चांगला पर्याय होता. फुटलेल्या ग्लासाने बरेच काही सांगितले होते.


३) शेअरबाजारात सौदे करणारा प्रसन्न घाटपांडे काहीतरी च्युत्यासारखे सौदे करून मग आम्हाला काय होईल असे अनेकदा विचारतो. गेल्या महिन्यात त्याने फ्युचर्समध्ये मोठी पोझिशन घेतली होती. संध्याकाळी भटासमोरच्या वडाच्या पारावर बसून ते सांगत होता. 


तेवढ्यात आमचे एक जातक आणि त्यांची बायको तिथे आले. आम्ही उठून उभे राहिलो. त्यांनी संततीच्या प्रश्नासाठी आमच्याशी संपर्क साधला होता. इथे कुठे? विचारताच ते म्हणाले, 


"तुम्हांलाच फोन करणार होतो. आत्ताच जाऊन आलो. ही म्हणाली घरी गेलो की देवाला नमस्कार करुन लगेच पंतांना फोन करून सांगा." असे म्हणून त्यांनी वर मॅटर्निटी होम कडे बोट दाखवले. 


त्यांच्या बायकोची सोनोग्राफी केली होती आणि ती प्रेगनन्ट असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. आम्ही त्या दोघांचे अभिनंदन केले. तिला तीन महिने काळजी घ्यायला सांगितले. त्या गृहस्थांना गुरूचरित्राचे पारायण सुरू करा, असे म्हणालो.


ते गेल्यावर घाटपांड्याला म्हटलं, " तू जाम कमावणार या सौद्यात. ऐकलसं ना आमचं काय बोलणं झालं ते?" 


तो "हो" म्हणाला. म्हटलं, " हा शकुन समज."


पोझिशन स्क्वेअर ऑफ झाल्यावर घाटपांड्याचा फोन आला. म्हणाला, "पंत, तुम्ही त्या दिवशी सांगितलेलं परफेक्ट  निघालं. आत्ताच सर्व पोझिशन स्क्वेअर ऑफ केली. तुम्हाला ब्लॅक लेबलने अंघोळ घालतो. "


ब्लॅक लेबलने अंघोळ घालतो म्हणाला म्हणजे चार पाच पेट्या तरी कमवल्या असतील.


असे हे शकुन. 


आपला,
(विचक्षण) धोंडोपंत 
7 comments:

Saee Keskar said...

सई कुंडलीसाठी हटून बसलेय. ती उद्या परवा देऊ.

haa haa . :)
Mast lekh ahe. :D

Soham said...

ब्लॅक लेबलने अंघोळ घालतो म्हणाला म्हणजे चार पाच पेट्या तरी कमवल्या असतील

>> हे आवडल !! :)

लेख नेहमीप्रमाणेच छान !!!

धोंडोपंत said...

सये,

तू लैच सतावतेस लेखनावरून. म्हणून उल्लेख केला.:):)

लिहितो लवकरच. बर्‍याच नमुनेदार कुंडल्या आहेत.

धन्यवाद

धोंडोपंत

धोंडोपंत said...

सोहम,

धन्यवाद आणि शुभेच्छा.

धोंडोपंत

Abhijit said...

Khoop divasanni lekh milala, anand vatala

sheetal shinde said...

Sahi pant

Evdhya divsaani blog war lekh pahun khup bara watla .

Tumcha blog wachne mhanje ek vyasan aahe ...je tumhi amha saglyana laavlay...

lekh nehmi pramane mastach!!!!

IPL nantarach free honar asa distay tyamule je vicharaycha aahe te kadhi vicharu te tumhich saanga...karan te agdich hard & fast nahiye ani asa pan mala ghait kahich vicharaycha nahiye.

Problem khup motha pan aahe ani agdich chhota pan aahe ..

free zalyawar blog war liha mhanje amhala kalel. toparyant "kal kadhto"

Aapli vishwasu
sheetal

Vikram Bapat said...

अहो त्या फोटोशॉप च काही विशेष नाही आणि मी काहीच भारी सांगितलं नाही - साधचं होतं अगदी ते !