Wednesday, June 27, 2012

चंद्रभमण - शंकानिरसन
|| श्री स्वामी समर्थ||
लोकहो,


मिथिलाताईंनी फेसबुकावर आम्हांला चंद्रभ्रमणाबद्दल खालील प्रश्न विचारला. हा प्रश्न प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे. अनेकांना हा प्रश्न पडला असेल.


पंत नमस्कार..!

माझ्या मनात ज्योतिषविषयक काही प्रश्न आहेत...हे प्रश्न कदाचित अनेकांना पडत असतील, म्हणून इथे भिंतीवर विचारते आहे...ब्लॉगवर उत्तर द्यावे ही करबद्ध प्रार्थना..!

चंद्राच्या मासिक भ्रमणादरम्यान तो जेव्हा आपल्या राशीत येतो तेव्हा आपल्यावर त्याचा परिणाम होतो का? काय होतो? ....अनेकवेळा चिडचिड करणाऱ्या माणसाला, "याच्या राशीत आज चंद्र आहे बहुतेक" असे म्हंटले जाते...! म्हणजे चंद्र राशीत असला की माणूस चिडचिडा होतो का? त्या दिवशी सगळी कामे बिघडतात का?

आणि असा परिणाम जगातली सगळी माणसे भागिले बारा एवढ्या सगळ्या लोकांवर सारखाच होतो का? की कुंडलीतले चंद्राचे स्थानही यात आपली भूमिका बजावत असते?

पंत, कदाचित तुम्ही या विषयावर तुमच्या ब्लॉगमधे लिहिले असेल, तसे असले तर प्लीज मला कळवाल का? कदाचित माझा हा प्रश्न तुम्हाला आगाऊपणाचा वाटेल, तसा वाटला तर कृपया हा आगाऊपणा नसून अज्ञान आहे असे समजावे.

याची उत्तरे मिळाली तर बरं वाटेल...! महिन्याचे पान उलटताना नेमके माझ्या राशीत चंद्र असणारे अडीच दिवस शोधून त्यांचा धसका घेण्याचे तरी कमी होईल...!

आपली नम्र,
मिथिलाताईमुळात भारतात प्रत्येक गोष्टीबद्दल गैरसमज आहेत. त्यात ज्योतिषशास्त्रात तर विचारायची सोय नाही. त्यातील अनेक गैरसमज कुडमुड्या ज्योतिषांनीच वाढवलेले आहेत. उदाहरणार्थ, कालसर्पयोग, अर्धकालसर्पयोग, विषकन्या योग.... एक ना अनेक उदाहरणे देता येतील. पंचांगातून खरं तर अशा गोष्टी छापल्या नाही पाहिजेत.


आश्लेषा नक्षत्रावर त्यातल्या त्यात चतुर्थ चरणावर जन्मलेली मुलगी म्हणे विषकन्या असते. सासूला मारक ठरते, वगैरे वगैरे. असल्या गोष्टी पंचांगात छापल्यामुळे, आश्लेषा नक्षत्र असलेल्या मुलीची पत्रिका विवाहासाठी अनेकजण हातात धरत नाहीत. हे चुकीचे आहे. अनेक चांगल्या मुलींचे विवाह या खुळचटपणामुळे अडल्याचे आम्ही रोज पाहतो आहोत. का? तर आश्लेषा नक्षत्र आहे. विषकन्या ना? 


वास्तविक, आश्लेषा नक्षत्राची स्त्री, उत्तम संसार करणारी असते. पतीला सर्व सुखे देणारी असते. संसारासाठी खपणारी असते. तिचे अवयव जरी काही प्रमाणात बेढब असले, तरी नागीण संभोगाच्या वेळेस नागाला जसा खेळवते, तसा पतीला बिछान्यात तासन्‌तास खेळवणारी असते. संसार चांगला होण्यासाठी पतीला अडीअडचणीच्या काळात उत्तम साथ देणारी असते.     


तर विवाहेच्छुक मुलांना सांगायची गोष्ट ही की, विषकन्या समजून आश्लेषा नक्षत्राच्या मुली नाकारू नका. तिच्यामुळे तुमची आई मरणार वगैरे नाही. प्रत्येकजण आपला आयुष्ययोग घेऊन आलेला असतो. तो तुम्ही लग्न करून बदलत नाही. जर आश्लेषा नक्षत्राच्या मुलीशी लग्न करून, मातेला मारक होणार असेल, तर इतर कुठल्या नक्षत्राच्या मुलीशी लग्न केल्यास आईचे आयुष्य वाढलेही पाहिजे. असे होईल काय? आई मरायला टेकलेय, आणा एखाद्या विशिष्ट नक्षत्राची मुलगी आणि करा विवाह. की आई झाली लगेच ठणठणीत. असे होऊ शकेल काय? अजिबात होणार नाही. तसेच, आश्लेषा नक्षत्राच्या मुलीशी विवाह केल्यामुळे, तुमच्या आईचे आयुष्य कमी देखिल होणार नाही. म्हातारीची विकेट पडायचेय तेव्हाच पडणार. असो. 


प्रत्येक लेखातून प्रबोधन व्हावं, चुकीच्या समजुती दूर व्हाव्यात हा हेतू असतो, म्हणून एवढं सांगितलं.असो. 


आता, मिथिलाताईंच्या प्रश्नाचे उत्तर देतो. ते असे....


ग्रह जी फळे देतात, ती प्रामुख्याने स्थानाची फळे देतात. ग्रहगोचरीमध्ये ग्रह कुठल्या स्थानात आणि जन्मकुंडलीतील कुठल्या ग्रहाच्या योगात येतो, त्यावरून त्याची फळे ठरत असतात.


जन्मकुंडलीतील चंद्रावरून गोचरीचे चंद्रभ्रमण होणे यात काहीही अशुभ नाही, हे लक्षात घ्या. उलट जेव्हा तो जन्मराशीत आपल्या जन्मनक्षत्रात येतो, तो दिवस अनेक दृष्टीने त्या व्यक्तीला लाभदायक असतो, असा अनुभव आहे. 


हा अनुभव कुणालाही दर महिन्याला घेता येईल. कारण साडेसत्तावीस दिवसात चंद्र राशीचक्राचे एक भ्रमण पूर्ण करतो. पत्रिकेत तुमचा चंद्र ज्या नक्षत्रात आहे, त्या नक्षत्रात गोचरीचा चंद्र येईल तेव्हा महत्वाची कामे करा. अनेक गोष्टीत तो दिवस यशदायी असेल.


चंद्रभ्रमणाचा बरा-वाईट परिणाम कसा होतो? तर चंद्र जेव्हा कुंडलीतील सहा, आठ आणि बारा या स्थानातून जात असतो, ते दिवस त्रासदायक असतात. कारण ही तीन स्थाने मुळात वाईट आहेत. यांना त्रिकस्थाने म्हणतात. या स्थानातील चंद्रभ्रमण, मानसिक क्लेश, वैर, पैशाची उधळपट्टी, मनस्ताप, नुकसान, तब्येतीच्या तक्रारी असली फळे देते. त्यामुळे शक्यतो या स्थानात चंद्र असता महत्वाच्या भेटी, चर्चा, करार, नवीन प्रकल्पांची, कामाची सुरूवात अशा गोष्टी करू नयेत.


चंद्र जेव्हा पत्रिकेतील लग्न (प्रथमस्थान), द्वितीय (धनस्थान), तृतीयस्थान, पंचमस्थान, नवमस्थान, दशमस्थान, लाभस्थान या स्थानातून जात असेल तेव्हा महत्वाच्या गोष्टी कराव्यात.


त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या पेशानुसार जी यशदायी स्थाने आहेत किंवा कारक स्थाने आहेत, त्यातील चंद्रभमण पहावे. उदाहरणार्थ, मिथिलाताई लेखिका आहेत. त्यांना एखाद्या नवीन सिरीयलच्या पटकथा लेखनाला सुरूवात करायची असेल तर वर उल्लेख केलेल्या स्थानांबरोबर चंद्राचे तृतीयस्थानातील भ्रमण लाभदायी ठरेल. कारण तृतीय हे लेखनाचे स्थान आहे.


एखादा इंटिरियर डेकोरेशन किंवा सिव्हिल इंजिनियरिंग किंवा आर्किटेक्टचे काम करत असेल तर त्याला चतुर्थस्थानातील चंद्रभ्रमण फायदेशीर होईल.


अभिनय, कलाक्षेत्र, मॉडेलिंग यात काम करणार्‍यांना पंचमस्थान महत्त्वाचे आहे. एखादा टुरीझमच्या क्षेत्रात असेल तर त्याला  नवमस्थानातून चंद्र जात असतांना परदेशातल्या ट्रिपची सुरूवात करता येईल.


एखादा इन्व्हेस्टमेंट, फायनान्सच्या व्यवसायात असेल तर द्वितीयस्थानातील चंद्रभ्रमणावर नवीन प्रपोझल हातात घेता येईल.


एखादा इन्शुरन्सच्या व्यवसायात असेल आणि एखाद्या मोठ्या क्लायंटला, मोठ्या पॉलिसिसाठी भेटायचे असेल तर अष्टमात चंद्र असतांना त्याने जरूर क्लायंटला भेटावे. अष्टम हे इतर गोष्टींसाठी नकारात्मक स्थान असले, तरी त्याच्या धंद्यासाठी ते सर्वात महत्त्वाचे आणि सकारात्मक स्थान आहे. त्याला पॉलिसी मिळणार.


तसेच आपल्याला एखाद्याकडून पैसे येणे बाकी असेल. तर त्या पैशाच्या रिकव्हरीसाठी, षष्ठस्थान हे सर्वात महत्वाचे स्थान आहे. कारण ते समोरच्या व्यक्तीचे व्ययस्थान आहे. त्याचा व्यय होईल तेव्हा आपल्याला पैसे मिळणार. त्यामुळे षष्ठात चंद्र असतांना, रिकव्हरीची कामे करावीत. त्या कामासाठी षष्ठस्थान नकारात्मक समजू नये. उलट ते आत्यंतिक सकारात्मक आहे.


मिथिलाताईंनी उपस्थित केलेला अजून एक मुद्दा. जगातल्या सर्व लोकांना बारा भागात (राशीत) विभागल्यामुळे सर्वांना फळे सारखी मिळतील का? नाही मिळणार. का? कारण प्रत्येकाच्या कुंडलीतील ग्रहस्थिती वेगळी आहे. एक उदाहरण घेऊ.


समजा, एखाद्याच्या दशमातून चंद्र जातोय. म्हणजे त्या कुंडल्यांना व्यवसाय, चरितार्थाच्या गोष्टी, मानमरातब या सर्वांना अनुकूल स्थानातून चंद्र जातोय. जगातल्या १/१२ लोकांच्या कुंडलीत त्या दिवशी दशमात चंद्र आहे. म्हणजे त्या लग्नाच्या प्रत्येकाला सारखीच अनुकूलता मिळेल का? याचे उत्तर नाही हे आहे. 


ज्याच्या कुंडलीत दशमात गुरू, शुक्र असे शुभग्रह असतील, त्याला तो दिवस बराच अनुकूल असेल. पण समजा एखाद्याच्या कुंडलीत राहु, मंगळ, शनी असले ग्रह असतील, तर त्यावरून होणारे चंद्राचे भ्रमण, तेवढी अनुकूल फळे देणार नाही.


तसेच चंद्राचे त्या दिवशी गोचरग्रहांशी जे शुभाशुभ योग असतील त्यानुसार फळात बदल होतील. त्या दिवशी चंद्र जर प्रमुख पापग्रहांच्या कुयोगात असेल तर तो फार चांगली फळे देऊ शकणार नाही.


त्यामुळे, तुमच्या राशीत चंद्र आला तर मुळीच निराश वगैरे होऊ नका. उलट वर सांगितल्याप्रमाणे त्या राशीतल्या तुमच्या जन्मनक्षत्रावर महत्त्वाच्या कामांची आखणी आधीच करून ठेवा.


आपला,
(योजनाबद्ध) धोंडोपंत 


3 comments:

sheetal shinde said...

Pant

Chaan mahiti .....
pan.............

Aaplya rashit chandra kadhi aahe ani to kuthlya sthanawar aahe he kasa kalte.tysathi kahi table aahe ka .

Pls calrify karal ka ???????

aapli vishwasu
Sheetal Shinde

प्रसाद कुलकर्णी said...

ऑफिसमधून सगळे ब्लॉग बन्द आहेत त्यामुळे आज बर्‍याच दिवसांनी ब्लोगवर आलो... बरेच नविन लेख आहेत. कुठला वाचू आणि कुठला नको असे झालय.
अगदी पकवान्नांचे ताट वाढून ठेवलय आणि कुठल्या पदार्था पासून सुरवात करावी असा प्रश्न पडल्यागत झालय!

avi said...

मूळ नक्षत्र बद्दल काहीतरी लिहा .... ही विनती ... मूळ नक्षत्रावर जन्मासंबंधी खूप वाईट मते आहेत