Saturday, October 27, 2012

बिघडलेला शुक्र.............

॥ श्री स्वामी समर्थ॥

लोकहो,

बरेच दिवसांनी ब्लॉगावर कुंडली मांडतोय. दरम्यानच्या काळात तुम्हांपैकी अनेकांकडून नेहमीप्रमाणे लेखनासाठी आग्रह होतच होता. एका बाजूस व्यावसायिक कामाचा प्रचंड ताण, कौटुंबिक जबाबदार्‍यांसाठी द्यावा लागणारा वेळ, दरम्यान आलेले गणपतीबाप्पा, मग पित्रृपक्ष आणि आत्ता नवरात्र यात गेलेला वेळ, यामुळे लेखन जमले नाही, त्याबद्दल दिलगीर आहोत. 

त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसात फेसबुकावरचा वाढलेला वावर, हे ही त्यामागचे एक कारण आहे. 

फेसबुकावर जाणार्‍या वेळामुळे, जो काही वेळ हाताशी असतो त्या वेळात सकस लेखन हातून होत नाही. टाईमपास जास्त होतो, हे वास्तव आहे. आणि एखाद्याच्या मित्रयादीत पाच-पन्नास जण असतील, तर त्याचा जास्त वेळ तिथे जात नाही. पण आमच्यासारख्याच्या मित्रयादीत अडीच हजारहून जास्त लोक असल्याने, आणि प्रत्येकाच्या पोस्टवर आपल्या अकलेचे तारे तोडलेच पाहिजेत, ही आमची कोकणस्थी भूमिका असल्याने, तिथे बराच वेळ जात होता. तो आता थांबवला आहे. 

काही काळ आम्ही फेसबुकाला रामराम ठोकला आहे आणि यापुढे ब्लॉगलेखनावर लक्ष देणार आहोत. कारण फेसबुकविश्व आणि त्यावरील लेखन हे क्षणभंगुर आहे. त्यात गांभीर्याचा अभाव आहे. ज्ञानवर्धन किंवा बौद्धिक आदानप्रदान हा तिथला हेतू आणि उद्देश नसल्याने, जो वेळ आपण तिथे घालवतो, त्याचे वर्गीकरण करमणूक याशिवाय दुसर्‍या कुठल्याही प्रकारात करता येणार नाही. 

ब्लॉग हा कायमस्वरूपी आहे. इथे केलेले लेखन पुढील पिढीतील अभ्यासकांना मार्गदर्शक ठरत राहील, आम्ही असलो तरी........ आम्ही नसलो तरी. आज अनेक ज्योतिषी आमच्या ब्लॉगाची पारायणे करत असतात, कारण जे ज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि पुस्तकात मिळत नाही, ते त्यांना इथे मिळतं म्हणून. तर ते असो.

आजचा विषय शुक्र प्रतियोग वक्री हर्षल या योगाचा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एक तरूण त्याची आणि त्याच्या प्रेयसीची कुंडली घेऊन आला. गेले दोन वर्ष त्यांच्यात जिव्हाळा निर्माण झाला असून, आता लग्न करण्याची इच्छा दोघांचीही आहे. पण तत्पूर्वी कुंडली जुळतेय का हे पहावे, या उद्देशाने तो आला होता.

कुंडलीत शुक्र हर्षलने बिघडला असल्यास वैवाहिक जीवनात अनेक भयंकर गोष्टी उद्भवतात. विचित्र गोष्टी ज्याला म्हणता येतील, ज्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात घडत नाहीत अशा गोष्टी वाट्याला येतात. याची परिणती बहुतकरून घटस्फोटात होते. घटस्फोट अनेकांचे होतात. पण शुक्र प्रतियोग वक्री हर्षल या योगामुळे जे घटस्फोट होतात त्यांची कारणे इतर घटस्फोटांपेक्षा वेगळी असतात. यात लैंगिक विकृती, विवाहबाह्य प्रेमसंबंध, अवाजवी शारीरिक भूक, संभोगाच्या विचित्र आवडी अशा कारणांमुळे घटस्फोट होण्याची संख्या जास्त असते. 

पत्रिकामेलन केल्यावर दोघांचेही गुण चांगले जमत आहेत असे दिसले. मुलाचे नक्षत्र अनुराधा प्रथम चरण आणि मुलीचे अश्विनी द्वितीय चरण. अगदी साडेबत्तीस गुण जमत आहेत. 

पण मुलीची पत्रिका पाहिली तेव्हा त्यात आमचे लक्ष वेधून घेतले ते शुक्र प्रतियोग वक्री हर्षल या योगाने. हा योग पाहताच आम्ही चपापलो. या कुंडलीत शुक्र मिथुनेत ३ अंशांवर आहे आणि त्याचा समोर धनेत ३ अंशांवर असलेल्या वक्री हर्षलशी अंशात्मक प्रतियोग होतो आहे. इतकेच नव्हे तर तिथेच शनी २ अंश ५३ कलांवर आहे. म्हणजे शनी आणि हर्षलची अंशात्मक युती ही शुक्राच्या अंशात्मक प्रतियोगात, ती सुद्धा मूळ नक्षत्रात. आम्हांला खुर्चीत सावरून बसण्याशिवाय पर्याय नव्हता.


पुढे पहा की, मंगळाची शुक्रावर आणि सप्तमस्थानावर अनुक्रमे चौथी आणि आठवी दृष्टी आहे. शुक्र कुंडलीचा सप्तमेश आहे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. इतकेच नव्हे तर मुलीचे मेष लग्न मेष रास असल्यामुळे चंद्राचा सप्तमेशही शुक्र आहे. 

पत्रिकेत शुक्र हा सप्तमेश, चंद्रसप्तमेश आणि कारक म्हणून एवढा बिघडल्यावर वैवाहिक सौख्य लाभेल? ही पत्रिका इथे देण्याचे कारण हेच की शुक्र किती पराकोटीचा बिघडलाय ते कळावं. अशा पत्रिका वारंवार पाहण्यात येत नाहीत. 

आम्ही पुढे दशास्वामी पाहिला. कुंडलीला सध्या शुक्राची महादशा सुरू आहे. ३ डिसेंबर २०१२ रोजी रविची महादशा सुरू होते आहे जी पुढे सहा वर्षे असेल. रवी वैवाहिक सौख्याबद्दल काय सांगतोय ते पाहू.

रवि स्वत: चतुर्थात आहे आणि मेष लग्नाच्या कुंडलीला पंचमेश आहे. रवि बुधाच्या नक्षत्रात आहे. बुध स्वत: चतुर्थात, तृतीयेश आणि षष्ठेश. रविची दृष्टी दशमावर. म्हणजे पुढे सहा वर्षे येणारा महादशास्वामी वैवाहिक सौख्याचे एकही स्थान देत नाही. 

आम्ही त्याला या सर्व गोष्टींची कल्पना दिली. म्हटलं, निर्णय तुझा. खड्डा दाखवणं काम आमचं. आता ज्याला उडी मारून तो किती खोल आहे हे पहायचं असेल, त्याने पहावं. 

इथे एक प्रश्न निर्माण होईल की, मेष लग्नावर त्या महिन्यात जन्मलेल्या सर्वांनाच तशी फळे मिळतील काय? उत्तर ठाम "नाही" असे आहे. कारण या कुंडलीत शुक्र सप्तमेश आहे तसेच चंद्रकुंडलीचाही तो सप्तमेश आहे. त्यामुळे सर्वात जास्त फळे या कुंडलीत मिळणार आहेत. दुसर्‍या दिवशी चंद्राने राशी बदलली की तो चंद्राचा सप्तमेश असणार नाही. तसेच तो थोडा पुढे गेला की हा योग संपेल. 

या सर्व गोष्टी पत्रिकामेलन करतांना पहाव्या लागतात. नुसतं वरवर पाहून करा करा सांगण्यात काही अर्थ नाही. ज्या फुलांच्या शय्येवर आपण पहुडलो  आहोत, त्यात काटे किती हे समजले पाहिजे. ज्याला चितेवर पहुडायचे असेल त्याने या गोष्टी बघायची गरज नाही.

आपला,
(सूक्ष्मदर्शी) धोंडोपंत 1 comment:

संकेत said...

असे नव-नवीन पत्रिकांचे सखोल विवेचन वाचायला मिळाले, की जिज्ञासा तृप होते. असे लेख frequently येऊ द्या.