Friday, August 17, 2012

शकुन अपशकुन.......

|| श्री स्वामी समर्थ||

लोकहो,

शकुन हा सर्वसामान्य जातकांचा आणि वाचकांचा फार जिव्हाळ्याचा विषय आहे. शकुनांवरून केलेलं भविष्यकथन सहसा चुकत नाही. शकुन हे दैवी संकेत असतात. एखाद्या घटनेबद्दल विचार करतांना निसर्ग तुम्हांला काही संकेत देत असतो. काहीतरी सुचवत असतो. त्याचे योग्य अर्थ जर काढता आला, तर प्रचंड दैवी मार्गदर्शन मिळतं. 

शकुनांबद्दल बरेच लेख आम्ही लिहिले आहेत. गेल्या काही महिन्यात आलेल्या अनुभवांवर हा लेख.

१) रुपारेल कॉलेजात मुलाला प्रवेश मिळेल का? असा प्रश्न यावर्षी दहावीची परीक्षा दिलेल्या मुलाच्या आईने विचारला होता. त्याने प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज केला होता, त्यात रुपारेल महाविद्यालयाचा चॉईस दिला होता. त्याला गुण चांगले असले तरी साशंकता होती. 

हा प्रश्न तिने विचारला तेव्हा बालमोहन विद्यामंदिरच्या दोन मुली समोरून चालल्या होत्या. त्यातल्या एका मुलीच्या हातची पुस्तकं खाली पडली. विद्या खाली पडली हा धडधडीत अपशकुन होता. आम्ही त्या बाईना म्हटले, 

" रुपारेलसाठी हटून बसू नका. काम होणार नाही. मिळेल तिथे प्रवेश घ्या आणि मोकळ्या व्हा." त्या म्हणाल्या, "पण त्याचे स्कोअरिंग चांगले आहे. त्याला मिळणारच नाही, असे त्याचे मार्क नाहीत." 

आम्ही म्हटले, " मिळणार नाही. समजेलच लवकर." 

पुढे त्याला एस आय ई एस ला प्रवेश घ्यावा लागला.

२) एका बिल्डिंगच्या रिडेव्हलपमेन्टचे काम मला मिळेल का? असा प्रश्न एका बांधकाम व्यावसायिकाने विचारला होता. आम्ही वांद्र्याला एका कामासाठी गेलो असतांना, कलानगरच्या बसस्टॉपवर बससाठी उभे होतो. गरज नसतांना आम्ही गाडी घेऊन कुठे जात नाही. एकटं जायचं असेल तर नाहीच नाही. 

कारण या भिकारचोट काँग्रेसच्या महागाईच्या राज्यात, आम्हांला पेट्रोल परवडत नाही. दुसरी गोष्ट सार्वजनिक उपक्रमाच्या वाहनातून प्रवास करण्याची मजा वेगळी असते. म्हणून काम संपल्यावर, हायवेवर बसची वाट पहात कलानगर स्टॉपवर उभे होतो. तिथून हा गाडी घेऊन चालला होता. आम्हांला पाहिल्यावर त्याने गाडी थांबवून गाडीत घेतले. गप्पा सुरू झाल्या. 

परळला एका चाळीच्या रिडेव्हलपमेन्टचे प्रपोजल त्याने बनवले होते. काही भाडेकरूंचा विरोध सुरू होता. ते होईल का असे त्याने विचारले. 

तेव्हा गाडी माहीमला लेफ्ट घेत होती. समोर एका इमारतीच्या उद्घाटनाचा मोठा फलक होता. त्या मोठ्या टॉवरचे चित्र होते. आम्ही त्याच्याकडे बोट दाखवून त्याला म्हटले, 

" तुमचे त्या चाळीच्या रिडेव्हलपमेन्टचे काम होणार. हा पहा शकुन." 

तो खूश झाला. त्याने बाजूला बसल्याबसल्या आम्हाला नमस्कार केला.

पुढे दोन तीन मिटिंगनंतर विरोध करणार्‍या भाडेकरूंचा विरोध मावळला आणि आता ते प्रपोजल त्याला मिळाले आहे. लवकरच कायदेशीर बाबींची पूर्तता होऊन काम सुरु होईल.

३) एका मुलीला SAP च्या कोर्सला प्रवेश घ्यायचा होता. प्रश्न ऍडमिशन मिळेल का आणि मिळाली तर एवढी फी भरल्याचा फायदा होईल का? असा होता. 

तिचा फोन आला तेव्हा आम्ही संगणकावरच होतो. तेवढ्यात गुगलनिरोपकावर एका जातकाने पिंग करून,

" पंत, तुमचे ऑनलाईन क्लासेस कधी सुरू करणार आहात? मला नक्की प्रवेश द्या त्यात. " असे सांगितले.

तो शकुन घेऊन आम्ही त्या मुलीला एसएपी चा कोर्स पूर्ण कर असा सल्ला दिला. कोर्स संपण्यापूर्वी प्लेसमेन्ट वाल्यांकडून जॉब तिच्या हातातही आला. फ्रेशर म्हणून कुठेही घोडं अडलं नाही, हे नवल. आत्ता ती त्याच कंपनीत जॉबला आहे. थोडा अनुभव घेऊन, याहून चांगल्या पॅकेजसाठी प्रयत्न करेल.

निसर्गाचे संकेत समजण्याची अक्कल असेल, तर अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यास, मार्गदर्शन करण्यास निसर्ग तयार असतो. फक्त ते समजून घेण्याची कुवत आणि मानसिकता हवी.

आपला,
(जिज्ञासु) धोंडोपंत


2 comments:

Shubhangi Sawant said...

quite interesting...

Vishakha Mashankar said...

वाह !! निसर्गाचे संकेत !! खूप वेळा अनुभव येतो तरी आपण दुर्लक्ष करतो !! आता मात्र तसे होणार नाही !!