Monday, May 14, 2012

शकुन - अपशकुन


|| श्री स्वामी समर्थ||


लोकहो,


शकुनांवरून केलेल्या भाकितांबद्दलचे अजून काही अनुभव.


१) कीर्तिकर मार्केट नावाची एक मंडई दादरमध्ये कबुतरखान्याजवळ आहे. तिथे अनेक धार्मिक वस्तूंची दुकाने आहेत. त्यामुळे आमचं तिथे वारंवार जाणंयेणं असतं. तिथे गांधी नावाच्या गृहस्थांचे दुकान आहे. त्यांच्याकडे गेल्या महिन्यात गेलो असतांना, समोरून कसबेकर नावाचे आमचे जातक आले. त्या मार्केटमधले रस्ते इतके अरूंद आहेत की दोन माणस तिथून पास होऊ शकत नाहीत. बाजूला होऊन समोरच्याला जागा द्यावी लागते. तर कसबेकर समोर आले आणि त्यांच्या मुलीच्या विवाहाबद्दलचा विषय काढला.


आम्ही त्यांच्या मुलीचे एक पत्रिकामेलन करून त्यांना दिले होते आणि या मुलाशी तिचे लग्न करून द्या, असे म्हणालो होतो. कसबेकरांना तेव्हा आनंद झाला, पण दोन तीन वेळा मुलगा मुलीला भेटूनही त्यांच्याकडून ठोस होकार आला नव्हता. त्याबद्दल ते सांगत होते. तेवढ्यात गांधींच्या दुकानाशी आमच्या बाजूला एक जोडपं आलं आणि त्यांनी मुंडावळ्या मागितल्या.


आम्ही कसबेकरांना म्हटलं, " हा बघा शकुन. त्याचा होकार येणार. भानचोद जातो कुठे?" आम्ही जरा मोठ्याने बोललो, ते त्या जोडप्याला ऐकू गेलं आणि ते आमच्याकडे पहायला लागले. कसबेकरांना जरा ओशाळल्यासारखं झालं. 


आम्ही म्हटलं, " कसबेकर, आपण बोलतोय. आम्ही जगात सगळीकडे असेच बोलतो. त्यांना विचित्र वाटत असेल त्यामु़ळे ते बघताहेत. तर त्यांना बघू दे. तुम्ही अपसेट कशाला होताय?


दोन दिवसांनी कसबेकरांचा फोन आला. म्हणाले, 


"पंत, तुमचा तो परवाचा "भानचोद"...........  आत्ताच त्याचा होकार आलाय. त्याचा फोन ठेवला आणि तुम्हाला फोन केलाय. मानलं बुवा तुमच्या तर्कबुद्धीला आणि शकुनाला."
२) आता हा दुसरा थरारक अनुभव. 


माहीमच्या गजानन महाराजांच्या मठात आम्ही त्या भागात गेलो असतांना नेहमी जातो. तिथे गेलो असतांना श्री. साळुंखे भेटले. साळुंख्यांच्या घराण्यात गेले तीन पिढ्या महाराजांची सेवा आहे. साळुंख्यांची पिढी ही तिसरी पिढी. दर्शन घेऊन बाहेर येत असता, त्यांनी त्यांच्या जुन्या क्वालीसचा विषय काढला. 


गेले सहा महिने ते ती गाडी विकायच्या खटपटीत आहेत पण क्वालिसचे उत्पादन बंद झाल्यामुळे जुन्या क्वालिस गाड्यांना गिर्‍हाईक येत नाही. अशा वेळेस फार पंचाईत होते. ही गाडी विकायला साळुंख्यांनी जंग जंग पछाडलं. माहिम, दादर, प्रभादेवी मधल्या बहुतेक गॅरेजवाल्यांना माहित आहे की, ही गाडी विकायला आहे. पण एक गिर्‍हाईक फिरकेल तर शपथ. जे यायचे ते एवढा भाव पाडून सांगायचे की, भंगारवर विकली तरी परवडेल असं वाटावं.


आम्ही मंदिराच्या बाहेर येतांना पायर्‍या चढत होतो तेवढ्यात एका मुलाने शेगांव यात्रेचे एक पॅम्प्लेट आमच्या हातात दिले. त्यात शेगांव, नागझरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर अशा एका यात्रा कंपनीच्या धार्मिक यात्रेची जाहिरात होती.


आम्ही ते पॅम्ल्पेट हातात घेतल्यावर साळुंख्यांना  म्हटले, "गाडी घेऊन शेगांवला जा." 


त्यांना कळेना, आम्ही असे का सांगतोय? ते आहेत चाळीसगावचे. ते म्हणाले, "एवढ्या उन्हाळ्यात जायचं जरा त्रासदायक आहे. पण गावालाही जाऊन होईल. तुम्ही म्हणताय तसे करतो."


साळुंखे शेगांवला गेले आणि तिथे चाळीसगावचे त्यांच्या ओळखीचे एक गृहस्थ भेटले. महाराजांचे दर्शन घेऊन निघतांना, तुम्ही कुठे जाणार, कसे जाणार वगैरे चौकशा झाल्या. त्या गृहस्थांनाही चाळीसगांवलाच जायचे होते. म्हणून दोघेही त्यांच्याच गाडीने चाळीसगावकडे निघाले. रस्त्यात त्या गृहस्थांना सेकंड हॅन्ड गाडी घ्यायचेय, असे ते म्हणाले. 


साळुंखे म्हणाले, " ही घ्या. मला विकायची आहे."


ते गृहस्थ म्हणाले, " मी तुम्हांला हेच विचारणार होतो की ही गाडी तुम्ही विकणार आहात का? आता 
महाराजांनीच तुमची भेट घडवून आणलेय आणि या गाडीतून पाठवलाय त्यामुळे तुम्हांलाच विचारायचं असं ठरवलं होतं."


सौदा ठरला. साळुंखे गाडी विकायची म्हणून शेगांवला गेले आणि येतांना गाडी विकून, पैसे घेऊन ट्रेनने परतले.


महाराजांच्या लीला अगाध आहेत, हेच खरे.


आपला,
(चकित) धोंडोपंत 

  

1 comment:

प्रसाद कुलकर्णी said...

पंत तुमचे शकून अपशकूनाचे लेख म्हणजे आमच्यासारख्या ज्योतिष्य न कळणार्‍यांसाठी ट्वेंटी-ट्वेंटीची मॅच बघितल्यासारखे वाटते. फलंदाजाने ८-१० बॉल मधे फडाफड फोर आणि सिक्स मारून ३०-४० रन मारल्यासारखे वाटते.

अर्थात पत्रिका उलगडून सांगता तेंव्हा द्रविडच्या घोटीव, तंत्रशुद्ध फटक्यांनी सजलेले कसोटीतील द्विशतक पाहिल्याचा आनंद मिळतो.